खाणं आणि बरंच काही; रंगारंग खाणे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>आरती देवगावकर

भूक लागल्यावर समोर येईल ते गोडच लागते असे म्हटले जात असले तरीही पदार्थ समोर येताक्षणी डोळय़ाला सुखावणारा हवा. त्याची रंगसंगती, त्यांची  मांडणी ही सुखद वाटायला हवी. पांढऱयाशुभ्र भाताची मुद, त्यावर घट्ट पिवळे वरण आणि वर साजूक तूप, पुरणपोळी असेल तर कटाची आमटी नाहीतर बासुंदी, खीर, गुलाबजाम यांतील एखादे पक्वान्न, खालच्या बाजूला पिवळीधम्मक बटाटय़ाची भाजी, पिवळय़ा रंगाचे पापड आणि शुभ्र कुरडय़ा टम्म फुगलेल्या पुऱया… नुसत्या वर्णनानेही तोंडाला पाणी सुटते.

सध्या टीव्हीवर निरनिराळय़ा वाहिन्यांचा नुसता सुळसुळाट झाला आहे. त्यांच्यावर दाखवल्या जाणाऱया दैनंदिन मालिका हे एक वेगळेच प्रस्थ असते. कोणत्याही एका प्रकारच्या मालिकेला प्रेक्षकांची पसंती दिसून आली की, इतर वाहिन्यांवरदेखील त्याच प्रकारच्या मालिकांचा रतीब चालू होतो. ओघानेच त्यातील कलाकारांना अमाप प्रसिद्धी मिळते, त्याच्याबरोबर चांगले मानधनही मिळते. मालिकांच्या जोडीला प्रेक्षक आवडीने पाहतात, असा कार्यक्रम म्हणजे विविध प्रकारचे रिऑलिटी शोज. भले ते स्क्रिप्ट लिहून होत असतील, पण त्याला मोठा प्रेक्षकवर्ग लाभतो हे नाकारता येणार नाही. काही काही शोजचे असे अनेक सीझन होतात. लोक आवडीने पाहत राहतात. यातीलच एक सध्या सुरू असणारा लोकप्रिय शो म्हणजे ‘मास्टर शेफ इंडिया.’ घराघरांतील होम कुकना देशोदेशींच्या पाककृती करताना पाहून भारावून जायला होते. आपल्यासारख्या घरांमधूनच आलेल्या या लोकांना असे विविध प्रकारचे, कधी कधी उच्चारायलासुद्धा अवघड वाटणारी नावे असणारे पदार्थ कसे काय बुवा करता येतात याचे एक कुतूहलमिश्रित आश्चर्य मला कायमच वाटत असते. या सगळय़ाबरोबर अजून एक गोष्ट लक्ष वेधून घेते ती म्हणजे त्या तयार पदार्थांचे समोर येणारे रूप. अहाहा… डिश, त्यात योग्य रीतीने, कलात्मकतेने, रंगसंगतीचा विचार करून मांडलेले नावीन्यपूर्ण पदार्थ, बघताच डोळय़ाचे पारणे फिटते.

आपल्या घरांमधून आपले जेवणही असेच रंगसंगती साधून तयार केले जाते आणि ताटात वाढले जाते. हल्लीचे सोडा, पण पूर्वीच्या काळी वाढल्या जाणाऱया पंगतींची दृश्ये समोर आणली तर आठवेल. समोर पांढरेशुभ्र मीठ, त्याखाली लिंबाची पह्ड, शेजारी हिरवीगार चटणी, चॉकलेटी रंगाचे पंचामृत, पांढरट रंगाची लालसर दाण्याचे कुट असणारी काकडीची कोशिंबीर, पांढऱयाशुभ्र भाताची मुद, त्यावर घट्ट पिवळे वरण आणि वर साजूक तूप, शेजारी मसालेभात ज्याच्यात मटार, तोंडली, गाजर अशा भाज्या डोकावतात आणि वर पखरण असते ओल्या खोबऱयाची आणि कोथिंबिरीची, ताटात जेवणाऱयाच्या उजव्या हाताला मठ्ठय़ाची वाटी, पुरणपोळी असेल तर कटाची आमटी नाहीतर बासुंदी, खीर, गुलाबजाम यांतील एखादे पक्वान्न, खालच्या बाजूला पिवळीधम्मक बटाटय़ाची भाजी, पिवळय़ा रंगाचे पापड आणि शुभ्र कुरडय़ा टम्म फुगलेल्या पुऱया… नुसत्या वर्णनानेही तोंडाला पाणी सुटते.

