
>> आराधना कुलकर्णी
आज स्त्रिया प्रपंचातील गृह खात्यापासून देशाच्या संरक्षण खात्यापर्यंत आणि स्वयंपाकघर ते अंतराळापर्यंत सर्वच क्षेत्रांत कामे करतात. मोठमोठय़ा जबाबदाऱया घेतात. व्यावसायिक तसेच सामाजिक क्षेत्रांत वावरताना मासिक पाळीची बंधने पाळणे अशक्यच असते व तशी गरजही नसते. हे असे चित्र सामाजिक आघाडीवर असले तरी कौटुंबिक आघाडीवर घरातील धार्मिक कार्यात मात्र तिला अपवाद केला जातो आणि हे इतके सहज घडत असते की, ही विसंगतीही कुणाच्या लक्षात येत नसावी किंवा आली तरी दुर्लक्षित असावी.
गणेशोत्सवाची धामधूम. त्यातच महालक्ष्मींचे आगमन घराघरांत झालेले. सजावट, पूजा, पक्वान्ने, नैवेद्य, स्वयंपाक ही तयारी सुरू. सवाष्ण जेवू घालायची आहे. निरोप येतो, अचानक तिची पाळी सुरू झाली आहे. मग ती सवाष्ण म्हणून चालत नाही. मोठी पंचाईत! कधी जिच्या घरी हे सर्व धर्मकार्य, तिला कावळा शिवतो. तोपर्यंत ती सगळी कामे करते आणि एका क्षणात अस्पर्श्या होते. भक्तिमय आनंदी वातावरणात मिठाचा खडा पडतो. तिला वगळून घरातील इतर सदस्य ती जबाबदारी पार पाडतात.
तिथीनुसार येणारे सोडले तर अन्य धार्मिक कार्यांत शक्यतो अशी अडचण येणार नाही असा दिवस निवडणे, नाहीतर गोळ्या घेऊन मासिक पाळी पुढे ढकलणे असे प्रसंग सर्व घरांत घडतात. पाळीच्या दिवसांत स्त्राr अपवित्र असते. त्यामुळे तिने धार्मिक कार्यात कुठलाही सहभाग घेऊ नये हे गृहीतक ( शिवाय तिला थकवा व शारीरिक वेदनाही असतात).
आपल्या धर्मसंस्कृतीचे आधारस्तंभ ऋग्वेद, यजुर्वेद अथवा अथर्ववेदात मात्र या अपावित्र्याचा उल्लेख नाही. अथर्ववेदातील भूमिसूक्तात ‘धरती आता रजस्वला झाली आहे. स्त्राr जशी अपत्यजन्मासाठी उत्सुक असते तशीच भूमी ही आता भरघोस पीक देईल’ असा गौरवपर उल्लेख आहे. या सृजनतेमुळे ती ‘धरणीमाता’ आहे.
‘यत्र नार्यस्तु पूजन्त्ये रमन्ते तत्र देवता:’ हा श्लोक स्त्री वंदनीय आहे हे दर्शविणारा आहे. तर मग महिन्यातील ते चार दिवस ती अपवित्र कशी? कोणतीही धार्मिक गोष्ट, पूजा, मंदिरात जाणे इ. गोष्टींपासून सक्तीने तिला लांब का रहावे लागते? नवरात्रात आदिमायेच्या नवरूपांचा नऊ दिवस जागर असतो. अशा महोत्सवात ही ऋतुमती माय मात्र लांबच राहते.
मासिक पाळी ही स्त्राrची सृजन शक्ती आहे. नऊ महिने गर्भाचे ओझे ओटीत धारण करून व्यथावेदना सहन करत नवा जीव जन्माला घालते. त्या कारणेच तर हे विश्वपा अव्याहत चालू आहे. मग ही शक्ती अपवित्र कशी? जर ही अपवित्र, तर तिच्या योगे जन्माला येणारा प्रत्येक जीव हा अपवित्रच मानावा लागेल. याबाबतीतील प्रथा विसंगत आहेत हे वास्तव आहे.
स्त्रीच्या मासिक धर्माबाबत भिन्न भिन्न सांस्कृतिक व सामाजिक दृष्टिकोन आहेत. काही ठिकाणी तिला त्या विशिष्ट दिवसांत मंदिर प्रवेश निषिद्ध आहे, तर काही ठिकाणी याच सृजनाची पूजा करणारी मंदिरे आहेत. स्त्रियांना मात्र आजही विशिष्ट देवळांमध्ये कधीच प्रवेश नसतो आणि पाळीच्या दिवसांत कोणत्याच देवळात प्रवेश नसतो. एखादी गोष्ट स्वतहून न करणे ही बाब वेगळी, पण ती करण्याची परवानगीच नसणे ही बाब सन्मानाला ठेच पोहोचवणारी असते.
