
>> आरती देवगावकर
निसर्गाची कुठली पार्टी? असा प्रश्न पडला असेल तर पहाटे पहाटे जरा शहराच्या बाहेर जाऊन पहा. सगळा आसमंत धुक्याची शाल पांघरून पहुडलेला असतो. कणसावर आलेले शेत वाऱ्यावर हलके डोलत असते. हिरवेगार शेत डोळ्यांना सुखावीत असते. या अशाच थंड वातावरणात सुरू होतात हुरडा पाटर्य़ा. आपल्या जिवलगांबरोबर घालवायला मिळणारे निसर्गाच्या सान्निध्यातले हे सुरेख क्षण म्हणजे आयुष्यभराची पुंजी.
मागच्या रविवारी जोरदार पार्टी झाली असेल ना सगळ्यांची? नववर्षाच्या स्वागताच्या त्या पार्टीच्या मूडमधून बाहेर आलात की नाही अजून? काय म्हणता, नाही! साहजिकच आहे. डिसेंबरमध्ये हरवलेल्या थंडीला आता कुठे तिचे नेमके ठिकाण सापडलेय. “येऊ का?’’ म्हणत म्हणत परवानगीची वाटही न पाहता ती सगळ्यांकडे डोकावतेय. तब्येतीसाठी आता नक्की लवकर उठून फिरायला जाणार, अमुक एक किलो वजन या वर्षात नक्की कमी करणार, जिमला नेमाने जाणार इ.इ. नवीन वर्षाचे संकल्प या थंडीच्या आगमनाने उबदार दुलईत गुंडाळलेत का? ‘आज जरा जास्तच थंडी आहे, थोडा वेळ पडी मारू, उद्यापासून मात्र नो सबबी!’ या सबबीखाली साखरझोपेत गुरफटलेले माझ्यासारखे कितीतरी जण आजूबाजूला दिसत आहेत. हलवायचेय का त्यांना? सोपे आहे. “चला, अजून एका पार्टीला’’ असा पुकारा करा आणि बघा, लोक सगळा आळस सोडून थंडीला न जुमानता येतात की नाही ते! नवे वर्ष सुरू होऊनही आठ दिवस झाले अजून या बाईच्या पाटर्य़ा चालूच आहेत का? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. याचे उत्तर ‘हो’ आणि ‘नाही’ असे दोन्ही! कसे काय, तर सरत्या वर्षाला निरोप देण्याच्या झाल्या, पण नववर्षाच्या स्वागताच्या आताशी कुठे चालू होत आहेत. निसर्ग साद घालतो आहे, त्याच्याकडे बोलावतो आहे, चला तर मग!
निसर्गाची कुठली पार्टी? असा प्रश्न पडला असेल तर पहाटे पहाटे जरा शहराच्या बाहेर जाऊन पहा. सगळा आसमंत धुक्याची शाल पांघरून पहुडलेला असतो. कणसावर आलेले शेत वाऱयावर हलके डोलत असते. हिरवेगार शेत डोळ्यांना सुखावीत असते. या अशाच थंड वातावरणात सुरू होतात हुरडा पाटर्य़ा. मी मूळची कोकणातील. त्यामुळे हुरडा वगैरे प्रकाराशी दुरान्वयेही संबंध नसलेली. मात्र लग्न होऊन देशावर आले, सासर मराठवाडय़ातील मिळाले आणि हुरडा या अनोख्या नवलकथेने आयुष्यात शिरकाव केला. पहिल्यांदा मामेसासऱयांना भेटायला गेलो तेव्हा हा विषय निघाला आणि अख्खं खानदान त्या आठवणीत रमले. मला ऐकताना खूप मजा वाटत होती. आम्ही माहेरी घरात जमून किंवा कोल्हापुरात गुऱहाळात जाऊन करायचो तशीच ही मजा की, असं मनात येऊन गेलं. हळूहळू हा प्रकार अजून जास्त समजत गेला.
