
>> आशुतोष बापट
माझ्या गोव्याच्या भूमीत वनश्रीची कारागिरी,
पानाफुलांची कुसर पशुपक्ष्यांच्या किनारी
कवी बा. भ. बोरकरांनी वर्णन केलेल्या या रम्य गोव्यात निसर्गसौंदर्य ओतप्रोत भरलेले आहे. ते निव्वळ सागरकिनारे आणि काजू-मासे यात दडलेले नसून चौफेर असलेली गर्द दाट झाडी, त्यातून वाहणारे निळेशार पाणी आणि साथीला हिरवेगार डोंगर यामध्ये सामावलेले आहे. गोव्यात सुंदर, देखणी आणि प्रसिद्ध मंदिरे तर आहेतच, परंतु तितकीच प्राचीन, पुरातन आणि निसर्गाच्या कुशीत दडलेली तेवढीच सुंदर मंदिरे पाहायला मिळतात.
नितांतसुंदर गोवा म्हणजे खरोखरच निसर्गाने बहाल केलेला एक सुंदर दागिना आहे. अतिशय रम्य प्रदेश. पर्यटकांची वर्षभर झुंबड असूनसुद्धा स्वतःचे वेगळेपण जपणारा गोवा आणि तिथे असलेली अनेक निसर्गरम्य ठिकाणे अक्षरशः वेड लावतात. त्या शांत, निवांत ठिकाणांना जर ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभली असेल तर त्याचे महत्त्व द्विगुणीत होते.
सप्तकोटीश्वर हे त्यातलेच एक ठिकाण… नितांत रमणीय, शांत, चारही बाजूंनी डोंगरांनी वेढलेले हे स्थान. शंकराचे जुने मंदिर. गोव्यातल्या शैलीनुसार एक मोठी दीपमाळ आणि स्वच्छ, सुंदर परिसर. गोमंतक अर्थात गोवा हा एकेकाळी संपन्न अशा कदंब राजवटीचा एक भाग होता. ‘श्रीसप्तकोटीश्वरलब्धवर प्रसाद’ अशी बिरुदावली दिमाखाने मिरवणाऱया कदंबांचे हे तीर्थक्षेत्र. पुढे जुलमी पोर्तुगीज सत्ताधीशांकडून याची बरीच विटंबना केली गेली, परंतु छत्रपती शिवरायांनी याचा जीर्णोद्धार केला. त्या प्रसंगाचे वर्णन करणारा शिलालेख मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर कोरलेला आजही दिसतो. श्रीसप्तकोटीश शके 1590 किलकाब्दे कार्तिक कृष्ण।। पंचम्यां सोमे श्रीशिवराज्ञा देवालायस्य प्रारंभः।। असा तो शिलालेख. हे मंदिर खडकात खोदलेले आहे. मंदिराच्या पाठीमागे सलग खोदलेल्या कमानी दिसतात. पाठीमागच्या बाजूला एक पाखाडी असून ती चढून वर गेले की, मंदिर परिसर सुंदर दिसतो. पणजी-म्हापसा-डिचोली मार्गे आपण नारवे इथे जाऊ शकतो. मंदिरापर्यंत सुंदर डांबरी रस्ता केलेला आहे. याच मंदिराच्या जवळ असलेल्या देवीच्या मंदिरातील महिषासुरमर्दिनीची मूर्ती प्रेक्षणीय आहे. दाट झाडीत लपलेले हे स्थान प्रेक्षणीय आहेच परंतु शिवरायांची पायधूळ ज्या ठिकाणी लागली ते स्थान आपण मुद्दाम जाऊन पाहिले पाहिजे. गोव्याच्या भेटीत सप्तकोटीश्वर दर्शन हे अगदी अनिवार्य आहे.
