
>> अरुणा सरनाईक
मनाने जे काही सांगितलेले असते ते तारतम्याच्या कसोटीवर खरोखरंच खरं उतरतं. ‘आतला आवाज’ नावाचा जो काही प्रकार आहे, तो जे काही आपल्याला सांगतो तोच मोलाचा सल्ला असतो. बाहेरून येणारे किंवा दिले जाणारे सल्ले नेहमी एकांगी, टोकाचे असतात. प्रसंगी वापर जरूर करावा; पण आचरणात आणण्यापूर्वी आपल्या ‘आतल्या आवाजा’शी संवाद साधून त्याच्या योग्यतेची खातरजमा जरूर पाहावी, अमलात आणावा. म्हणतात ना, न मागता वाढलेलं मीठ, न मागता दिलेला सल्ला नेहमीचं निरुपयोगी, प्रसंगी घातक ठरू पाहणारा असतो.
ऐक मी काय सांगते ते ! कान देऊन लक्ष देऊन नीट ऐक!’’ असं सांगणारी एक जमात असते. थेट अनादी काळापासून अस्तित्वात असलेली ही जमात थेट वेदकाळापासून आजतागायत टिपून आहे. अगदी नॉनएक्सपायरी डेट आहे तिची. या ‘ऐक सखी’ जमातीची माणसं प्रत्येक युगात आढळून येतात. रामायण, महाभारत, इतिहास, मराठा पेशवेकालीन काळ…पुठे नाही आढळत ते सांगा. अगदी देवलोक, मृत्युलोक, पाताळ लोक याही ठिकाणी या जमातीचे सभासद दिसून येतात. आता त्यांना सल्लागार, हितचिंतक, शुभचिंतक, सखी, सखा अशी गोंडस नावं आपण दिलेली आहेत. ही मंडळी प्रत्येकाला हवी असतात. आपलं म्हणणं ‘होयबा’ करणारी मंडळीही यात असतात. अंगावर आलं की, झटपून टाकता येणं हेही या जमातीच्या सभासदांना आलं पाहिजे याचं रीतसर शिक्षण त्यांना देलेलं असतं. जगाच्या पाठीवर पुठेही जा! देश, भाषा, संस्कृती कोणतीही असो, या जमातीचे लोक सापडणार नाहीत असं होतच नाही. खरं तर असंच म्हणावंसं वाटतं की, ही जमात आहे म्हणून तर जगण्याला मजा आहे. याच्याशी देवलोकसुद्धा सहमत आहे. कारण त्याशिवाय जगण्याला मजा नाही. हो ना ?
परवा एक गृहिणी एका सासू बनणाऱ्या महिलेला सांगत होती, ‘‘अगं, मी तुला सागंते, उद्या तुझी सून आली ना की, सगळ्या गोष्टींना ‘छान’ म्हणायची सवय ठेव. अगदी तुला तिची एखादी गोष्ट नाही आवडली तरी ‘छान’चा मंत्र सतत जपत रहा !’’ ती सतत ‘‘छान छान’’ म्हणत राहिली. काही दिवसांनी सुनेला त्या ‘छान’चा पंटाळा नाही, वैताग आला. तिला या ‘छान’ शब्दातला पृत्रिमपणा बोचू लागला. काय हे? काही बोलले की, या आपल्या ‘‘छान आहे’’ अशीच प्रतिक्रिया देतात! खरं काही मनातलं बोलत नाहीत, सांगत नाहीत. असं कोणी असतं का? सतत 24 तास एकच पालुपद… छान! छान! आणि मग …सुरुवात झाली गोडी कमी होऊन विसंवादाला! खरं तर ही आमची मैत्रीण स्पष्ट बोलण्याबाबत प्रसिद्ध होती; पण ‘छान हं!’ या एका शब्दाच्या मंत्रानं, दिलेल्या अनाहुत सल्ल्यानं तिची पार वाट लागली की हो! आता तिलाच तिचा मार्ग सापडत नाही. सारं घरं कोंडलंय तिच्या अशा वागण्यानं आणि सल्ला देणारी मैत्रीण गडप झालेय! म्हणून म्हणतात,“ऐकावे जनाचे करावे मनाचे.’’ कारण प्रत्येक घर, माणसं एकसारखी नसतात. वातावरण, माणसं, घरटी बदलत जातात! हो ना?
गतकाळात डोकावून पाहिलं तर अशा चुकीच्या सल्ल्याने वागलेल्यांच्या विनाशाची उदाहरणं कित्येक आहेत. राज्यं बरखास्त झाली, घराणी लयाला गेली. इतिहास बदलले. अक्षरबदलाने किती कोवळे जीव नाहक बळी पडले. रामासारख्या मर्यादापुरुषोत्तमाला एका मंथरेसारख्या दासीच्या सल्ल्यामुळे वनवास भोगावा लागला. दशरथ राजाला जीव घालवावा लागला. केवळ ‘ऐक सखे’ यामुळेच ना? महाभारत का घडलं ? महायुद्ध का घडलं? केवळ शपुनी मामामुळे.