हुरडा म्हणजे ज्वारीचे कोवळे दाणे. कणीस लागल्यापासून अंदाजे 30 ते 40 दिवसांतील दाणे यासाठी योग्य मानले जातात. हे दाणे नेहमीच्या ज्वारीपेक्षा थोडे मोठे आणि हिरव्या रंगाचे असतात. चावल्यावर मऊसूत लागतात. अगदी कोवळ्या दाण्याची चव काही खासच असते. हे दाणे हुरडा म्हणून तयार होत आले की पाहुण्यांना, स्नेह्यांना वर्दी पाठवली जाते आणि शेतावर आमंत्रण दिले जाते. ठरलेल्या दिवशी सगळे शेतावर जमतात. त्या दिवशी घरधन्याची आणि धनिणीची फार गडबड असते. शहरातून आलेल्या लोकांना शेतावरच्या सगळ्याच गोष्टींचे मोठे अप्रुप असते. आल्या आल्या त्यांना निरसे दूध, घरच्या म्हशीच्या किंवा कपिलेच्या दुधाचा घट्ट चहा असे आवडीप्रमाणे दिले जाते. त्यानंतर मंडळी थोडा फेरफटका मारून येतात तोवर शेतावरच्या गडय़ांनी हुरडय़ाची चोख व्यवस्था केलेली असते. ज्वारीची ही कणसे निखाऱयावर किंवा शेकोटी पेटवून त्यात भाजली जातात. गरम असतानाच हाताने ‘हाय-हुई’ करत चोळून कणसातून दाणे वेगळे काढले जातात. पाहुण्यांच्या समोर ताटल्या भरभरून हे भाजलेले हिरवेगार लुसलुशीत दाणे येतात. ही आगटी पेटवणे हे फार कसबी माणसाचे काम असते. त्याची धग कमी झाली तर हुरडा कच्चा राहतो आणि जरा वाढली तर कोळसा. त्यामुळे त्यासाठी शक्यतो शेतावरील सर्वात अनुभवी माणसाची नेमणूक केली जाते. सोबतीला त्याच आगटीवर भाजलेले दाणे, बटाटे, रताळी, वांगी यांच्या मीठ-मसाला लावलेल्या पह्डी, शेंगदाण्याची-लसणाची चटणी, गुळाचा खडा, दही इत्यादी पदार्थ दिले जातात. गप्पांचा रंगलेला फड आणि समोर येणारा हा मेवा… एकामागे एक कधी फस्त होतो समजतदेखील नाही. यजमानाच्या आग्रहाला बळी पडत पोटात बराच हुरडा सामावला जातो. आता खरं तर घशाला कोरड पडते; पण हुरडय़ावर पाणी प्यायलं तर पोट बिघडते या निसर्गज्ञानाला जागून त्यावर मधुर चवीचा मठ्ठा दिला जातो. मधुर दही-मीठ-आलं-मिरची आणि कोथिंबीर यांचे योग्य मिश्रण असणारे हे पेय पोटात गेले की, डोळे मिटायलाच हवेत; पण हीच वेळ असते शेतातून फेरफटका मारायची. ही फेरी होते न होते तोच जेवण तयार असल्याची वर्दी येते. पोटात खरे तर अजिबात जागा नाही असे वाटत असतानाच भाजीचा खमंग वास कधी ताटाकडे ओढून नेतो पत्ता लागत नाही. शेतातल्या चुलीवर केल्या जाणाऱया ज्वारी-बाजरीच्या भाकऱ्या, खूप साऱया भाज्या एकत्र करून बनवलेली मुद्दाभाजी किंवा गरगटे, भरली वांगी, मटकीची उसळ, धपाटे, मिरचीचा ठेचा/खरडा, डाळ-बट्टी, घरून करून आणलेल्या पुरणपोळ्या/तिळाच्या पोळ्या/साध्या पोळ्या, तुरीची घट्ट आमटी आणि भात आणि असे कितीतरी पदार्थ.. भरल्या पोटावर यांचीही आहुती पडते आणि आता मात्र खरंच परतीचे वेध लागतात.
आकंठ भरलेल्या पोटाने, तृप्त मनाने यजमानांचा निरोप घेतला जातो. त्यांच्या आग्रहाचा, प्रेमाचा वानवळा आपल्या आधीच आपल्या गाडीत येऊन बसलेला असतो. हुरडय़ातून कोणती जीवनसत्त्वे मिळतात, इतर काय पोषक घटक मिळतात याची माहिती तर गुगलही देईल; पण आपल्या जिवलगांबरोबर घालवायला मिळणारे निसर्गाच्या सान्निध्यातले हे सुरेख क्षण म्हणजे आयुष्यभराची पुंजी असते. ती तशीच जपू या. याच दिवसांत घरोघरी होणाऱया पोपटी – उंधियू पाटर्य़ा पण असाच संदेश देतात. तेव्हाही तयारी करण्यापासून सगळ्यांनी एकत्र येऊन हसत खेळत काम करण्यातून एकमेकांतील सौहार्द वाढते. बंध अधिक मजबूत होतात. त्यामुळे मी तरी हेच म्हणेन, ‘खा आणि खिलवत रहा, मस्त खा नि स्वस्थ राहा.’
(लेखिका अनुवादक व समतोल या द्वैमासिकाच्या संपादक आहेत.)
[email protected]

























































