
>> अर्चना मिरजकर
दासबोध हा रामदासांचा सर्वात महत्त्वाचा ग्रंथ. भागवत धर्माचे अद्वैत तत्त्वज्ञान रामदास अतिशय सोप्या भाषेत दासबोधात सांगतात. नवविधा भक्ती, त्रिविध ताप, तीन गुण आणि पंच महाभूते यांचा सृष्टीशी असलेला संबंध. शुद्ध ज्ञान, माया आणि ब्रह्म या संकल्पना, प्रकृती आणि पुरुष यांच्यापासून सृष्टीची उत्पत्ती कशी होते. द्वैत आणि अद्वैत यांचे स्वच्छ, सुंदर स्पष्टीकरण दासबोधात मिळते. हे नुसते व्याख्यात्मक वर्णन नाही, त्याला अनुभूतीची जोड आहे.
आज आपण समजून घेणार आहोत, सतराव्या शतकात समर्थ रामदास स्वामींनी लिहिलेला ‘दासबोध’ हा ग्रंथ. रामदासांचा जन्म 1608 साली मराठवाडय़ातील जांब या गावी झाला. त्या काळाच्या पद्धतीनुसार बाराव्या वर्षी त्यांचे लग्न ठरले, पण आपल्या आयुष्याची दिशा वेगळी आहे हे ध्यानात येऊन ते लग्नमंडपातून पळून गेले. गोदावरी किनारी टाकळी येथे त्यांनी बारा वर्षे तपश्चर्या केली आणि श्रीरामाचे दर्शन होऊन त्यांना ज्ञानप्राप्ती झाली.
नंतरची बारा वर्षे रामदासांनी तीर्थयात्रा केली. या प्रवासात त्यांना भारतातील तत्कालीन परिस्थितीचे जवळून दर्शन झाले. समाज भागवत धर्माचे मूळ ज्ञान विसरून म्लान झाला आहे. अंधश्रद्धा आणि नवससायास यांवर त्याची श्रद्धा वाढली आहे. अन्यायाविरुद्ध प्रतिकार करण्याची, संघटित होण्याची शक्ती तो हरवून बसला आहे, हे त्यांना प्रकर्षाने जाणवले. यातूनच त्यांना आपल्या पुढील कार्याची दिशा सापडली.
महाराष्ट्रात परत आल्यावर रामदासांनी समाजाला प्रबुद्ध करण्यासाठी काव्यरचना केली. मनाच्या सामर्थ्याबरोबरच शारीरिक बलोपासनेवर भर दिला. भारतात अनेक ठिकाणी मठ स्थापन करून त्यांच्या आदर्श व्यवस्थापनाची घडी घालून दिली. स्त्र्ायांना ज्ञानोपदेश करून अनुग्रह करण्याचा अधिकार दिला, कीर्तन करण्यास प्रोत्साहन दिले. दासबोध हा रामदासांचा सर्वात महत्त्वाचा ग्रंथ. भागवत धर्माचे अद्वैत तत्त्वज्ञान रामदास अतिशय सोप्या भाषेत दासबोधात सांगतात.
नवविधा भक्ती, त्रिविध ताप, तीन गुण आणि पंच महाभूते यांचा सृष्टीशी असलेला संबंध. शुद्ध ज्ञान, माया आणि ब्रह्म या संकल्पना, प्रकृती आणि पुरुष यांच्यापासून सृष्टीची उत्पत्ती कशी होते. द्वैत आणि अद्वैत यांचे स्वच्छ, सुंदर स्पष्टीकरण दासबोधात मिळते. हे नुसते व्याख्यात्मक वर्णन नाही, त्याला अनुभूतीची जोड आहे.
विरक्ताची लक्षणे सांगताना ते म्हणतात
दृढनिश्चयो धरावा।
संसार सुखाचा करावा।।
विश्व जन उद्धरावा संसर्गमात्रे।।
माणसाला आसक्ती संसारात कशी गुंतवून ठेवते हे सांगताना ते घराचे उदाहरण देतात. माणूस कर्ज काढून घर बांधतो पणः
मूषक म्हणती घर आमुचें पाली
म्हणती घर आमुचे
मक्षिका म्हणती घर आमुचे निश्चयेंसी
जन्म दों दिसांची वस्ती कोठे तरी करावी
साधकाच्या बद्ध, मुमुक्षु, साधक आणि सिद्ध या अवस्थांची लक्षणे रामदास विस्तृतपणे सांगतात.
