
>> आरती देवगावकर
सरत्या वर्षाची हुरहूर असतानाच नव्या वर्षाच्या स्वागतासाठीही आपण आतूर असतो. हीच खरी वेळ असते पार्टी साजरी करण्याची…
परवा भाजी घ्यायला मंडईत गेले होते. हिरवागार मटार पाहून कळी खुलली आणि भरपूर मटार घेऊन घरी आले. संध्याकाळी टीव्हीसमोर बसून मटार सोलायला घेतला. समोर बराच ढीग बघून नवरा आपणहूनच मदतीला आला. सासूबाईंनीही सोफ्यावर बसल्या बसल्या परातीत घेऊन सोलायला सुरुवात केली. मग मनात काय आले आणि सहज लेकाला हाक मारली, ‘मनू, चल ये मटार सोलायला मदतीला.’ आज माझे ग्रह उच्चीचे होते बहुधा, तोही येऊन बसला आणि मग समोरचा टीव्हीमागे पडून आम्ही सगळे गप्पागोष्टी करू लागलो. त्या तिघांशी बोलता बोलता मी कधी माझ्या लहानपणात जाऊन पोहोचले मलाच कळले नाही.
माझ्या लहानपणी डिसेंबर महिना जवळ आला की, आम्हाला वेध लागायचे शाळेच्या स्नेहसंमेलनाचे अर्थात आताच्या गॅदरिंगचे! वेगवेगळे नाच, नाटके, गाणी यांच्या होणाऱया तालमी, त्या वेळी होणारी धमाल सगळे काही आठवू लागले. विविध गुणदर्शनपर कार्यक्रम झाले की, दुसऱया दिवशी असायचा शाळेकडून अल्पोपाहार! मसालेभात, 2 बटाटेवडे-चटणी आणि जिलेबी हा मेन्यू कायमचा ठरलेला. एरवी कडक वागणारे शिक्षक या दिवशी इतक्या प्रेमाने आम्हाला वाढत असत की, हेच ते रागावणारे सर/बाई यावर आपलाच विश्वास बसू नये. त्यानंतर आंतरशालेय खेळाच्या स्पर्धा होत. वर्षभर सराव केल्याने काही स्पर्धा सहज जिंकता येत. काहींसाठी झगडावे लागे, क्वचित कधी हारदेखील पदरात पडे. या सगळय़ा स्पर्धा संपल्या की, आम्हा सर्व खेळात भाग घेतलेल्या विद्यार्थिनींसाठी खास श्रमपरिहाराचे आयोजन केले जात असे. त्यात मात्र दरवर्षी काही ना काही वेगळे पदार्थ असत. आता बोकाळलेली, पण तेव्हा अपवादात्मक मिळणारी इडली-सांबार-चटणी, पाव-भाजी, मटार उसळ-ब्रेड असे पदार्थ म्हणजे आमच्यासाठी पार्टीच असे.
हे सगळे होईहोईतो चालू कॅलेंडर वर्ष संपत आलेले असायचे. एक जानेवारीला शाळेला सुट्टी असायची, त्यामुळे 31 डिसेंबरला रात्री जागायला पालकांची ना नसे. सध्या चालतात तशा पाटर्य़ांचे पेव तेव्हा फुटलेले नव्हते. ओली पार्टी, घराबाहेर जाऊन केवळ मित्र मंडळींबरोबर पार्टी अशा संकल्पनाही घरांना शिवलेल्या नव्हत्या, हे मी सांगताना त्या काळातील म्हणजे बहुधा बाबाआदमच्या काळातील गोष्ट असावी अशा आश्चर्याने लेक ऐकत होता, पण काय खोटे मी सांगत होते त्यात?
