
>> अनघा सावंत
काही पोलीस पत्नींनी आपला संसार, नोकरी सांभाळतानाच समाजकार्याचाही विडा उचलला आणि एकत्रित येऊन ‘मैत्रेय प्रतिष्ठान’ या सामाजिक संस्थेची स्थापना केली.
खाकी वर्दीतला पोलीस ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’चा वसा हाती घेऊन नेहमीच आपलं कर्तव्य प्रथम बजावत असतो. अनियोजित कामाची डय़ुटी, बंदोबस्त, संप, मोर्चे, सणवारांचे बंदोबस्त या सगळ्या गोष्टी कोणतीही कुरबुर न करता आनंदाने पार पाडत असतो. मात्र त्याच्यामागे कौटुंबिक जबाबदारी प्रगल्भपणे आणि खंबीरपणे सांभाळते ती कुटुंबाचा कणा असलेली त्याची पत्नी. अशाच काही पोलीस पत्नींनी आपला संसार, नोकरी सांभाळतानाच समाजकार्याचाही विडा उचलला आणि एकत्रित येऊन ‘मैत्रेय प्रतिष्ठान’ या सामाजिक संस्थेची स्थापना केली.
संस्थेच्या सचिव ऍड. अदिती कांबळी म्हणाल्या, मुंबई पोलीस (तुकडी क्रमांक 33-1994) यांच्या आम्ही सहचारिणी असून 2015 पासून आम्ही मित्रपरिवार एकत्र आहोत. काही कार्यक्रम, सण यानिमित्त आमच्या सतत गाठीभेटी, चर्चा होत असत. यातूनच समाजासाठी काहीतरी करावं यावर आम्हां पोलीस पत्नींचं एकमत झालं आणि ‘मैत्रेय प्रतिष्ठान’ची स्थापना झाली.
2015 मध्ये स्थापन झालेली ‘मैत्रेय प्रतिष्ठान’ ही नोंदणीकृत संस्था असून समाजातील विविध घटकांसाठी महत्त्वाचे कार्य करून त्यांनी समाजात एक नावलौकिक मिळवलेला आहे.
गेल्या आठ वर्षांत संस्थेने स्वामी विवेकानंद बालाश्रम, येऊर, ठाणे येथील अनाथ मुलांना कपडे, खाऊ, खेळणी तसेच शालोपयोगी वस्तूंचे वाटप केले आहे. तसेच जे. जे. धर्मशाळेतील वृद्धांना जेवण आणि औषधे यांचे वाटप संस्था करते.
‘मैत्रेय प्रतिष्ठान’ची धुरा मीना भरम-अध्यक्ष, ऍड. अदिती कांबळी- सचिव तसेच स्मिता घोसाळकर-खजिनदार या सांभाळत असून शर्मिला तोडकर, सुर्वणा पवार, रेखा चव्हाण, श्रुती पवार, दया भिऊंगडे, सुवर्णा देऊळकर, हेमा म्हात्रे यांचे मोलाचे सहकार्य त्यांना लाभले आहे.
– पालघर, जि. वाडा येथील आदिवासी पाडय़ातील मुलांना तसेच पसायदान बालाश्रम, खडवली, जि. ठाणे येथील अनाथ मुलांना पुस्तके, रेनकोट, स्कूल बॅग्स अशा शैक्षणिक आणि गरजेच्या वस्तू देऊन संस्था मोलाची मदत करते.
– संस्थेतर्फे ताडदेव पोलीस कॅम्प येथे रक्तदान शिबीर तसेच दंत चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात येते.
– ‘कॅन्सर एड्स फाऊंडेशन’ आणि ‘संत गाडगेबाबा ट्रस्ट’ला संस्था मदतीचा हात देते. संस्था टाटा रुग्णालयाच्या फुटपाथवर राहणाऱया रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना ब्लँकेटचे वाटप करते.
– कोविड काळात ‘मुख्यमंत्री कोविड रिलीफ फंड’ यांना संस्थेने देणगी दिली. संस्था दरवर्षी 10 वी आणि 12 वी उत्तीर्ण झालेल्या पोलीस पाल्यांचा सत्कार करून त्यांना प्रोत्साहन देते.


























