बहु कल्पना बहु कामना। बहु तृष्णा बहु वासना।
बहु ममता बहु भावना। या नाव बद्ध।।
बहुतेक आपण सर्व याच अवस्थेत असतो. मग कधीतरी मुमुक्षु अवस्थेला पोचतो.
नाही पुण्यांचा विचार। जाले पापाचे डोंगर।
आता दुस्तर हा संसार। पैसा तरो।।
असा प्रश्न मनात डोकावायला लागतो.
आपले अवगुण देखे। विरक्तीबळे वोळखे।
आपणासि निंदी दुःखे। या नाव मुमुक्षु।।
अशी स्थिती प्राप्त होते आणि उपासकाची साधकाच्या दिशेने वाटचाल सुरू होते.
अवगुण त्यागी दिवसेंदिवस।
करी उत्तम गुणाचा अभ्यास।
स्वरूपी लावी निजध्यास। या नाव साधक।।
अशा साधकाला ते परब्रह्माचे स्वरूप उलगडून दाखवतात. जे जे काही निर्माण जाले ।
ते ते आधीच ब्रह्मे व्यापिले ।
सर्व नाशता उरले । अविनाश ब्रह्म ।।
परंतु मायेच्या आभासामुळे, परब्रह्माचे हे रूप आपल्याला दिसत नाही.
का ते दर्पणाचे मंदिरी ।
बैसिली सभा दिसे दुसरी ।
बहुत दीपांचिये हारी ।
बहुत छयाया दिसती।।
ऐसे हे बहुविध असे ।
साचासारीखेचि दिसे ।
परी हे सत्य म्हणौनी कसे । विश्वासावे ।।
पण खरे म्हणजे परब्रह्म हेच शाश्वत सत्य आहे.
तेजी असे परि जळेना ।
पवनी असे परि चळेना ।
गगनी असे परि कळेना । परब्रह्म ते ।।
परमार्थाबरोबरच रामदास साधकांना व्यवहारही शिकवतात. आरंभीचे नमन झाल्यावर, ग्रंथाची सुरुवातच ते मूर्खाच्या लक्षणांपासून करतात.
परपीडेचें मानी सुख । परसंतोषाचें मानी दुःख
गेले वस्तूचा करी शोक । तो येक मूर्ख ।
अशा प्रवृत्तींपासून दूर राहण्याचा ते शिष्यांना उपदेश करतात.
जे करामिती दाखवती । ते ही गुरु म्हणिजेती
परंतु सद्गुरू नव्हेती । मोक्षदाते ।।
अशा भोंदू गुरूंपासून दूर राहण्याचा इशारा देतात.
कर्मकांडे, अघोरी क्रिया, अंधविश्वास यांचा रामदासांनी निक्षून विरोध केला.
निराहार उपोषण । पंचाग्नी धूम्रपान ।
आपणास घ्यावे पुरून । तो तमोगुण ।।
अशा साधनांच्या मागे न लागता, शुद्ध मानाने देवाला भजावे हा संदेश दिला.
देवाच्या सख्यत्वासाठी । पदव्या जिवलगांसी तुटी।
सर्व अर्पावे सेवटी । प्राण तोही वेचावा ।।
साधकाला खऱया ज्ञानाची ओळख पटवून देण्यासाठी ते म्हणतात ः
ऐक ज्ञानाचे लक्षण । ज्ञान म्हणिजे आत्मज्ञान ।
पाहावे आपणासि आपण । या नाव ज्ञान ।।
ऐक शिष्या येथीचे वर्म । स्वये तूची आहेस ब्रह्म ।
ये विषयी संदेह भ्रम । धरूची नको ।।
असे ज्ञान प्राप्त झाल्यावर साधकाची जन्म-मृत्यूपासून सुटका होते.
भवभयासि भडकाविले । काळाचे टांगे मोडिले ।
मस्तक हाणोनि पहडिले । जन्ममृत्युचे ।।
अशी खात्री ते देतात.
दासबोध हा व्यवहाराच्या पहिल्या पायरीपासून ते परमार्थाच्या शेवटच्या स्थितीपर्यंत उपासकाला उत्तम मार्गदर्शन करणारा ग्रंथ ठरतो.
ब्लर्ब
या लेखाचा विस्तृत भाग आणि प्रोफेसर विमुक्ताराजे यांच्याकडून अधिक माहिती ऐका यूटय़ूबच्या ‘ग्रंथयात्रा’ चॅनेलवर.


























































