लसीकरण हाच समर्थ उपाय!

>> अभिपर्णा भोसले

कोरोनाच्या पहिल्या लाटेने जर काही शिकवले असेल तर सार्वजनिक संपर्काची वारंवारिता लक्षणीयरीत्या कमी केल्याशिवाय आणि संक्रमित रुग्णांचे विलगीकरण करून कोरोना चाचणीची वारंवारिता वाढविल्याशिवाय आपण दुसऱया लाटेला सामोरे जाऊ शकत नाही. जलद गतीने पसरणाऱया आणि दुसऱया लाटेसाठी जबाबदार असलेल्या कोरोनाच्या नवीन स्ट्रेन्सपासून होणाऱया संक्रमणाची साखळी तोडून जास्तीत जास्त जीव वाचवण्यासाठी लसीकरण हाच आवश्यक व समर्थ उपाय आहे.

शीतयुद्धानंतर मागची तीन दशके हिंदुस्थानशी मैत्रिपूर्ण संबंध असलेल्या अमेरिकेने गत काही महिन्यांतील निक्रियतेला वळसा घालून लस तयार करण्यासाठी लागणारी सामग्री आणि रेमडेसिवीर हिंदुस्थानला पुरवण्याचा निर्णय घेतला आणि तिसऱया टप्प्यातील वेगवान लसीकरणासाठी आपण सुसज्ज होऊ शकतो, असा विश्वास निर्माण झाला. फ्रान्स आणि जर्मनीसोबतच अगदी चीन-पाकिस्तानसारख्या हिंदुस्थानशी फारसे सौहार्दपूर्ण संबंध नसलेल्या देशांनीही मदत देऊ केली. अर्थात कोणतीही आंतरराष्ट्रीय मदत ही केवळ दानशूर कृती नसते, त्यामागे परस्पर अपेक्षा आणि हेतू असतातच. रेमडेसिवीरची साठेमारी, हॉस्पिटल बेड्सची अनुपलब्धता आणि ऑक्सिजन सिलिंडर्सची कमतरता यांच्याशी दोन हात करणाऱया यंत्रणेसमोर लसीकरण हाच एक प्रभावी उपाय आहे.

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या संशोधन अहवालानुसार मेच्या तिसऱया आठवडय़ात हिंदुस्थानातील दुसरी कोविड-19 लाट सर्वांत जास्त ऍक्टिव्ह केसेसचा टप्पा गाठेल. या अहवालात असेही नमूद करण्यात आले आहे की इतर देशांमध्ये दुसऱया लाटेत जेव्हा सर्वाधिक रुग्ण आढळत होते तेव्हा रिकव्हर होणाऱया रुग्णांची संख्याही तुलनेने जास्त होती. हिंदुस्थानात मात्र फेब्रुवारी महिन्याच्या तिसऱया आठवडय़ापर्यंत असणारा 97.3 रिकव्हरी रेट हळूहळू कमी होत 85 पर्यंत खाली आला आहे. या अहवालात असे म्हटले आहे की कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये सर्वांत अगोदर सर्वाधिक रुग्ण आढळले आणि त्यानंतर हिंदुस्थानातील रुग्ण संख्येने सर्वोच्च टप्पा गाठला. सध्या महाराष्ट्रातील नवीन केसेसचे प्रमाण स्थीर झाल्याचे दिसून येत आहे; परंतु छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि गुजरात या राज्यांमध्ये उत्तरोत्तर केसेस वाढत असताना दिसून येत आहे. तसेच दिवसागणिक होणाऱया वाढीचा दरही वाढत आहे. जर इतर राज्यांनीही महाराष्ट्र आणि दिल्लीप्रमाणे कडक लॉकडाऊन लागू केले तर राष्ट्रीय पातळीवरील रुग्ण संख्येचा सर्वोच्च आकडा अधिकाधिक लवकर गाठता येईल, असा या अहवालाचा सारांश आहे.

तिसऱया टप्प्यातील बदल

1 मेपासून अठरा वर्षांवरील नागरिकांना कोरोना लसीकरण मोहिमेत सहभागी करून घेतले जाईल. हा लसीकरण धोरणाचा तिसरा टप्पा असेल. पहिल्या तीन टप्प्यांत आरोग्य सेवा कर्मचारी, फ्रंटलाइनवर काम करणारे कर्मचारी आणि 45 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना मोफत लस दिली गेली तेव्हा केंद्र सरकारने सिरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया (कोव्हिशिल्ड) आणि भारत बायोटेक(कोव्हॅक्सिन) निर्मात्यांकडून लस खरेदी केली आणि ती राज्यांना वितरीत केली. राज्यांनी उभारलेल्या सरकारी लसीकरण केंद्रांमध्ये ही लस विनाशुल्क देऊ केली तर खासगी दवाखान्यांत लसीकरणासाठी अडीचशे रुपये प्रती डोस असे शुल्क आकारले गेले. राज्यांना केला जाणारा लसपुरवठा लसीकरण करण्यासाठी झालेली नोंदणी आणि एकंदरीत मागणी यांच्या अनुषंगाने केला जात होता. 1 मेपासून होणाऱया लसीकरणामध्ये लसीचा पुरवठा हा दोन प्रकारांमध्ये विभागला जाईल 50 टक्के वितरण केंद्र सरकारकडून तर 50 टक्के वितरण खुल्या बाजारात केले जाईल. खुल्या बाजारातील वितरणामध्ये राज्य सरकार, खासगी रुग्णालये आणि उद्योग यांपैकी ज्यांच्याकडे लस देण्याची सुविधा आहे त्यांना थेट उत्पादकांकडून डोस घेता येणार आहे. केंद्र सरकारकडे असलेल्या पन्नास टक्के साठय़ापैकी लसीचे वितरण हे एकूण ऍक्टिव्ह केसेस आणि प्रशासनाची सुलभता या निकषांवर केले जाईल.