आमचे घर मोठे होते, अगदी कमी लोकांकडे असणारा टीव्ही घरी होता. त्यावर केवळ दूरदर्शन ही एकच वाहिनी होती. तिच्यावर अतिशय दर्जेदार कार्यक्रम होत. नववर्षाचे स्वागत करण्यासाठी एरवी दहा वाजता बंद होणारे दूरदर्शन पेंद्र त्या दिवशी उशिरापर्यंत वेगवेगळे कार्यक्रम सादर करत असे. घरातील आबालवृद्धांना एकत्र बसून पाहता येतील असेच ते असत. त्यामुळे आमच्या घरी त्या दिवशी भरपूर नातेवाईक एकत्र येत. आदल्या दिवशीच बाबांनी 15-20 किलो मटार आणलेला असायचा. 31 तारखेला दुपारचे जेवण झाले की, सगळे लोक हॉलमध्ये गोलाकार बसून गप्पा मारत मटार सोलायला घेत. दिवाळीनंतर कुटुंबातील घडलेल्या घडामोडी, इकडच्या तिकडच्या गप्पा मारताना पुढय़ातील ढीग सहज संपून जायचा. तोवर दोघी तिघींची काका लोकांनी वाढवून (पह्डून) ठेवलेले नारळ खोवायला सुरुवात झालेली असे. एखादी आत्या, मावशी कोथिंबिरीच्या जुडय़ा निवडू लागलेल्या असत. मग माझी आई ते नारळ, कोथिंबीर, मिरची, आले याचे हिरवेगार वाटण तयार करे. भल्यामोठय़ा पितळेच्या पातेल्यात मटारच्या उसळीला पह्डणी बसली की, तो खमंग दरवळ आम्हाला आपसूक स्वयंपाकघराच्या चकरा मारायला भाग पाडी. तेव्हाच दुसऱया शेगडीवर मामीने निगुतीने किसलेल्या गाजराचा कीस दुधात पहुडलेला असायचा. त्याची उस्तवार करायचे काम कुणीतरी तरुण नातेवाईक स्त्र्ााr करे. प्रमाणशीर साखर आणि आटीव दुधाचा वास लागलेला, खव्याशिवायही दुधातच शिजून घट्टसर बनलेला तो गाजर हलवा… अहाहा! अजूनही त्या चवीने तोंडाला पाणी सुटते. मटार उसळ, बेकरीतून आणलेला ताजा स्लाईस ब्रेड आणि गाजराचा हलवा हा दर 31 डिसेंबरचा ठरलेला बेत! माझ्या पिढीतल्या बहुसंख्य घरातून हेच चित्र दिसत असे. या सगळय़ांनी मिळून बनवलेल्या पदार्थांची लज्जत काही औरच! कारण त्याला स्नेहाचा, मायेचा स्पर्श असायचा. हल्ली रोजच्या जेवणाचाही पंटाळा आला म्हणून सर्रास हॉटेलच्या खाण्यावर प्रेम करणाऱया फारशा नातेवाईकांत न मिसळणाऱया लोकांना याची मजा सांगून समजणार नाही. या सगळय़ा पाटर्य़ाच तर असायच्या आमच्या, वेगळे काय होते?
अशीच आठवण आहे केकची. 25 डिसेंबर, ख्रिसमस आणि केक यांचे नाते जणू अभिन्न. लहानपणी आईने घरी केलेला रव्याचा केक आणि क्वचित कधीतरी डब्यात मिळणारा खोबरे जॅम लावलेला लहानशा ग्लासच्या आकारातील केक याचे प्रचंड अप्रूप होते. ख्रिसमस आणि केक यांचे नाते समजले तरी आवर्जून तेव्हा केक खायलाच हवा अशी काही मानसिकता नसे. लग्नानंतर नवऱयाच्या एका ख्रिश्चन मित्राकडे आम्हाला ख्रिसमससाठी बोलावले होते. पार्टी आहे असे सांगितले होते. माझ्यासाठी तो सगळाच माहोल नवा होता. घरी बनवलेल्या शाकाहारी, मांसाहारी पदार्थांचे निरनिराळे पर्याय, सरबत, शीतपेये आणि ज्यांना हवे त्यांच्यासाठी मद्याची व्यवस्था आणि ख्रिसमसचे खास आकर्षण असणारा प्लम केक. यजमानाने तो केक कापला आणि सगळय़ांना दिला. नंतर त्या घरच्या बाईशी बोलताना हा केक बनवण्याची पद्धत समजली आणि मी अवाप् झाले. डिसेंबरमध्ये बनवल्या जाणाऱया या केकच्या तयारीला सुरुवात काही महिने आधीच केली जाते. वेलदोडे, जायफळ, सुंठ, दालचिनी अशा मसाल्याच्या पदार्थांचा यात वापर होतो. शिवाय यात वापरल्या जाणाऱया सुक्या फळांचे आणि सुका मेव्यांचे तुकडे चांगल्या प्रतीच्या रममध्ये मुरवत ठेवतात. रम पिऊन ते फुगतात आणि केकला अनोखा स्वाद प्रदान करतात. हा केक फ्रीजशिवायही महिनाभर सहज टिकतो. अजिबात हलका किंवा स्पॉजी न लागणारा प्लम केक ओलसर, लुसलुशीत मात्र असतो आणि याचे कारण म्हणजे त्याला बेक झाल्यावर किमान 8 दिवस रोज पाजली जाणारी रम. त्यामुळे हा केक हळूहळू अधिकच स्वादिष्ट होत जातो. आधी रमची चवही माहिती नसलेली माणसे एकदा का या केकची गोडी लागली की, स्वतःला त्यापासून दूर ठेवूच शकत नाहीत. हा केक ख्रिसमसच्या वेळी जेवढा चविष्ट लागतो, तेवढा तो एरवी वर्षभरात कधी केला तर लागत नाही. अगदी आपल्या सत्यनारायणच्या प्रसादासारखा. शेवटी माणसाची भावना काम करते ती अशी.
आठवणीत रमताना, गप्पा मारता मारता मटार सोलून झाला आणि या वर्षीचा 31 डिसेंबर आपणही असाच घरी साजरा करू या, असे लेकाचे फर्मानही निघाले आहे. बघू या कसा होतोय आमचा पार्टीचा प्लॅन. तुमचाही ठरलाच असेल ना काही? मस्त मज्जा करा! येते नववर्ष चविष्ट जावो या शुभेच्छा!
(लेखिका अनुवादक व समतोल या द्वैमासिकाच्या संपादक आहेत.)
[email protected]






























































