
>> आरती देवगावकर
ज्येष्ठ पत्रकार अंबरीश मिश्र यांनी लिहिलेल्या काही व्यक्तिचित्रांचे ‘दरवळे इथे सुवास’ हे पुस्तक राजहंस प्रकाशनातर्फे प्रकाशित झाले आहे. मराठी भाषेवर उत्तम प्रभुत्व असणाऱया मिश्र यांनी आपल्या अनोख्या शैलीत ही व्यक्तिचित्रे साकारली आहेत. यांमध्ये भूतपूर्व पंतप्रधान मोरारजी देसाई आहेत. बंडखोर मानल्या गेलेल्या लेखिका इस्मत चुगताई आहेत. इंग्रजी पत्रकारितेच्या क्षेत्रातील मोठे नाव रूसी करंजिया, चित्रपट क्षेत्र, कला क्षेत्र यांमध्ये गाजलेल्या व्यक्ती आहेत तसेच त्यांची मोठी बहीण, शेजारी यांचीही चित्रणे आहेत. ही निवड काय निकष लावून केली असावी असा विचार केला तेव्हा वाटले, ज्यांच्यात त्यांना माणूसपण भरले आहे असे वाटले. विविध मानवी स्वभावाची अभिव्यक्ती ज्यांच्यात जाणवली अशा व्यक्ती लेखकाने निवडल्या असाव्यात.
ब्लिट्झ हे साप्ताहिक चालवणारे रूसी करंजिया यांनी ‘द डेली’ हे दैनिक काढायचे ठरवले. सुरुवातीच्या काळापासूनच त्यांनी आपल्या बातमीदारांना प्रोत्साहन दिले. कितीही प्रसिद्ध व्यक्तीच्या विरोधात लिहिले तरी आपल्या वार्ताहरांच्या पाठीशी ते कायमच उभे राहिले. याचे काही किस्से आवर्जून वाचण्याजोगे आहेत.
हल्ली प्रसारमाध्यमांचा खूप बोलबाला आहे. त्यांच्या मदतीशिवाय, किंवा तिथे चमकल्याशिवाय कोणतेही आंदोलन, चळवळ यशस्वी होऊ शकत नाही असा नेत्यांचा व कार्यकर्त्यांचा समज झाला आहे. अशा वेळी गांधींजींनी ‘मिठाचा सत्याग्रह’ हे आंदोलन कसे योजले, कसे पार पाडले, त्यामागे किती काय काय घडले, हे मुळातून वाचण्याजोगेच आहे. संगीत व चित्रपट यांच्या आवडीतूनच फिअरलेस नादिया व विवियन ली या दोन अभिनेत्रींबद्दल त्यांनी लिहिले आहे. नादिया ही पुरुषप्रधान क्षेत्रात त्यांचेच काम करणारी नटी. देमार चित्रपटातून स्टंट करून मोहिनी घालणारी. “कलेचा उगम असत्यातून होतो, परंतु ती अंतिम सत्याकडे जाते आणि जगात अमर होते” हे पिकासोचे वचन नादियाने खरे करून दाखवले. त्या काळात नादियाच्या पुरुषी भूमिकांनी व बालगंधर्वांच्या स्त्राr भूमिकांनी सामान्य स्त्रियांच्या मनात ‘सखी’चे स्थान पटकावले होते. ाढा@स-जेन्डरची ही उत्कृष्ट उदाहरणे एकाच काळात असावीत हा अपूर्व योगायोगच.
‘गॉन विथ द विंड’मधील नायिका साकारणारी विवियन ली हिच्याबद्दल वाचताना मनात विविध भावना येतात. घर, प्रेमळ नवरा व लहान मुलगी यांना सोडून जाण्याचा तिचा निर्णय कुटुंबवत्सल मनांना न झेपणाराच आहे, मात्र त्यानंतर तिच्या अभिनयाचे कौतुक वाटल्यावाचूनही राहत नाही. लॉरेन्स ऑलिव्हियेसोबत तिचे आयुष्य कसे गेले, तिने काय मिळवले, काय गमावले, कोणत्या दिव्यांमधून ते गेले हे वाचले की, एक अनामिक उदासीनता मनाला व्यापून उरते.
अशीच काहीशी गत होते शैलेंद्र व मदनमोहन या गुणीजनांविषयी वाचताना. राज कपूर व शैलेंद्र हे एकमेकांना पूरक ठरले. राज कपूरच्या राजूला शैलेन्द्रच्या शब्दांनी एक जाणता सुसंस्कृतपणा दिला, तर शैलेंद्रला विद्रोह, विषमता आणि समाजपरिवर्तनाच्या पलीकडे प्रेम, निसर्ग, उत्सव, सुख-दु:ख यांसारख्या अनेक गोष्टी मानवी जीवनाशी निगडित असतात याचे भान मिळाले. मदनमोहन हे अत्यंत गुणी, पण व्यावसायिकदृष्टय़ा तुलनेने कमी यशस्वी संगीतकार. रागदारीतील सोनं सिनेमाच्या गाण्यात ओतून ती अधिक रसरशीत व उठावदार कशी होतील? पिढय़ान्पिढय़ा पांमित होत आलेलं संगीत लोकांपर्यंत कसं पोहोचवता येईल याच विचाराने त्यांनी काम केले. गाण्यांच्या संख्येवर कधीच प्रेम नाही केले.
“प्रत्येक विषयाला केवळ दोनच नव्हे तर अनेक बाजू असतात. ज्याला जी पटेल त्याने ती स्वीकारावी, मात्र त्या वेळी इतर बाजूंचेही पुरेसे भान असू द्यावे, अन्यथा मी मानतो तीच बाजू खरी, असा विचार प्रबळ होऊ लागून त्यातून अहंकार वाढीस लागतो आणि मग माझीच बाजू श्रेष्ठ, तीच सर्वांनी मान्य करावी या विचारातून पुढे हिंसा घडण्याचा संभाव असतो.” हे कालातीत विधान करणाऱया इस्मत चुगताई यांच्याबद्दल आदर वाटल्याशिवाय राहत नाही. हे लेखन वाचत असताना या व्यक्तींबरोबरचे एकाचवेळी लेखकाचे त्यांच्याशी जोडलेपण आणि लेखक म्हणून एक तटस्थता याचे सुरेख मिश्रण झाले आहे. भाषा हा तर आत्मा. गुणवत्ता शब्दाशी साधर्म्य असणारे ‘अर्थवत्ता’ व ‘रसवत्ता’ हे शब्द जेव्हा लेखक वापरतात तेव्हा त्यांना अभिप्रेत असणारा अर्थ थेटपणे व प्रभावीपणे पोहोचतो. तसेच ‘मनातील चंद्रवादळ’ या शब्दाचेही. काहीशा गूढ वाटणाऱया, पण परिणामकारक असणाऱया मुखपृष्ठापासूनच हे पुस्तक वाचकाची पकड घेते यात मात्र शंका नाही.





























































