
>> आशुतोष बापट
कर्नाटकात चालुक्यांच्या पाऊलखुणा धुंडाळताना एक खजिना गवसला. राष्ट्रकूट, कदंब, चालुक्य अशा राजवटींच्या काळातले एक महत्त्वाचे नगर ‘बंदलिके’. इथे जैन शांतीनाथ बसदी, त्रिमूर्ती नारायण मंदिर आणि सोमेश्वर मंदिर अशी ठिकाणं आहेत. अप्रतिम कलाकुसर, कोरीव व देखणं शिल्पकाम असलेली ही मंदिरे पाहण्याचा अनुभव अद्भुत असाच असतो.
एकदा धोपट वाट सोडून आडवाटेवर जायची सवय लागली की पाय आपोआप तिकडे वळतात. मग ती आडवाट कोकणातली असो, मराठवाडय़ातली असो किंवा कर्नाटकातली असो. बऱयाचदा आडवाटेवर काहीसा दुर्मिळ आणि सुंदर खजिना सापडतो आणि तो जो आनंद असतो तो अवर्णनीय असतो. कर्नाटक प्रांत हा वारसा स्थळे, संस्कृती, कला यांनी समृद्ध आहे. मोठमोठी ठिकाणं तर इथे आहेतच, पण इथल्या आडवाटेवरसुद्धा कमालीची सुंदर स्थळं आणि देखणी ठिकाणं सापडतात. कर्नाटकात चालुक्यांच्या पाऊलखुणा धुंडाळताना असाच एक खजिना गवसला. शिरसी-बनवासी-बळ्ळीगावी असं हिंडत असताना आणि तिथली देखणी मंदिरं बघत असताना बळ्ळीगावी या ठिकाणी एक प्राथमिक शिक्षक भेटले. मोडक्यातोडक्या हिंदी-इंगजीमध्ये त्यांचाशी बोलत होतो. इतक्या लांब ही मंदिरं बघायला मी आलोय हे कळल्यावर त्यांनी आवर्जून काही ठिकाणं सुचवली. त्यातले एक होते ‘बंदलिके’. ‘बळ्ळीगावीवरून तालेगुंडा, बिलकी, शिरीहळ्ळीमार्गे फक्त 15 किमी आहे. तुम्ही अवश्य जा तिथे’, असं अगदी अजिजीने सांगत होते. रस्ता कळणारा नाही म्हणून या मधल्या गावांची नावे कानडीमध्ये लिहून दिली आणि ‘लोकांना हे दाखवा, ते वाट दाखवतील’ असे सांगितले. त्यांचा आग्रह बघूनच बंदलिकेला जायचे ठरवले आणि तिथे मोठा खजिनाच हाती आला.
बंदलिके हे इ.स.च्या 10 व्या शतकातले एक महत्त्वाचे शहर होते. राष्ट्रकूट, कदंब, चालुक्य अशा राजवटींच्या काळातले एक महत्त्वाचे नगर होते. नगरखंड-70 या प्रदेशाच्या राजधानीचं हे नगर. जैन आणि कालामुख या संप्रदायांचे हे महत्त्वाचे केंद्र. बंदलिकेचा इतिहास हा इथे मिळालेल्या 31 शिलालेखांवरून समजला आहे. काही शिलालेखांतून याचे नाव ‘बांधवपुरा’ असेही आले आहे. या गावी जैन शांतीनाथ बसदी, त्रिमूर्ती नारायण मंदिर आणि सोमेश्वर मंदिर अशी ठिकाणं आहेत. बंदलिके इथे खूप मोठा पाण्याचा तलाव आहे. इथली मंदिरे या तलावाच्या आजूबाजूलाच वसली आहेत. त्यातल्या शांतीनाथ बसदीमध्ये आता कुठलीही मूर्ती नाही. मुखमंडप, सभामंडप, अंतराळ आणि गाभारा अशी या बसदीची रचना आहे.