चुकीच्या सल्ल्यात ताकद आणि आकर्षण इतकं जबरदस्त असतं की, ते आपण ऐकतोच ऐकतो. विपरीत वागण्याचं आकर्षण जबरदस्त असतं हेच खरं. आजचं राजकारण, समाजकारणदेखील याच वाटेवरून जात आहे. योग्य उपाययोजना, स्वतःचे निर्णय आणि उत्तम सल्लागार यांचा फार मोठा अभाव आज सर्वत्र जाणवत आहे. म्हणूनच योग्य सल्ला अभावाने मिळू लागला आहे. सर्वच नकारात्मक परिस्थिती आहे असं नाही. योग्य सल्ला देणारे आपल्याकडे होऊन गेलेत. बिरबल, तेनालीराम, मुल्ला नसिरुद्दीन अशी काही मंडळी होती, ज्यांनी स्वतःचा फायदा न पाहता आपल्या मालकाचे हित जोपासले. प्रसंगी योग्य शब्दांत कानउघाडणी केलेली आहे. त्यांची आज मिसाल बनलेली आहे. तो सल्ला हितोपदेश ठरला. मुलांना, शिक्षणाचा मॉरल सायन्सचा महत्त्वाचा हिस्सा बनला. गंमत अशी की, त्यांच्या मालकांना, बादशहाला या लोकांचे मोल, महत्त्व ज्ञात होते. ते त्यांचा उपयोग इतरेजनांना शिकवण देण्यासाठी जाणून करीत असत, पण आज त्यांच्या फक्त कथा बनल्या. आचरणात न आणता येण्यासारख्या!
याचसाठी तर शाळेपासून इतिहास विषय असतो. चुकीच्या, बरोबरच्या सल्ल्याचा कसा उपयोग करायचा हे समजण्यासाठी ! पण नेमका इतिहास हाच विषय आपल्याला आवडत नाही. मलाही आवडत नसे. आज या विषयावर लिहिताना त्याचे मर्म कळले. तेव्हा अभ्यास केला असता तर आयुष्यात प्रत्येक प्रसंगी कसं वागायचं ते मला कळलं असतं. म्हणून मुलांना शिकवताना इतिहास विषय कसा रंजक होईल ते मी आवर्जून बघते. मुलं म्हणतात, एरवी हा विषय आवडत नाही; पण तुम्ही शिकवता तेव्हा आवडतो. मनात म्हणते, ‘‘मुलांनो, इतिहास वाचा अणि त्याचं मर्म जाणून घ्या. मी काय सांगते तसे वागा. म्हणजे ‘तुझं सगळं बरोबर होईल’, या सल्ल्याची आवश्यकता पडणार नाही आणि नुकसान होणार नाही.’’
चुकीचा सल्ला दिला आणि ऐकला नसता तर आज ज्या परिस्थितीला देशाला सामोरं जावं लागतंय, तसं जावं लागलं नसतं. निर्णय, सल्ले चुकतात माणसांचे, पण होणारे परिणाम सांभाळणे मागे राहणाऱयांना आणि नंतरच्या पिढीला फार भोगावे लागतात. अर्जुनाला दिला गेलेला युद्धभूमीवरील सल्ला योग्य होता. कर्तव्यपालनाचा होता. म्हणून आज तो आपला धर्मग्रंथ आहे. आजही त्यातील सल्ला आचरणशील आहे. कोणत्याही काळात तो आचरून संकटातून मार्ग काढून आपल्याला मार्गस्थ करणारा आहे.
खरं तर आपलं मनच आपला उत्तम सल्लागार असतं. ऐरणीच्या टोकावरच्या निर्णयात ते आपल्याला योग्य मार्गदर्शन करतं. ‘‘ऐक’’ असं ते म्हणत नाही, तरी आपला पिच्छा सोडत नाही. मग आपण म्हणतो, हे तर माझ्या मनात केव्हापासून येत होतं. ‘‘माझं आतलं मन मला हेच सांगत होतं’’ असं आपण ठासून बोलतो. संकटाच्या वेळी आपल्या भावना खऱ्या आणि तरल होतात. काय वाईट, काय चांगलं याचं क्षणात ज्ञान होतं. मनाने जे काही सांगितलेलं असतं ते तारतम्याच्या कसोटीवर खरोखरच खरं उतरतं. आतला आवाज नावाचा जो काही प्रकार आहे, तो जे काही आपल्याला सांगतो तोच मोलाचा सल्ला असतो. बाहेरून येणारे किंवा दिले जाणारे सल्ले नेहमी एकांगी, टोकाचे असतात. प्रसंगी वापर जरूर करावा, पण आचरणात आणण्यापूर्वी आपल्या ‘आतल्या आवाजा’शी संवाद साधून त्याच्या योग्यतेची खातरजमा जरूर पाहावी आणि मगच अमलात आणावा. म्हणतात ना, न मागता वाढलेलं मीठ, न मागता दिलेला सल्ला नेहमीचं निरुपयोगी, प्रसंगी घातक ठरू पाहणारा असतो.





























































