काव्यरसग्रहण- सब घोडे बारा टक्के

 

>>गुरुनाथ तेंडुलकर 

 

विख्यात कवी विंदा करंदीकरांनी लोकसभेच्या दुसऱया निवडणुकीच्या सुमारास एक कविता लिहिली होती. `सब घोडे बारा टक्के’. साधारण सत्तर वर्षांपूर्वीच्या त्या कवितेत विंदांनी लिहिलं होतं…

गोड गोड जुन्या थापा… तुम्ही पेरा तुम्ही कापा…

जुन्या आशा नवा चंग…. जुनी स्वप्ने नवा भंग…

तुम्ही तरी करणार काय? आम्ही तरी करणार काय?

त्याच त्याच खड्यामधे… पुन्हा पुन्हा तोच पाय…

जुना माल नवे शिक्के… सब घोडे बारा टक्के…

आज ही कविता आठवायचं कारण म्हणजे सध्या देशात सर्वत्र निवडणुकांचे वादळी वारे जोरात सुटले आहेत. कोणतंही वर्तमानपत्र उघडा, टीव्हीवर बातम्यांचं कोणतंही चॅनल लावा, सोशल मीडियावर जा… सगळीकडे एकच धुरळा उडतोय. या देशाचं आणि देशवासीयांचं नेतृत्व करण्यासाठी केवळ आणि केवळ आमचाच पक्ष योग्य आहे आणि इतर सगळे जण कसे नालायक आहेत, हा विचार जनतेच्या मनावर बिंबवून आपापले उमेदवार निवडून आणण्यासाठी सर्वच पक्ष धडपडताहेत. सत्ताधारी पक्षाचे नेते `आम्ही काय काय केलं’ं याची टिमकी वाजवताहेत, तर विरोधी पक्षांचे नेते आणि प्रवत्ते `सत्ताधारी पक्ष कसा खोटारडा आहे’ हे सिद्ध करण्याचा खटाटोप करताहेत.

पक्षांच्या प्रचार सभा, मोठमोठ्या मिरवणुका, पोस्टर्स आणि बॅनर्स, टीव्हीवरच्या जाहिराती आणि पेपरातील मुलाखती… पैशांचं वाटप, दारूचं वाटप, आश्वासनांची खैरात…

मंदिरांत पूजा-आरत्या, चर्चमधे प्रार्थना, दर्ग्यावर चादरी… येनकेनप्रकारेण प्रत्येकाला ही निवडणूक जिंकायची आहे. का जिंकायचीय, तर म्हणे यांना देशाची सेवा करायची आहे. पण देशाची सेवा करायची असेल तर त्यासाठी सत्ताच आवश्यक आहे असं थोडंच आहे? प्रत्येकाने आपापली कर्तव्ये प्रामाणिकपणे पार पाडली तरीही देशाची सेवा करता येतेच की! किंबहुना या नेते मंडळींनी आपला अप्रामाणिकपणा थोडासा जरी कमी केला आणि भ्रष्ट मार्गाने सत्ता-संपत्ती मिळवायचं बंद केलं तरीही ती देशाची मोठी सेवाच होईल. पण नाही. देशाची सेवा आम्हीच करणार, ही सेवा करायची संधी आम्हालाच मिळायला हवी. ही संधी साधण्यासाठी हे संधीसाधू राजकारणी एकमेकांवर आत्यंतिक हीन दर्जाचे आरोप आणि प्रत्यारोप करताहेत. एकमेकांची उणीदुणी काढताना बहुतेक सर्वांनीच आपापल्या शालीन-सभ्यतेच्या सगळ्या पायऱया सोडून केवळ तळच नव्हे, तर पार रसातळ गाठलाय.

