गंध-सुगंध

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> अरुणा सरनाईक

सृष्टीत होणारे प्रत्येक बदल हे गंधभारित असतात. किंबहुना वातावरणातील गंधावरून ऋतूंची ओळख आपण ठेवीत असतो. निसर्गात या गंधाची किती एक दालनं आहेत. पावसाळ्यातील मृद्गंधाला एक शीतलतेचा, उत्साहाचा, तरलतेचा स्पर्श असतो. आईच्या स्पर्शाच्या, तिच्या कपड्याचा, खासाचा, एवढंच नव्हे तर, आईच्या हृदयाच्या स्पंदनाचा एक गंध! न बोलणारं बाळ जाणत असतं! हे सारे गंधज्ञान देवानं दिलेलं वरदान आहे.

खरं तर हे उगवत्या नवीन वर्षांचे दिवस. आंब्याचा मोहोर, कडुलिंबाचे फुलोरे, चिंचेचा चिगोर, रात्री बहरणारी रातराणी या अशा गंधांचे मादक दिवस. जुन्यांचा विरह आणि नविनेचा उल्हास! पण सध्या मात्र पुन:श्च हरिओमप्रमाणे कोरोनाचा भीतिदायक गंधहीन गंध! संपला असं वाटतं असताना तो पुन्हा अगेसर होतोय. घाबरू नका, आता तसा धोका फारसा नाहीये. फक्त काळजी अनिवार्य आहे.

नेहमीच वातावरणात एक न दिसणारा, पण जाणवणारा गंध दरवळत असतो. प्रत्येक नवीन आणि निर्जीव वस्तूंनादेखील स्वतःचा असा एक गंध किंवा दर्प असतो. तो सर्वत्र व्यापून असतो. गंधहीन असं काहीच नसतं. या गंधाचा परिचय आपल्याला जसजशी समज येऊ लागते, तसतसा दृढ होत जातो. त्यातील वेगळेपणा ओळखू येऊ लागतो. सृष्टीत होणारे प्रत्येक बदल हे गंधभारित असतात. ऋतुमानानुसार ते बदलत असतात. किंबहुना वातावरणातील गंधावरून ऋतूंची ओळख आपण ठेवीत असतो. लहान मुलांना आपण अशा प्रकारे ऋतूंची ओळख करून देत असतो. जसजशी आपली समज वाढत जाते, आपण मोठे होत जातो तसतशी गंधांची आपल्याशी मैत्री होत जाते. काही गंध आपले बालपणीचे तर काही तान्हेपणाचे म्हणजे आईच्या पोटात असतानापासूनचे स्नेही असतात. आज शास्त्र खूप जास्त प्रमाणात प्रगत आहे. पूर्वी नव्हतं तरी ते होतंच! कारण ते अगदी अनादीकाळापासून आहे. आईच्या स्पर्शाच्या, तिच्या कपड्याचा, खासाचा, एवढंच नव्हे तर, आईच्या हृदयाच्या स्पंदनाचा एक गंध! न बोलणारं बाळ जाणत असतं. त्यामुळेच आपण म्हणतो, अरे, आता याला आई कळू लागली आहे. हात कळू लागलाय. खरं तर पोटात गर्भात असतानापासून आई त्याला कळते. तिच्या मनाचे भावविभाव उमजतात. ते दोघे तेव्हापासूनच एकमेकांशी गंधबंधनाने बांधलेले असतात. त्याचं हे निःशब्द नातं, केवळ दोघांचं असतं. त्यांना एकमेकांना समजायला शब्दांची नाही, तर गंधाची ओळख पुरेशी असते.

निसर्गात तर या गंधाची कितीएक दालनं आहेत. विविध रंगीबेरंगी…तरीही प्रत्येक गंध आपला स्वतंत्र बाणा जपणारा असतो. योग्य वेळ येताच आपलं अस्तित्व विखुरणारा! निसर्गाची ही किमया आपल्याला अनभिज्ञ आहे. दिवस उलटले, युगं लोटतील, पण त्या विहितक्रमात फरक पडला नाही की वेळा चुकल्या नाहीत. आजही दिवसांची ओळख, वातावरणांची ओळख गंधावरून केली जाते. अनादीकाळापासून वातावरणात मृद्गंध ही एक अनाकलनीय रसायन आहे. मातीचा गंध! पावसाळ्यापूर्वी, पावसाच्या आगमनाचा गंध वातावरणात दरवळतो. छाती भरून श्वास घ्यावा आणि विचार करावा, कुठे बरं पाऊस पडतोय? हा मृद्गंध शेकडो मैलांवरूनही येतो. लांब कुठेतरी पाऊस सुरू झाल्याचा सांगावा देतो. मानवच नाहीतर मानवेतरांना हा गंध मोहवितो. मयूर नृत्य करतो. बेडूक आनंदाने ओरडू लागतो. ही किमया मृद्गंधाची!

नवीन दांपत्य जीवन म्हणजे एका सुंदर सहजीवनाच्या वाटचालीवर सोबत सोबत चालण्याचा एकत्वाचा, अद्वैताचा गंध असतो. नव्या नवरीच्या रेशमी वस्त्रांची सळसळ मोहवते. तसाच आजीच्या रेशमी दाभळीला कापुराचा, अष्टगंधाचा आणि अनुभवाचा गंध असतो. ती जवळून गेली तरी तिची पूजा झाली असल्याचे कळते. आजोबांची तपकीर, तुळशीजवळचा शांतवत जाणाऱ्या तेलवातीचा गंध, उदबत्तीचा वास, कोंबलेल्या निर्माल्याचा वास, दिवसभर दरवळून भावलेला फुलांचा गंध! हे सारे गंध ज्या ठिकाणी एकत्रित असतात त्या घराचा स्वतःचाही एक गंध असतो. हा सगळा गंधगाभारा आपला दिलासा असतो. आपल्या असण्याचा मुख्य पाया असतो. ऊबदार घर! घरातील माणसांच्या वावरण्याचा गंध, जेवणानंतर मिटल्या जाणाऱ्या डोळ्यांना, कपाळावर थापटणाऱ्या हातांचा स्पर्शगंध! हे सारे गंधज्ञान आपल्याला देवानं दिलेलं वरदान आहे.