त्यासाठी चळवळी, आंदोलने व कायदेशीर लढाया लढल्या गेल्या. कायदाही याबाबतीत स्त्रियांच्या बाजूने आहे. त्यामुळे स्त्रीला आता मंदिर प्रवेश निषिद्ध आहेत, असं उघडपणे कोणी म्हणत नाही तथापि अंत:स्थ प्रवाह मात्र वेगळे आहेत. वैयक्तिकरीत्या मासिक पाळीतील बहुतांशी स्त्रिया स्वतच देवळात जाणे टाळतात.
चार दिवस वेगळे बसण्याची प्रथा ग्रामीण भागात आजही आहे. शहरी भागात तसेच सुशिक्षित कुटुंबात ती कालबाह्य असली तरी धार्मिक सणसमारंभात आजही अपवाद केले जातात. मासिक पाळी आलेली स्त्राr स्वतहूनही अशा कार्यात भाग घेत नाही किंवा घरच्यांचीही अपेक्षा नसते. तरुण पिढीतील उच्चशिक्षित, नोकरदार स्त्रियादेखील त्याला संमत असे वागतात. याची कारणे घरात शांती रहावी, आनंदाच्या प्रसंगी उगाच कलह नको, मोठय़ांचे मन मोडू नये, कुटुंबाची परंपरा इ. आणि त्याचसोबत योग्य-अयोग्यतेविषयी काहीसा संदेहदेखील .
वास्तविक मलमूत्र, घाम, अश्रू याप्रमाणे मासिक पाळीदेखील एक नैसर्गिक,शारीरिक उत्सर्जन आहे. ते पवित्रतेशी नाही, तर स्वच्छतेशी संबंधित आहे. स्वच्छतेच्या अपुऱया सोयीसुविधा, मोठय़ा कुटुंबातील कष्टदायक कामे, त्यात या थकवणाऱया शारीरिक वेदनांची भर, तेव्हा स्त्राrला उपेक्षितपणे बाजूला बसवणारी, पण चार दिवसाची विश्रांती देणारी ही प्रथा पूर्वी मान्यही असावी. आज मात्र परिस्थिती वेगळी आहे. वेदनाशामक औषधे, स्वच्छतेची साधने व बदलती सकारात्मक मानसिकता यामुळे स्त्रियांचा मासिक पाळीचा त्रास नियंत्रित होतो.
आज स्त्रिया प्रपंचातील गृहखात्यापासून देशाच्या संरक्षण खात्यापर्यंत आणि स्वयंपाकघर ते अंतराळापर्यंत सर्वच क्षेत्रांत कामे करतात. मोठमोठय़ा जबाबदाऱया घेतात. व्यावसायिक तसेच सामाजिक क्षेत्रांत वावरताना मासिक पाळीची बंधने पाळणे अशक्यच असते व तशी गरजही नसते. हे असे चित्र सामाजिक आघाडीवर असले तरी कौटुंबिक आघाडीवर घरातील धार्मिक कार्यात मात्र तिला अपवाद केला जातो आणि हे इतके सहज घडत असते की, ही विसंगतीही कुणाच्या लक्षात येत नसावी किंवा आली तरी दुर्लक्षित असावी.
धर्मस्वातंत्र्य आहे, आचार स्वातंत्र्य आहे, समानताही आहे, पण तरीही धार्मिक क्षेत्रात काही गोष्टी निषिद्धच आहेत. हजारो वर्षांच्या संस्काराचे अवजड आवरण इतके सवयीचे झाले झाले आहे की, त्याचे ओझे सर्वसामान्य स्त्रियांना जाणवत नाही.
सामाजिक आणि वैयक्तिक स्तरांवरचे हे भिन्न वर्तन. ही भिन्नता किरकोळ की महत्त्वाची? योग्य की अयोग्य? फरक दृष्टिकोनाचा आहे.
❚ [email protected]
(लेखिका अनुवादक आहेत)


























































