दखल- मनाचा विविधांगी वेध

 

 

>>देवेंद्र भगत

जीवन जगत असताना सुख, दु:ख, प्रेम, वियोग, नैराश्य यांसारख्या भावभावना मानवी मनात कायम उठत राहतात. त्यामुळे आपले विचार प्रभावित होत राहतात अशा विचारांचे दर्शन या कवितासंग्रहातील कवितांतून घडत राहते. या काव्यसंग्रहाचे विशेष सांगायचे झाल्यास यात असलेल्या कविता या विविध विषयांना स्पर्श करणाऱया आहेत. जीवनविषयक, सामाजिक, राजकीय, बालकविता, हास्यकविता, आशावादी अशा वेगवेगळ्या विषयांनी समृद्ध असा हा काव्यसंग्रह आहे. कमी शब्दांत जास्त आशय मांडणाऱया आशयघन कविता आहेत. यातील कविता प्रत्येक वाचकाला त्याच्या दृष्टीने विचार करायला लावणारी, शब्दांचे विविध अर्थ सांगणारी, सोप्या व सहज शब्दांत अर्थदृष्ट्या प्रगल्भ अशी आहे. या काव्यसंग्रहाचा आणखी एक विशेष भाग म्हणजे यात प्रत्येक कवितेसाठी रेखाटलेली मनोवेधक चित्रे कवितेला आणखी बोलके स्वरूप प्राप्त करून देतात.

नैराश्यावर मात करून आशावाद शिकवणारा असा हा काव्यसंग्रह आहे. जीवनमूल्ये, संस्कार, माणुसकी, सामाजिक, कौटुंबिक प्रश्न मांडणारा हा काव्यसंग्रह वाचकाच्या मनाचा वेध घेत राहतो. प्रत्येक कवितेत वाचकाला खिळवून ठेवण्यात कवयित्री यशस्वी झाल्याचे दिसते. यात असलेल्या बालकविताही सध्याचे बालकांचे प्रश्न मांडणाऱया, त्यांना नकळत बोध देणाऱया आहेत. `आयुष्य सोपं नसतं’ हे सांगत `काय म्हणजे जीवन असतं’ यावरदेखील भाष्य करणाऱया या कविता आहेत. लक्षवेधी मुखपृष्ठ व मलपृष्ठ असलेला हा काव्यसंग्रह नावाप्रमाणेच वाचकाच्या मनाला साद घालणारा आहे.

काव्यसंग्रह – मनमानसी    कवयित्री – मानसी नेवगी

प्रकाशक – साहित्य संपदा प्रकाशन

पृष्ठ संख्या – 124   किंमत – 175 रु.