शिवरायांनी जीर्णोद्धार केलेले सप्तकोटीश्वर देवालय जसे रमणीय ठिकाणी वसले आहे तसेच अजून एक सुंदर देवालय गोव्याच्या भूमीत निसर्गरम्य ठिकाणी वसले आहे. त्याचे नाव तांबडी सुरला. गोव्यामधील सर्वात प्राचीन असे हे मंदिर. मोलेम अभयारण्यात वसलेले, कदंब राजवटीमध्ये बांधलेले हे देखणे देवालय अतिशय सुंदर, निवांत आणि अत्यंत देखणे असे आहे.
पोर्तुगीजांच्या अनन्वित छळवणुकीतून हे देवालय वाचले हे खरेतर भाग्यच म्हणावे लागेल. पणजी-फोंडा-धारबांदोडा मार्गे तांबडी सुरला हे अंतर 75 कि.मी. इतके भरते. हा सगळाच रस्ता हिरव्यागार झाडांच्या कमानीमधून जात असतो. गोव्यातून देशावर जाण्यासाठी विविध घाटमार्ग आहेत. त्यातल्या अनमोड घाटाच्या पायथ्याशी हे नितांतसुंदर मंदिर वसलेले आहे. सह्याद्रीच्या अगदी पायथ्याशी हे मंदिर असल्यामुळे सह्याद्रीने याला कवेत घेतल्यासारखे जाणवते. बाजूनी वाहणारा बारमाही ओढा, याला स्थानिक भाषेत ‘वझर सकळाचो वहाळ’ असं म्हणतात. सर्वत्र हिरवीगार झाडी आणि पूर्वेकडे पहाडासारखा उभा असलेला सह्याद्री अशा सगळ्या निसर्गचित्रात हे काळ्या पाषाणातील मंदिर ठसठशीतपणे उठून दिसते. क्लोराईड शिष्ट जातीच्या दगडात बांधलेले हे मंदिर पूर्वाभिमुख असून मंदिराला गर्भगृह, अंतराळ आणि मुखमंडप अशी रचना आहे. मुखमंडपात मूर्तिकाम केलेले दगडी चार खांब पाहायला मिळतात. या मुखमंडपाला तीन बाजूंनी प्रवेश करता येतो. इथे असलेल्या चार खांबांपैकी एका खांबावर हत्तीच्या पायाखाली तुडवला जाणारा घोडा फारच आकर्षकरीत्या कोरलेला दिसतो. या मुखमंडपात अजून एक बघण्यासारखी गोष्ट म्हणजे इथे असलेले दगडी झुंबर. मुखमंडपाच्या छतावर अतिशय सुंदर दगडी झुंबर कोरलेले दिसते. त्याच्या चारही बाजूंनी सुशोभीकरणासाठी कीर्तिमुखेसुद्धा कोरलेली आहेत.
गर्भगृहाच्या दाराशी असलेली जाळीची नक्षी होयसळ स्थापत्य शैलीची आठवण करून देते. गर्भगृहात शिवपिंड पाहायला मिळते. मंदिराच्या बाह्यभागावर मूर्तिकाम नाही, परंतु खास कदंब नगर शैलीमधील शिखरावरील पश्चिमेला नृत्यशिव आणि पार्वती, उत्तरेला गणपतीसह गजलक्ष्मी, दक्षिणेला भैरव आणि ब्रह्मा तर पूर्वेला लक्ष्मी नारायणाची शिल्प आवर्जून पाहण्यासारखी आहेत. मंदिराच्या चहूबाजूंनी सुंदर हिरवळ राखलेली आहे. मंदिराचे दर्शन अत्यंत लोभसवाणे असे दिसते. इ.स.च्या 13 व्या शतकात बांधलेल्या या कदंब शैलीतील मंदिराची तुलना धारवाड जिह्यातल्या कल्लेश्वर किंवा बेळगाव जिह्यातील जैन मंदिरांशी केली जाते. गोव्याच्या समृद्ध आणि निसर्गसंपन्न भटकंतीमधे तांबडी सुरला मंदिराचा समावेश अवश्य केला जावा.




























































