
>> अनंत जाधव
महाराष्ट्रात प्राथमिक आणि द्वितीय आरोग्य सेवा ही शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाद्वारे प्रदान केली जाते. तर तृतीय आरोग्य सेवा प्रामुख्याने शासनाच्या वैद्यकीय शिक्षण आणि औषध विभागाद्वारे प्रदान केली जाते. महाराष्ट्र शासनदेखील महानगरपालिका, नगर परिषदा यांच्या मार्फत शहरी क्षेत्रात प्राथमिक द्वितीय आणि तृतीय आरोग्य सेवा प्रदान करते. शहरात किंवा जिह्यात मोठय़ा लोक संख्येसाठी पुरेशा आणि दर्जेदार आरोग्य सेवा, सुविधा पुरवण्यासाठी मजबूत पायाभूत सुविधा व सेवा असणे आवश्यक आहे. तशी सुविधा ग्रामीण तसेच दुर्गम भागात नसते का? आणि असेल तर त्याला अपवाद महाबळेश्वर तालुका असू शकतो का?
स्पष्ट बोलायचे तर महाबळेश्वर तालुक्यातील दुर्गम भागात आरोग्य सेवेची वानवा दिसत आहे. याला जबाबदार कोणाला धरायचे हा एक मोठा गहन प्रश्न आहे. महाबळेश्वर तालुक्याने महाराष्ट्रासारख्या प्रगत, विकसित, आर्थिकदृष्टय़ा सक्षम राज्याला उपमुख्यमंत्री, मंत्री दिले व सद्य परिस्थितीत कार्यरत आहेत. मुख्यमंत्री व सध्याचे उपमुख्यमंत्री यांनी महाबळेश्वर ते तापोळा रस्ता चौपदरीकरण केला. महाबळेश्वर सिटीत पर्यावरणपूरक पर्यटकांसाठी केलेल्या सुविधा, केबल ब्रिज अशी अनेक कामे आहेत, जी मार्गी लागलेली आहेत व लागताना दिसत आहेत. परंतु महाबळेश्वर तापोळा, दरे, आहिर भागाच्या पूर्वेला असणाऱया भागात साध्या दोन खाटांचा दवाखानादेखील नाही.
महाबळेश्वर तालुक्याच्या पश्चिम दिशेला असलेल्या झांजवड, दूध गाव, चतुरबेट, गोरोशी, घोणसपूर, देवळी या पंचक्रोशीदरम्यान एकही दवाखाना नाही किंवा उपपेंद्र नाही. जवळपास 20 वर्षांपासून आम्ही याकरिता पाठपुरावा करत आहोत. याबाबत 2009 मध्ये प्रादेशिक अनुशेषाखाली उपपेंद्र दुधगाव तालुका महाबळेश्वर या आराखडय़ास सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याबाबत प्रस्ताव सादर करण्यात आला. त्यानंतर अद्याप उपपेंद्राची सुधारित मान्यता ही कागदावरच आहे.
महाबळेश्वर तालुक्यातील दुर्गम, डोंगराळ भागातील सदर पंचक्रोशी दरम्यान रुग्णांना आरोग्य सेवेपासून वंचित राहावे लागत असेल व एखाद्या रुग्णाला गंभीर आजाराकरिता डालग्यातून घेऊन जावे लागत असेल तर ती लाजिरवाणी गोष्ट आहे. स्पष्टच बोलायचे तर दरेगावच्या जवळपास असणारे अहिर, तापोळा या गावांच्या दरम्यान 400 ते 500 कोटी रुपये खर्च करून केबल ब्रिज बांधण्यास लगेच मंजुरी मिळते व तत्काळ कामही सुरू होते. पण वरील भागातील जनतेला आरोग्याची सुविधा मिळण्यास वीस-पंचवीस वर्षे वाट का पाहावी लागते?
याबाबत बोलायचेच झाले तर महाबळेश्वर तालुक्यातील वाडा पुंभरोशी ते तापोळा दरम्यान एकही सुसज्ज असा दवाखाना नाही. सर्दी, पडसे, ताप यावर उपचार करणारा एखाद्दुसरा डॉक्टर असेलही परंतु साप चावणे, हिंसक जनावर चावणे, हिंसक जनावरांचा हल्ला होणे, अपघात, हृदयविकाराचा झटका येणे, पॅरालेसिस यासारख्या गंभीर आजारावर त्वरित उपचार करणारे दवाखाने नाहीत. तापोळा, तळदेव या ठिकाणी आहेत, परंतु त्यात पूर्ण सुविधा नाही. दवाखाने आहेत, परंतु त्यात कधी कधी डॉक्टरदेखील नसतात आणि असले तर उपचार करण्यासाठी त्यांच्याकडे पुरेशी सुविधा नसते.
सार्वजनिक आरोग्य हा राज्याचा विषय आहे आणि प्रत्येक राज्यात आरोग्य क्षेत्राच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून दिला जातो.मग याच भागात कमतरता का, असो. मतदान करून नगरसेवक, आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी निवडून देतात. आपल्या भागाचा विकास व सुविधांसाठी निवडून दिले जातात. तर मग कामात दिरंगाई का हे विचारण्यासाठी जनता रस्त्यावर आली तर नवल काय आहे असे आता वाटायला लागले आहे. असो. शासनाने यात जातीने लक्ष घालून लवकरात लवकर दवाखान्याची व्यवस्था करावी.