18 वर्षे व त्यावरील वयाच्या प्रत्येकाचे लसीकरण करण्यासाठी एकूण जीडीपीच्या केवळ 0.36 टक्के इतकाच खर्च येईल, असे इंड-रा (इंडिया रेटिंग्ज अँड रिसर्च एजन्सी) चे अनुमान आहे. जर ही रक्कम केंद्र सरकार आणि राज्य सरकारमध्ये विभागली गेली तर ती केंद्रीय अर्थसंकल्पात 0.12 टक्के आणि राज्य अर्थसंकल्पात 0.24 टक्के अशी विभागली जाईल. 1 मे पासून 18 वर्षे व त्यावरील वयाच्या व्यक्तींचे लसीकरण तिसऱया टप्प्यात समाविष्ट करण्यात आल्याने एकूण 133 कोटींपेक्षा जास्त असलेल्या लोकसंख्येपैकी 84 कोटी लोकसंख्या कोविड-19 च्या लसीकरणासाठी पात्र असेल. केंद्र सरकारच्या म्हणण्यानुसार या टप्प्यात लसीची किंमत, उपलब्धता, पात्रता आणि प्रशासन यांबाबत शक्यतो अधिकाधिक लवचिकता बाळगण्याचा प्रयत्न केला जाईल. कॉर्पोरेट क्षेत्रातील मोठय़ा कंपन्यांनी समूह लसीकरण राबवल्यास सरकारी यंत्रणेवरील ताण कमी होईल. तसेच केंद्र आणि राज्य सरकारांच्या अर्थसंकल्पावरील भार हलका होईल. लसीकरणामुळे तयार झालेल्या अँटीबॉडीज शरीरामध्ये 12 ते 18 महिन्यांच्या कालावधीसाठी टिकून राहतील आणि त्यामुळे लसीकरणावरील शासनाचा खर्च हा वारंवार उद्भवणारा असेल. महाराष्ट्र, दिल्ली, राजस्थान, तेलंगणा, कर्नाटक, हरयाणा, ओडिशा, झारखंड, पश्चिम बंगाल, केरळ, छत्तीसगड, गुजरात, उत्तर प्रदेश, पंजाब, बिहार, हिमाचल प्रदेश, सिक्कीम, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश आणि आसाम या राज्यांमधील सरकारी सुविधा केंद्रांमध्ये 18 वर्षे त्यावरील व्यक्तींसाठी लसीकरण मोफत असेल.

लसीकरणाची अपरिहार्यता

जगातील कोणत्याही देशात लसींची खुल्या बाजारात विक्री अद्याप तरी करण्यात आलेली नाही. यामागील कारण असे आहे की जगभरात वापरल्या जाणाऱया सर्व लसींना फक्त इमर्जन्सी युज ऑथोरायझेशन म्हणजेच शेवटचा पर्याय म्हणून वापरण्याची परवानगी मिळाली आहे. उपलब्ध लसींपैकी कोणत्याही एका लसीला अद्याप पूर्ण नियामक प्राधिकरण प्राप्त करण्यासाठी आवश्यक असलेली पात्रता मिळालेली नाही. तसेच सुरक्षा आणि प्रभावीपणाबद्दलही पुरेसा पुरावा सादर करण्यात आलेला नाही. मे महिन्याच्या अखेरीस स्पुटनिक व्ही या रशियन लसीचे आगमन देशात होण्याची शक्यता आहे. डॉक्टर रेड्डीज प्रयोगशाळांसोबत रशियन लसीचा 25 कोटी डोस वाटप करण्याचा करार आहे; परंतु यापैकी किती डोस हिंदुस्थानात उपलब्ध असतील याची शाश्वती देता येणार नाही. आवश्यक डोस संख्या आणि लसीची किंमत यावर कंपनी अद्याप सरकारशी चर्चा करत आहे. फायझरने दिलेल्या माहितीनुसार ते केवळ सरकारला पुरवठा करण्याची योजना आखत आहे; परंतु करार कधी होईल आणि ते किती डोस देऊ शकतील याबद्दल काही माहिती नाही. ‘इंडिया रेटिंग्ज ऍण्ड रिसर्च एजन्सी’च्या मते दुसऱया लाटेचा सर्वाधिक परिणाम बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड, मणिपूर, आसाम, मध्य प्रदेश आणि ओडिशावर होण्याची शक्यता आहे. या राज्यांमधील लोकसंख्येची घनता आणि वैद्यकीय सुविधांची वानवा पाहता कोरोनाच्या दुसऱया लाटेला सामोरे जाताना इतर देशांनी ज्याप्रमाणे जास्तीत जास्त लसीकरणावर भर दिला, तोच मार्ग हिंदुस्थानसमोर आहे. रशियाने तयार केलेल्या स्फुटनिक व्ही लसीला कोरोनावरील इतर लसींप्रमाणे इमर्जन्सी वापरासाठी अमेरिका, युरोपियन युनियन आणि जागतिक आरोग्य संघटनेने मान्यता दिली. यामुळे हिंदुस्थानातही एक नवा पर्याय उपलब्ध होईल.

  • [email protected]
    (लेखिका दिल्ली विद्यापीठात कायद्याच्या विद्यार्थिनी आहेत)
आपली प्रतिक्रिया द्या