त्रिमूर्ती नारायण मंदिर हे तीन गाभारे असलेले मंदिर आहे. इ.स. 1160 मधे बांधलेले खास कल्याणी चालुक्य शैलीचे मंदिर. मुख्य मंदिरात विष्णूची उभी मूर्ती असून बाजूच्या दोन गाभाऱयांत शिवलिंगे आहेत. गाभाऱयाचे दार, त्याला दगडी जाळी, ललाटबिंब म्हणून गजलक्ष्मी अशी सगळी चालुक्यांची वैशिष्टय़े इथे दिसतात. तीनही गाभारे असेच सजवलेले आहेत. मंदिराच्या परिसरात बरेच वीरगळ मांडून ठेवलेले. काही वीरगळांवर जुन्या कानडी लिपीतले लेख कोरले आहेत. कुण्या वीराचे हे स्मारक त्याच्या देहत्यागानंतरसुद्धा वर्षानुवर्षे इथे उभे आहे. परिसरात अनेक लढाया झालेल्या असणार, त्याशिवाय हे एवढे वीरगळ इथे दिसायचे नाहीत. हे बघून बाहेर पडत असताना तिथला पुरातत्त्व विभागाचा सेवक माझ्यापाशी आला आणि ‘सोमेश्वर मंदिर बघितलं का?’ असं विचारलं. मी ‘नाही’ म्हटल्यावर मला म्हणाला, ‘मग एवढय़ा लांब येऊन काय बघितलं तुम्ही?’ मला हाताला धरूनच तो एका छोटय़ाशा उंचवटय़ापलीकडे घेऊन गेला. तिथे एक छोटेखानी देऊळ वसले आहे. आम्ही पाठीमागच्या बाजूने गेलो. माझ्या चेहऱयावरील आश्चर्य बघून तो म्हणाला, ‘पुढे तर चला…’ समोरच्या बाजूला गेल्यावर एक मंदिर त्याचा दरवाजा बंद असलेला, पण त्या दरवाजाच्या दोन्ही बाजूंना दोन शिल्पपट! एकावर रामायण कोरलेलं आणि दुसऱया बाजूच्या शिल्पपटावर महाभारत कोरलेलं. वरपासून खालपर्यंत सात पट्टय़ा. खालून वर बघत जायचे की, रामायण आणि महाभारताच्या कथा दिसू लागतात. सगळी शिल्पं अगदी प्रमाणबद्ध आणि फार सुंदर. अगदी बारीक, पण कमालीचं कोरीव आणि देखणं शिल्पकाम केलेलं. ते बघून थक्क व्हायला झालं. बाकी मंदिर अगदी साधं. नगरखंड-70 चा प्रशासक बोप्पसेट्टी याने हे मंदिर इ.स. 1274 साली बांधले. गाभाऱयात शिवलिंग, ललाटावर गजलक्ष्मी आणि बाहेर दोन बाजूंना हे अफाट शिल्पवैभव.
कोण कधी कुठे कशासाठी एखादं मंदिर बांधेल… तेव्हा त्यांचा काय उद्देश असेल…आणि ते मंदिर शेकडो वर्षांनतरही त्या माणसाची महती सांगत उभे असेल हे सगळं आश्चर्यकारक म्हणायला हवं. त्याचबरोबर रामायण आणि महाभारत हे भारतीयांच्या मनात किती खोलवर रुजले आहे याची प्रचीती इथे आली. असं वाटलं की, हे रामायण आणि महाभारताचे शिल्पपट दाखवण्यासाठीच जणू हे मंदिर बांधले आहे की काय! त्या पुरातत्त्व विभागाच्या सेवकाचे मनोमन आभार मानले. तो म्हणाला, ‘इथे येणारी माणसे हे न बघताच जातात म्हणून माझं त्यांच्यावर बारीक लक्ष असतं.’ मला आपले राज्य आठवले. जाऊ दे. इतके सुंदर आणि देखणे शिल्पवैभव कर्नाटकात अगदी आडभागात वसले आहे ते बघता आले. भटकंती समृद्ध झाली. देवाक काळजी दुसरं काय!
– [email protected]
(लेखक लोक संस्कृतीचे अभ्यासक आहेत)