काल हातात हात गुंफून फिरणारे आज एकमेकांचे पाय खेचताहेत. काल उराउरी भेटणारे आज एकमेकांच्या उरावर बसू पाहताहेत. सगळ्याच पक्षांत भ्रष्टाचारी लोकांची आवक-जावक होऊन पार सरमिसळ झालीय.  हाताची पाच बोटं वेगवेगळी असली तरी घास उचलून तोंडात घालताना सगळी बोटं एकत्र येतात ही वस्तुस्थिती आहे. निरनिराळ्या पक्षांचे झेंडे वेगवेगळे दिसले तरी हातातील दांडे मात्र एकाच प्रकारचे आहेत.

कालपर्यंत जे एका पक्षात होते ते अचानक रातोरात दुसऱया पक्षात गेले. त्या दुसऱया पक्षाकडून त्यांना निवडणुकीचं तिकीटदेखील मिळालं अशी अनेक उदाहरणं आज आपल्याला दिसताहेत. केवळ मतदारच नव्हे, तर पक्ष प्रचारकदेखील भांबावले आहेत. सामान्य कार्यकर्ते तर पार हताश झाले आहेत. कुणाच्या नावाने `झिंदाबाद’ म्हणायचं आणि कुणाचं नाव घेऊन `मुर्दाबाद’ म्हणायचं हेदेखील त्यांना उमगत नाहीय. कित्येकांना तर कोणत्या पक्षाचं चिन्ह (निशाणी) काय आहे हेदेखील अद्याप निश्चितपणे माहीत नाहीय. मागच्या निवडणुकीत ज्या पक्षाला शिव्या घातल्या त्याच पक्षाला बिनशर्त पाठिंबा देऊन त्यांच्या प्रचार सभांमधून काही नेते भाषणं करताना दिसताहेत, तर मागच्या निवडणुकीत ज्यांची खिल्ली उडवली अशा लोकांची आरती करणारे प्रवत्तेदेखील दिसताहेत. सगळाच सावळा गोंधळ आहे. जातीचं राजकारण, प्रांताचं राजकारण, धर्माचं राजकारण… `अन्ग्dा aह् Rल्त’ म्हणजेच `फोडा आणि झोडा’ हा ब्रिटिशांनी सुरू केलेला खेळ स्वातंत्र्यानंतरदेखील राजकीय पक्षांनी तसाच सुरू ठेवलाय.  लोकशाहीच्या नावाखाली चाललेला कोट्यवधी रुपयांचा हा झगझगीत तमाशा आता नकोसा वाटतोय.

तरीही… तरीही आपण सर्वांनी विचारपूर्वक मतदान करायलाच हवं. पाच वर्षांसाठी देश योग्य व्यक्तींच्या हाती सोपवायला हवा हे सांगणारी आजची ही कविता.

कवी आहेत सांगलीतील श्री. सिराज करीम शिकलगार. शिकलगार हे हिंदुस्थानी साहित्याचे गाढे अभ्यासक तर आहेतच, पण त्यांची खरी ओळख आहे ते मराठीतील एक तरल कवी आणि गझलकार म्हणून. fिशकलगार सर त्यांच्या `मतदान’ या कवितेत लिहितात…

किती वाटते गोड कानास, तुमचे हे बोलणे

लबाड काटा, खोटी वजने, अंधारी तोलणे

जुने जाहीरनामे-आश्वासने अन् तीच वचने

कमकुवत या बुद्धीला, होते अवघड ते पचणे

आम्ही करतो दाम मताचे, मारता तुम्ही मैदान

पुन्हा पळता तुमच्या पाठी उडते दाणादाण

तुमच्या सत्तेसाठी पाहून उड्या, कुंठते मती

भांबावून आमची पक्षनिष्ठा चालली सती

जरी केलीत तुम्ही, आमुच्या मताची ऐसीतैसी

विचार करावा लागेल आम्हा मतदाना fिदवशी

 

कवितासंग्रह ः खजील चेहरे 

  कवी : सिराज करीम शिकलगार 

  मूल्य ः रुपये 150/-

[email protected]