
>> अनिल फरांदे
मागील दीड वर्षातील विविध घडामोडींवर यशस्वीरीत्या मात करीत आता बांधकाम व्यवसाय क्षेत्र हे नव्याने उभे राहिले आहे. मागील काही काळात कोरोना आटोक्यात आणण्यासाठी सुरू असलेल्या लसीकरण मोहिमा, गृह कर्जावर ऐतिहासिकदृष्टय़ा कमी असलेला व्याजदर, महिलेच्या नावावर घर खरेदी केल्यास मुद्रांक शुल्कात मिळत असलेली सवलत, सध्याच्या सण व उत्सवाच्या काळात बांधकाम व्यावसायिकांकडून मिळत असलेली भरघोस सवलत यांसारख्या बाबी गृह खरेदीदारासाठी उपयुक्त ठरल्या. याबरोबरच स्वतःचे घर असण्याचे फायदे याच काळात नागरिकांना प्रकर्षाने जाणवले. ज्यांच्याकडे घर आहे अशांना मोठय़ा घरात जाण्याचे वेध लागले. सर्वच बाजूने बांधकाम क्षेत्रातील गुंतवणूक ही एक सुरक्षित गुंतवणूक आहे, यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले.
सध्याचा सिझनमध्ये आमच्या सदस्यांनी गृह खरेदीदारांमध्ये असलेला उत्साह अनुभवला आहे. नुकतेच व्रेडाई पुणे मेट्रो व सीआरई मॅट्रिक्स यांच्या वतीने बांधकाम व्यवसायाची सद्यपरिस्थिती जाणून घेण्यासाठी करण्यात आलेल्या सर्वेक्षणात घरांच्या खरेदीमध्ये 2019 च्या तुलनेत 2021 मध्ये 8 टक्के तर घरांच्या विक्री मूल्यामध्ये 27 टक्के इतकी वाढ झाल्याचे दिसून आले, हे त्याचेच द्योतक आहे.
पुण्याच्या घर खरेदीमध्ये मोठय़ा प्रमाणात योगदान देणाऱया माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्राने या कोरोना काळात चांगले काम केले. त्यामुळे बांधकाम व्यवसाय क्षेत्रावरदेखील याचा सकारात्मक परिणाम झालेला पाहायला मिळाला.
एकूणच घरे घेण्याकडे नागरिकांचा वाढता कल असण्याबरोबरच आम्ही ग्राहकांच्या मागणीत वाढ झालेली अनुभवत आहोत. पुढील काळात येणारे सण लक्षात घेता याला आणखी गती येईल असा आमचा अंदाज आहे. मात्र हे होत असताना स्टील, सिमेंट, पीव्हीपीच्या वाढलेल्या किमतींमुळे विक्री मूल्यातदेखील लवकरच वाढ होण्याची शक्यता आहे.
n शब्दांकन – मेधा पालकर



























































