
>> अनिल दत्तात्रेय साखरे
सध्या जगभरातील सगळ्याच शहरांचा पारा चाळिशीपार जाऊ लागला आहे. वाढत्या हरित वायू उत्सर्जनमुळे जगभरातच तापमान वाढीला लागले आहे. यासंदर्भात पर्यावरण तज्ञ वेळोवेळी चिंता व्यक्त करत आहेत, इशारा देत आहेत, पण अजून तरी पाहिजे तेवढे लक्ष पृथ्वीच्या तापमानवाढीकडे जगभरातील देश देत आहेत, असे दिसत नाही, शास्त्रज्ञांच्या मते या दशकामध्ये पृथ्वीवरील तापमानवाढ नियंत्रित करण्यासाठी ज्या काही उपाययोजना केल्या जातील, त्याचे परिणाम या शतकाच्या शेवटाला मिळतील.
एपंदरच जगभरात दृष्टी टाकली असताना हिंदुस्थानातील वेगवेगळ्या शहरांमध्येही मागील काही वर्षांपासून तापमानवाढीने आपली मर्यादा ओलांडायला सुरुवात केली आहे. पूर्वी महाराष्ट्रामध्ये मे महिन्यात विदर्भाचा पारा चाळिशीच्या पुढे जात होता, पण आता एप्रिल महिन्यातच मुंबई-ठाण्यासारख्या ठिकाणी पाऱयाने चाळिशी पार केली आहे. काही ठिकाणी तर तो पन्नाशीकडे झुकू लागला आहे, तर युरोप-अमेरिकेमध्ये आता उष्णतेच्या तीव्र झळांनी लोकांच्या अंगाची काहिली व्हायला लागलेली आहे. त्यामुळे काही ठिकाणी उष्माघाताने मृत्यूंचे प्रमाण पण वाढले आहे. आज युरोप अमेरिकेत पण पारा चाळिशीच्या पुढे चालला असून तेथील थंड प्रदेशांमध्ये लोकांना एवढी उष्णता सहन करणे आवाक्याबाहेरचे आहे. लोकांना बाहेर पडणे मुश्कील होत असून ब्रिटनने तर अतिउष्णतेमुळे देशामध्ये आणीबाणी जाहीर केली आहे. त्यातच अमेरिका, स्पेन, पोर्तुगाल, जर्मनी, फ्रान्स, चीन या ठिकाणी मोठय़ा प्रमाणावर जंगलांमध्ये आगी लागल्या असून हजारो हेक्टर जमीन आणि जंगल संपत्ती जळून राख झाली आहे. त्यासोबत पशुपक्षी आणि जंगली प्राण्यांचेही खूप मोठय़ा प्रमाणावर शिरकाण होत आहे.
तापमानवाढीने मर्यादा ओलांडली आहे. त्यामुळे उष्णता वाढली की, थंडाव्यासाठी ऊर्जेची मागणी वाढते. मग अधिक ऊर्जेसाठी पुन्हा अधिक कोळसा आणि जीवाश्म इंधनाचा वापर केला जातो. त्यामुळे अधिक कर्ब उत्सर्जन आणि पृथ्वीच्या तापमानामध्ये अधिक वाढ होते. अशा दुहेरी चक्रव्यूहात सध्या पृथ्वीवरील पर्यावरण अडकले आहे आणि हा चक्रव्यूह भेदून सगळ्यांनाच अगदी प्रामाणिकपणे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील, नाहीतर यापुढे आणखी भीषण प्रसंगाला मानवाला सामोरे जावे लागेल. त्यातच सध्या सुरू असलेल्या रशिया-युक्रेन युद्धामध्ये दिवसाकाठी शेकडो टन स्पह्टकांचा, विनाशकारी क्षेपणास्त्रांचा, दारूगोळ्याचा वापर होत आहे. चार महिन्यांनंतरही हे युद्ध थांबण्याची कुठलीच लक्षणे नसून त्यामुळे येणाऱया काळामध्ये युरोपमध्ये हवामानामध्ये खूप मोठे असंतुलित बदल होतील असे तेथील तज्ञांचे म्हणणे आहे. त्याशिवाय मध्य आशिया, चीन, रशिया यांसारख्या तेल उत्पादक देशांचा जीवाश्म इंधनाचा वापर कमी करण्यासाठी विरोध आहे तो वेगळाच.
सद्यस्थितीला जगाचे कर्बवायू उत्सर्जन 40 गीगा टन आहे आणि 2030 पर्यंत शास्त्र्ाज्ञांना ते 18 गीगा टनावर आणायचे आहे. तरच जगाची तापमानवाढ ही 1.5 अंश सेल्सियसवर रोखता येणार आहे आणि हे कर्बवायू उत्सर्जन शून्यावर नेण्यासाठी वेगवेगळ्या राष्ट्रांनी 2030 ते 2070 सालापर्यंतच्या कालमर्यादा स्वतःसाठी मागील वर्षी झालेल्या ग्लासगो परिषदेमध्ये ठरवून घेतल्या आहेत. हवामान बदल आणि तापमानवाढीच्या झळा जगभरातील सर्वसामान्यांनाही आता बसू लागल्या आहेत. युनोचे महासचिव अंतिनियो गुटरेस यांनी पण जगभरातील नेत्यांना जीवाश्म इंधनाच्या वापराबाबत इशारा दिलेला आहे. त्यामुळे पर्यावरण रक्षणासाठी स्थानिक ते जागतिक पातळीवर असा जनमताचा रेटा लावून धरायला प्रदूषण आणि पर्यावरण संवर्धन विषय हा प्रत्येक देशातील आता राजकीय मुद्दा झाला पाहिजे. युरोप, अमेरिकेत यादृष्टीने सुरुवात झाली आहे.
मागील काही वर्षांपासून जगातील वेगवेगळ्या भागांमध्ये सातत्याने होणारी वादळे, कमी कालावधीमध्ये खूप जोराचा पडणारा पाऊस आणि त्यामुळे उद्भवणारे पूरपरिस्थिती, त्यासोबतच जंगलांना लागणारे वणवे, वातावरणामध्ये झालेले असंतुलित बदल हे मानवाला निसर्गाकडून टेलिकास्ट होणारे इशारे आहेत. या सृष्टीतील मानवजातीने या इशाऱयाची योग्य ती दखल घेऊन पर्यावरण रक्षणासाठी आता मोठी चळवळ उभी राहणे जरुरी आहे, नाहीतर येणाऱया काळामध्ये निसर्ग यापेक्षाही भयानक क्रूर होऊ शकतो. मग तो कुठली दयामाया न दाखवता मोठय़ा प्रमाणावर वित्तहानी, जीवितहानी करेल आणि मानवाला खूप मोठय़ा संकटाला सामोरे जावे लागेल.





























































