दुसरा किशोर होणे नाही…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रा. अनिल कवठेकर

सगळ्यांचे लाडके आणि जगात सर्वात जास्त चाहतावर्ग लाभलेले, स्वरांचे जादूगार, विनोदवीर, संगीतकार, निर्माता, दिग्दर्शक… असे असंख्य पैलू असलेले व्यक्तिमत्त्व म्हणजे किशोर कुमार. किशोर कुमार यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांच्या आठवणी जागवणारा लेख.

मध्य प्रदेशातील खांडवा येथे किशोरदांचा जन्म 4 ऑगस्ट 1929 रोजी झाला. 4 या आकडय़ासोबत किशोरदांच्या जीवनात फार मोठा योगायोग दिसतो. त्यांची जन्मतारीख 4 ऑगस्ट, त्यांच्या वडिलांना असणाऱया चार अपत्यांपैकी किशोरदांचा चौथा क्रमांक होता. पहिले अशोक कुमार, दुसरे अनुप कुमार, तिसरी बहीण सती राणी देवी आणि चौथे आभास कुमार अर्थात किशोर कुमार होय. तिसरा योगायोग म्हणजे त्यांनी चार विवाह केले. पहिला रुमा गुहाशी, दुसरा मधुबालाशी, तिसरा योगिता बालीशी आणि चौथा लीना चंदावरकर यांच्याशी. शेवटचा योगायोग म्हणजे त्यांच्या मृत्यूची तारीख होती 13 ऑक्टोबर. एक अधिक तीन, चार होय.

सगळे योगायोग इथेच संपत नाहीत. त्यांच्या ज्या आवाजावर आपण मनापासून प्रेम करतो, तो त्यांचा आवाज लहानपणी विचित्र होता. भविष्यात हा खूप मोठा गायक होईल यावर कोणाचाही विश्वास बसला नसता. मग कोणत्याही गुरूशिवाय या संगीतातल्या एकलव्याने असा सुंदर आवाज कसा मिळवला तर त्याला योगयोग म्हणा वा जगातले आठवे आश्चर्य म्हणा. किशोरदा 8-9 वर्षांचे असताना, घरामध्ये खेळत होते. त्यांची आई स्वयंपाकघरात विळीवर भाजी चिरत होती. धावपळ करताना किशोरदांचा पाय विळीवर पडला आणि त्यांच्या पायाची करंगळी कापली गेली. ते खूप मोठय़ाने रडू लागले. त्यांना डॉक्टरकडे नेले, जखम शिवली. पण लहान किशोरदा दहा-पंधरा दिवस मोठमोठय़ाने रडत होते. ओरडत होते. त्यांच्या रडण्याओरडण्याने त्यांचा आवाज खुलला आणि देशाला एक उत्तम गायक गवसला.

जणू निसर्गानेच ही किमया घडवून आणली होती. ज्या घरात गाण्याचे संस्कार नव्हते, त्या घरात पंधरा दिवस निसर्गाने असा काही रियाज करून घेतला की, एक अत्यंत सुंदर आवाजाचा गायक निर्माण केला. म्हणूनच असे म्हणता येईल की, दुसरा किशोर होणे शक्य नाही. ज्या नैसर्गिक घटनेने त्यांचा आवाज खुलला ती घटना इतर कोणाबाबत घडणे शक्य नाही.

किशोरदांनी गायला सुरुवात केली आणि त्यांच्या आवाजाने एकापेक्षा एक देहभान हरपवणारी अप्रतिम गाणी दिली. त्यातलं एक गाणं, ज्याने तेव्हाच्या तरुण पिढीच्या मनातल्या प्रेमभावनांचं अत्यंत भावपूर्ण आवाजात केलेलं सादरीकरण. स्वप्नातल्या राणीला शब्दरूपात आणणारं ते गाणं म्हणजे ओ ए ए ए हे ए ए ए हं. अ अ अ… हे फक्त किशोर कुमारच गाऊ शकतो आणि हे गाणं आहे, ‘मेरे सपनों की रानी…’ या गाण्यातली सुरुवातीचं सादरीकरण.

हिमालयातील पर्वतांच्या उतारावरून रस्त्याच्या कडेने जाणारी दार्जिलिंगची टॉय ट्रेन आणि त्या ट्रेनमध्ये बसलेली गालावर खळी असणारी स्वप्नातली राणी शर्मिला टागोर. उघडय़ा जीपमधून निघालेला रोमँटिक राजेश खन्ना. त्या वेळी राजेश खन्ना आपल्या मनातल्या भावना व्यक्त करतोय असा भास प्रत्येक तरुणाला झाला होता.

काहीजण नृत्याच्या जोरावर सुपरस्टार बनलेत तर काही अभिनयाच्या, अॅक्शनच्या जोरावर. पण काहीजण किशोर कुमारच्या सदाबहार गाण्यांमुळे स्टारपदाला पोहोचलेले आहेत.

किशोर कुमारने प्रत्येक गाण्यामधला भाव पकडून त्यातला नेमकी मूड केवळ विशिष्ट सुरावटीतून प्रगट केला आहे. असं वेगळेपण एक सृजनशील गायकच करू शकतो. किशोर कुमार यांनी अनेक गाण्यांच्या सुरुवातीला स्वतःच्या सृजनशीलतेने संस्कार केलेले दिसतात आणि हे सगळे संस्कारच आपल्याला भारून टाकतात. गाणं गुणगुणायला भाग पाडतात. प्रेरणा देतात. किशोरदांना एक नैसर्गिक देणगीच होती. कारण त्यांच्यानंतर कोणत्याही गायकाने हृदयाच्या विणेची तार झंकारली नाही. साठीच्या माणसाला तरुण केलं नाही.

किशोरदाच्या स्वभावाविषयी अनेकांनी लिहिलेले आहे. सहगायकाचा जर कोणी अपमान केला तर त्याच्या कानाखाली मारायला ते कमी करत नसत. एकदा एका स्टुडिओमध्ये किशोर कुमार यांचं गाण्याचं रेकॉर्डिंग संपलं. त्याच वेळी कुणीतरी किशोर कुमारने मोहम्मद रफी की छुट्टी कर दी, असं म्हटलं. ते ऐकताच किशोरदा भडकले. त्यांनी त्या व्यक्तीच्या कानाखाली मारली आणि त्याला स्टुडिओच्या बाहेर हाकलून दिलं. कलाकारांचा मान कसा ठेवला पाहिजे हे त्यांनी त्यांच्या कृतीतून आपल्याला दाखवून दिलं.

चित्रपटसृष्टीमध्ये लतादीदींचा मान सगळ्यात मोठा आहे. किशोरदा त्यांचा मनापासून आदर करत असत. लतादीदींबरोबर त्यांनी अनेक गाणी गायली, पण लतादीदींपेक्षा एक रुपया कमी मानधन घेऊन त्यांचा मान त्यांनी ठेवला होता.

किशोर कुमार म्हणजे ‘चलती का नाम गाडी’मधला भोळाभाबडा, कायम गोंधळलेला, पण कसे जगावे सांगणारा मित्र. आपल्या गाण्यांनी सहलीत धमाल उडवून देणारा, जवळचा वाटणारा मित्र. सगळ्या पिढीला हवाहवासा वाटणारा आवाजाचा मित्र… किशोर म्हणजे गीतांची शिदोरी-
सरतही नाही… उरतही नाही…