
>> अमोल उदगीरकर
आपल्याकडे स्वप्नं हाईटच नाही तर जाडी, रंग याचा अदमास घेऊनच बघावीत अशी एकूण परिस्थिती आहे. फिल्म इंडस्ट्रीमध्ये डोळय़ांत स्वप्न घेऊन येणारे सगळेच लोक सुंदर, उंचीपुरी, प्रमाणबद्ध शरीराचे असतात असा एक गैरसमज आहे. पण या निकषांमध्ये न बसणारे अनेक लोक पण अभिनय करण्यासाठी येत असतात. अशा कलाकारांच्या फिल्मी दुनियेचा अवकाश मांडणारा लेख.
शाहरुखच्या ‘झीरो’मध्ये एक भारी डायलॉग आहे, ‘सपने कभी हाईट देखके नही आते.’ अगदी खरं. पण ज्या देशात लोकांना रंगावरून, उंचीवरून, जाडीवरून किंवा शरीर न्यूनातून जज केलं जातं किंवा हिणवलं जातं त्या देशात गोष्टी इतक्या साध्या-सरळ कधीच नसतात. आपल्याकडे स्वप्नं हाईटच नाही तर जाडी, रंग याचा अदमास घेऊनच बघावीत अशी एकूण परिस्थिती आहे. फिल्म इंडस्ट्रीमध्ये डोळय़ांत स्वप्न घेऊन येणारे सगळेच लोक सुंदर, उंचीपुरी, प्रमाणबद्ध शरीराचे असतात असा एक गैरसमज आहे. पण या निकषांमध्ये न बसणारे अनेक लोक पण अभिनय करण्यासाठी येत असतात. अतिशय कमी उंची असणारे लोक (dwarf), अतिशय जाडे लोक पण यात असतात. अगदी कळत्या वयापासून रस्त्यावर चालताना लोक आपल्याकडे वळून बघतात किंवा हसतात याची जाणीव या लोकांना झालेली असते. मग फिल्म इंडस्ट्री यांना कुठले रोल ऑफर करते? गेस! हिंदुस्थानी फिल्म इंडस्ट्री त्यांना बुटक्या, जाड लोकांचेच रोल ऑफर करते.
परंपरा खूप मोठी आणि लांब आहे. अगदी मुकरी आणि टुनटुनपासून सुरू होणारी. बॉलीवूडला किंवा सगळय़ाच हिंदुस्थानी फिल्म इंडस्ट्रीला धार्मिक-व्यावसायिक-जातीय stereotypes तयार करण्याची जुनी खोड आहे. उदाहरणार्थ जाडी लोकं सतत खात असतात असा एक समज सिनेमाने फार पसरवला आहे. गुड्डी मारुती किंवा टुनटुन यांच्यावर चित्रित झालेल्या बहुसंख्य प्रसंगांमध्ये त्यांच्या हातात खाण्याच्या गोष्टी असतात आणि त्या दोघी वचा वचा, बघणाऱ्याला किळस येईल अशा पद्धतीने त्या खात असतात असं दाखवलं असतं. देवगणच्या ‘दिलजले’मध्ये एक प्रसंग आहे. सोनाली बेंद्रे अजयला प्रेमपत्र लिहीत असते. पण अजयला हे प्रेमपत्र कोण लिहीत आहे हे माहीत नसतं. मग सोनाली एका जाडय़ा पोरीला (त्या पोरीला खऱ्या आयुष्यात काही तरी mental condition असावी असं वाटतं.) पुढे करून हीच तुला प्रेमपत्र पाठवते असा समज करून देते. मग ती जाडी पोरगी शेलाटय़ा देवगणच्या मागे धावायला लागते आणि देवगण पळायला लागतो. अशा किळसवाण्या पद्धतीने सीन चित्रित केला आहे. पण टुनटुन ऊर्फ उमादेवीच्या नावावर एक जगावेगळी कामगिरी आहे हे फारसं कुणाला माहीत नाही. बाईंनी कलाकारांची संघटना बांधण्यात मोठी कामगिरी बजावली. आज मोठय़ा प्रमाणात लहान-मोठय़ा अभिनेत्यांना अगदी सलमान खानपासून ते कोरसमध्ये नाचणाऱया एक्स्ट्राला मदत करणाऱया सिने आर्टिस्ट असोसिएशनची बांधणी करण्यात उमादेवींचा मोठा वाटा आहे.
लिलिपुट हा आपल्याकडचा सगळय़ात दीर्घकाळ टिकलेला, उंचीने कमी असणारा नट असावा. नुकतीच त्याची एक मुलाखत वाचण्यात आली, ज्यात तो कामासाठी निर्माता दिग्दर्शकांकडे केविलवाणी आर्जव करत होता. तो सांगत होता की, तो एका निर्मात्याकडे काम मागायला गेला होता. त्याने तुझ्यापेक्षा तर तुझा मोबाईल नंबर जास्त लांब आहे असं सांगून त्याची बोळवण केली होती. इंद्रवर्धन पुरोहित नाव वाचून हे कुणीतरी भारदस्त व्यक्तिमत्त्व असावं असं वाटत असतं. पण हा इंद्रवर्धन राजपूत म्हणजे ‘कोई मिल गया’मध्ये जादू या एलियनची भूमिका करणारा नट. त्याच्या युनिक बुटकेपणामुळे त्याच्या नावावर जवळपास पाचशे प्रोजेक्ट आहेत. हॉलीवूडच्या ‘हॉबिटस्’मध्ये त्याने एक भूमिका केली होती. ‘जादू’ ही त्याची सगळय़ात गाजलेली भूमिका, पण त्याचा चेहरा त्यात लोकांसमोर कधीच आला नाही. 2014 मध्ये इंद्रवर्धन पुरोहित वारला तेव्हा कोणाला कानोकान खबर पण नव्हती.
काळानुसार परिस्थिती बदलत चालली आहे. ‘दम लगा के हैशा’मध्ये पदार्पण करणारी जाडजूड भूमी पेडणेकर अशा बदलांचं एक प्रतीक आहे. विद्या बालनसारखी चतुरस्र नटी आपल्या वाढीव वजनाचा थोडाही गंड बाळगत नाही.
नुकतीच हॉलीवूडच्या सगळय़ात जास्त आर्ंनग असणाऱ्या नटय़ांची यादी प्रकाशित झाली. त्यात वयस्कर आणि जाडजूड असणाऱ्या थोडक्यात हॉलीवूड नटय़ांशी संबंधित सगळे स्टिरीओटाइप्स मोडणारी मेलिसा मॅकार्थी सगळय़ात आघाडीवर आहे. पण विद्या बालन झाली किंवा भूमी असेल या अन्नसाखळीतील शेवटच्या पायरीवर आहेत. लिलिपुट, गुड्डी मारुती, इंद्रवर्धन पुरोहित आणि कित्येक शारीरिक व्यंग असणाऱ्या लोकांना कधीही चांगल्या भूमिका, आर्थिक स्थैर्य, मान-सन्मान मिळाला नाही. या लोकांना फिल्म इंडस्ट्रीमध्ये आपण जावं आणि स्टार बनावं असं नेमकं का वाटलं असेल, पीटर डिंक्लेज स्टार फक्त बाहेरच्या देशात बनू शकतो. हिंदुस्थानात असता तर विदुषकी भूमिका देऊन आपण त्याला कधीच गुंडाळून टाकलं असतं. सर अपने देश मे सपने सिर्फ हाईट ही नही, रंग, साईझ, जात, धर्म देख के ही आते है.




























