कोणताही कार्यक्रम असो घरगुती किंवा कार्पोरेट. साधी सत्यनारायणाची पूजा असू दे अथवा लग्न. एवढेच काय अगदी सहज कुणाला घरी जेवायला बोलावले तरी पहिला प्रश्न मनात येतो तो म्हणजे मेन्यू काय करायचा/ठेवायचा? जेवण कसे होते यावर अजूनही बरेचदा आपल्याकडे यजमानाची किंमत केली जाते. ते ते कार्य तिथे असलेल्या जेवणावरून लक्षात ठेवले जाते. हा मेन्यू ठरवताना निरनिराळे निकष लावले जातात. यात एक मुद्दा येतो त्यातील रंगसंगतीचा आणि बहुतेक वेळा सगळय़ात शेवटी येतो त्यातील पौष्टिकतेचा. बऱयाच घरांमध्ये डिशमध्ये वेगवेगळे रंग असतील असे पाहिले जाते. या रंगांतूनच तर वेगवेगळे जीवनावश्यक घटक पोटात जाणार असतात. त्यामुळे एका वेळच्या जेवणात किमान तीन ते चार रंग असावेत असा प्रयत्न कायमच करायला हवा. ते काही फारसे अवघड नाही. आपला पारंपरिक चौरस आहार घेत राहिले आणि योग्य पथ्य पाळले की, झाले.

असे म्हणतात की, कोणताही पदार्थ हा पंचेंद्रियांनी घेण्याचा अनुभव असतो, असायला हवा. घरात पदार्थ बनत असेल तर त्याची वर्दी आधीच तुमच्या घाणेंद्रियाला आणि कर्णेंद्रियाला मिळते. तापलेल्या तेलाचा वास येतो, त्यात पडणाऱया जिरे-मोहरीचे तडतडणे ऐकू येते, मागोमाग त्यात पडणाऱया इतर घटक पदार्थांचा वास घरभर घमघमतो आणि भूक चाळवतो. जठराग्नी प्रज्वलित करण्याचे सामर्थ्य या दोन्हीत असते. कधी एकदा खाणे पुढय़ात येते असे होऊन जाते. भूक लागल्यावर समोर येईल ते गोडच लागते असे म्हटले जात असले तरीही पदार्थ समोर येताक्षणी डोळय़ाला सुखावणारा हवा. त्याची रंगसंगती, त्यांची  मांडणी ही सुखद वाटायला हवी. साधे पोहे केले तरी एका डिशमध्ये भसकन वाढलेले पोहे आणि दुसरीकडे नीटनेटकेपणाने वाढलेले पोहे, त्या पिवळय़ाशार रंगावर हिरवीगार कोथिंबीर आणि वर थोडे पांढरे खोबरे, शेजारी पिवळट रंगाची लिंबाची पह्ड… बघा बरे, काय आवडेल तुम्हाला? त्यानंतर त्याचा स्पर्श… तुम्ही हाताने खाणारे असाल, तर बोटांना लगेच समजते पदार्थाचे टेक्श्चर कसे झाले आहे. तो कच्चा, कडक आहे की मऊ, लुसलुशीत? हाताने खात नाही, चमचाच लागतो तरी हरकत नाही. चमच्याने उचलून पदार्थ जिभेवर ठेवताक्षणी समजतात या बाबी. त्याच वेळी त्याची चव कशी आहे याचेही ज्ञान आपली जीभ करून देते. वासावरून काही आडाखे बांधले गेलेले असतात खाणाऱयांचे. त्या कसोटीला उतरणारा पदार्थ झाला आहे किंवा नाही हे ठरवण्याचे काम या लहानशा जिभेचे. या सगळय़ा इंद्रियांच्या माध्यमातून जे अन्नब्रह्म पोटात जाते त्याने मन कधी सुखावते, तर क्वचित कधी वैतागतेदेखील. मन असे असमाधानी राहू नये म्हणून जेवणात आणि त्यायोगे आयुष्यात रंग भरा, मस्त खा नि स्वस्थ रहा.

(लेखिका अनुवादक व समतोल या द्वैमासिकाच्या संपादक आहेत.)

– [email protected]