गुलदस्ता- मीना शौरी आणि…?

>>अनिल हर्डीकर

रूप के. शौरी या दिग्दर्शकासोबत लग्न करण्याचा मीनाने निर्णय घेतला होता. दोघे संसार थाटण्यासाठी नवीन जागेच्या शोधात होते. जुहूच्या परिसरात मीना फिरत असताना तिने एका बंगल्याच्या गेटवर ‘बंगला भाडय़ाने देणे आहे’ असं लिहिलेला फलक पाहिला… आणि…

19नोव्हेंबर 1921 रोजी जन्मलेल्या खुर्शीदचं मीना हे नामकरण केलं सुप्रसिद्ध दिग्दर्शक-अभिनेते सोहराब मोदी यांनी.त्यांच्या ‘सिकंदर’ या चित्रपटाच्या वेळी. त्याच चित्रपटानं मीनाने तिच्या फिल्मी कारकीर्दीला प्रारंभ केला.

‘शालीमार’, ‘हुमायूं’, ‘एक थी लडकी’, ‘चमन’ ही तिच्या चित्रपटाची नावं. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर ती पाकिस्तानात गेली. तिथे तिने 29 चित्रपट केले. पाकिस्तानातील ती पहिली ‘लक्स गर्ल’ ठरली. 9 फेब्रुवारी 1989 ला पाकिस्तानात ती अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत अल्लाला प्यारी झाली. मीना शौरी ही काही हिंदुस्थानी हिंदी चित्रपट क्षेत्रातील अग्रगण्य अभिनेत्री नाही. तिच्या चाहत्यांची संख्या फार नसेलही, पण तिने पाच लग्ने केली आणि तिला डोळ्यांसमोर आणायची तर एकेकाळी तिच्यावर चित्रित झालेलं ‘लारा लप्पा लारा लप्पा लाई रखदा, आडीटप्पा आडीटप्पा लाई रखदा…’ हे गाणं आठवा.

…तर तिच्या आयुष्यात तिला एक अशी व्यक्ती भेटली, जी अत्यंत सर्वसामान्य होती. तरीही हा किस्सा तुम्ही आम्ही  ऐकण्यासारखा आहे.

?त्याचं झालं असं की, रूप के. शौरी या दिग्दर्शकासोबत लग्न करण्याचा मीनाने निर्णय घेतला होता. दोघे संसार थाटण्यासाठी नवीन जागेच्या शोधात होते. आजच नव्हे तर तेव्हाही मुंबईतील जुहूचा परिसर हा चित्रपटातल्या नट-नटय़ांचा राहण्यासाठी आवडता. त्याच परिसरात मीना फिरत असताना तिने एका बंगल्याच्या गेटवर ‘बंगला भाडय़ाने देणे आहे’ असं लिहिलेला फलक पाहिला. तिने विचार केला, बंगला बघायला काय हरकत आहे? दुपारची वेळ होती. ती गेट उघडून आत गेली. भल्यामोठय़ा बंगल्याचं दार ठोठावलं.

थोडय़ा वेळाने एका वृद्ध स्त्राrने दरवाजा उघडला. ती होती त्या बंगल्याची मालकीण. तिने मीनाला लगेच ओळखलं. मीना होतीच दिसायला सुंदर आणि सिने प्रेक्षकांची आवडती.

?“मीनाजी, आप? आईये,” वृद्ध मालकिणीने मीनाचे आनंदाने स्वागत केले. मीना काही बोलायच्या आत तिने मीनाचे किती चित्रपट पाहिलेत आणि ती मीनाची किती चाहती आहे हे तिने घडाघडा सांगितलं. पण मीनाला बघायचा होता तिचा बंगला. मीनाला काही गोष्टी जाणून घ्यायच्या होत्या. भाडय़ाची तिची किती अपेक्षा आहे वगैरे. पण बंगल्याची वृद्ध मालकीण मीनाचं कौतुक आणि आदरातिथ्य करण्यात हरखून गेलेली. ‘नको नको’ म्हणत असताना तिने मीनासाठी चहा केला. बिस्किटेही सोबत दिली आणि मीनाला काही बोलण्याची संधी न देता आपल्या मुलांचे, सुनांचे, मुलींचे-जावयांचे, नातींचे-नातवांचे कौतुक पाठ वाचायला सुरुवात केली. कैक फोटो अल्बम मीनाला बघायला दिले. मीनाला संपूर्ण बंगला, अगदी एकेक खोली दाखवली. मीनाला बंगला आवडला, पण तिला आता म्हातारी बंगल्याचं भाडं काय सांगते याची काळजी वाटत होती. तिच्या बडबडीला कंटाळून शेवटी त्या मालकिणीला म्हणाली, “आजी, तुम्ही माझ्या चाहत्या आहात, माझे पिक्चर्स तुम्ही पाहिलेत, तुमचे घरातले सगळे आनंदात आहेत, हे सगळं छान आहे, पण तुम्ही बंगल्याचं भाडं किती घेणार ते सांगतच नाही आहात.” मीना असं बोलली मात्र, खालच्या मानेने ती वृद्ध मालकीण म्हणाली, “क्षमा कर मीना, आम्हाला बंगला भाडय़ाने  द्यायचाच नाहीये.” मीनाचा जवळ जवळ पाऊण-एक तास वाया गेला होता. तिचं चिडणं स्वाभाविक होतं. ती त्या मालकिणीला म्हणाली, “तुमच्या बंगल्याच्या गेटवरची ‘बंगला भाडय़ाने देणे आहे’ ही पाटी वाचून मी आत आले, तुमची बकबक ऐकली आणि आता तुम्ही मला काहीच न झाल्यासारखं सांगता आहात की, आम्हाला हा बंगला भाडय़ान्sढ द्यायचा नाही म्हणून!”

म्हातारीच्या डोळ्यांत पाणी आलं. ती म्हणाली, “काय सांगू? कसं सांगू? अगं, मला कर्तृत्ववान मुलगे आहेत, संस्कारी मुली आहेत, चांगले श्रीमंत जावई आहेत. सुना शालीन आहेत. नातवंडांविषयी तर जेवढं सांगेन तेवढं कमीच. माझा हा तृप्तीचा आनंद दहा लोकांना सांगावासा वाटतो. कुणाशी बोलणार? बघत्येस केवढा मोठा बंगला आहे हा. या वयात मी एकटी राहते या बंगल्यात. सगळे माझे नातेवाईक परदेशात असतात. सुट्टीत येतात सगळे आठेक दिवसांसाठी. घर भरून जातं, बहरून जातं आणि नंतर पुन्हा वर्षभर रिकामं असतं. मला माणसं आवडतात, पण म्हणूनच मी बोर्ड करून घेतला बंगल्याच्या गेटवर लावण्यासाठी त्यानिमित्ताने कुणीतरी येतं, त्यांच्याशी गप्पा होतात. तुझं आता जसं डोकं खाल्लं तसं त्यांचं खाते. काय करू?” म्हातारी ओक्साबोक्शी रडू लागली.

मीनालादेखील भरून आलं. ती काहीही न बोलता बंगल्याबाहेर पडली. गेटवर तो बोर्ड लटकत होता. ज्यावर लिहिलं जरी होतं ‘बंगला भाडय़ाने देणे आहे’ तरी खरा मजकूर असा होता की ‘मला काही सांगायचंय!’