
>> अरुणा सरनाईक
पाऊस निसर्गाच्या सृजनशीलतेची ओळख नव्याने करून देतो. खडकाळ पर्वतावरदेखील मायेची हिरवळ फुलवितो! खरे पाहता पाऊस या शब्दातच रोमांस आहे. पहिले प्रेम, पहिला पाऊस, पहिला स्पर्श या पहिलेपणाची सुरुवात या पावसाच्या पावसाळी वातावरणात प्रकर्षाने यंदा आठवते. वर्षं लोटली संसाराच्या रामरगाडय़ात की हे सर्व काही संपले असे वाटते! पण तसे होत नाही. प्रत्येक वर्षी येणाऱया पावसात ते नव्याने आठवते! एखाद्या पावसाळी संध्याकाळी सावळ्या सावळ्या वातावरणात हातातल्या कॉफीच्या मगावर रेषा उमटवत ते आठवते! पौढ चेहऱयावरदेखील आठवणींचा पाऊसखेळ पिंगा घालतो. पुन्हा जोडीदारांच्या राबलेल्या हातांवर स्पर्शाचा शहारा नवतारुण्याची मोहोर उठवतो.
पाऊस आवडतोय खूप! पण काही वेळेला आवडत्या गोष्टींचा अतिरेक झाला की त्रास होतो. यावर्षीच्या पावसाचे काहीसे असेच झाले. अती तीव्र दीर्घ उन्हाळ्यानंतर खूप वाट पाहिली पावसाची! खूपच खूप हुलकावणी देत, तो शेवटी आला. आला कसला बरसलाच, नव्हे कोसळलाच! त्याचे मोहक आश्वासक स्पर्श, तडाखेबाज फटकारे वाटू लागले. त्याच्या स्पर्शाची दहशत वाटू लागली. भय वाटू लागले. असा पाऊस शहरात बातम्यांमधून वर्तमानपत्रात कॉलम भरून कोसळू लागला. गेल्या 10-12 दिवसांपासून त्याचे हे असे भयावह वागणे सहन होईनासे झालेय. वर्तमानपत्र उघडले सकाळी की बाहेर अंगणात पाऊस पडत असतोच आणि बातम्यांमधील पावसाची क्षणचित्रे भयानकता वाढवित नेतात. कुठे रस्ते कोसळले, कुठे धरणे दुभंगतील, कुठे नदीला पूर आला, तलाव दुथडी भरून वाहू लागले. त्यातच होणारे अपघात! असे सध्याचे काहीसे चित्र आहे. असा पाऊस आवडीपेक्षाही भेदक वाटतो. त्याचे असे रूप मनभावत नाही, तर मनाला भिववणारे आहे. लहानपणीच्या शिक्षांमधील एक शिक्षा अशी होती की वेडय़ासारखे जर कोणी वागले तर आई पळीचा चटका द्यायची. अर्थात काही कडक शिस्तीच्या आया हा प्रकार करीतच असत! तसा मोठय़ा मातेने या वेडय़ासारख्या पावसाला पळीचा चटका दिला पाहिजे, असे वाटून जाते!
खरे पाहता पाऊस या शब्दांतच रोमांस आहे. पहिले प्रेम, पहिला पाऊस, पहिला स्पर्श या पहिलेपणाची सुरुवात या पावसाच्या पावसाळी वातावरणात प्रकर्षाने आठवते. वर्षं लोटली. संसाराच्या रामरगाडय़ात की हे सर्व काही संपले असे वाटते! पण तसे होत नाही. प्रत्येक वर्षी येणाऱया पावसात ते नव्याने आठवते! एखाद्या पावसाळी संध्याकाळी सावळ्या सावळ्या वातावरणात हातातल्या कॉफीच्या मगावर रेषा उमटवत ते आठवते! प्रौढ चेहऱयावरदेखील आठवणींचा पाऊसखेळ पिंगा घालतो. पुन्हा जोडीदारांच्या राबलेल्या हातांवर स्पर्शाचा शहारा नवतारुण्याची मोहोर उठवतो.
असा हा पाऊस! निसर्गाच्या सृजनशीलतेची ओळख नव्याने करून देतो. खडकाळ पर्वतावरदेखील मायेची हिरवळ फुलवितो! निसर्गाचा एक महत्त्वाचा घटक, सदस्य हा. पाऊस पाण्याशिवाय जीवनाची कल्पनाच अशक्य आहे. पाणी, हवा, ऊन, आकाश आणि धरती हे एकमेकांचे सगेसोयरे आहेत. एकमेकांच्या सहचार्याने निसर्गक्रम अनुक्रमित जातात. कोणाची कोणाशी स्पर्धा नाही की ईर्षा नाही. एकमेकांचा आदर करीत आपला नित्यक्रम अनुसरतात. हेच तत्त्व निसर्गाचे घेण्यासारखे आहे… आणि आपण हेच विसरतो म्हणूनच एकमेकांपासून दूर जातो. नात्यात असो वा मैत्रीत हे सामंजस्य नेहमी जपावे. मग बघा जीवनगाणे कसे सुंदर पावसाळी गीत बनते. पावसाची नावे विविध आहेत. भाषापरत्वे त्यात फरक आहे. बारीश, बरसात, पाऊस, रेन… पण भावना सर्वव्यापी आहे. याची आपल्याशी ओळख बालपणापसून होते. असा पाऊस आपल्या चित्रपटसृष्टीचा लाडका, आणि सदाबहार विषय आहे.
अगदी मूकपटापासून तो आताच्या काळापर्यंत प्रत्येक चित्रपटात एकदा तरी नायक-नायिका पावसात भिजल्याशिवाय चित्रपट पूर्णच होत नाही. असंख्य अजरामर झालेली पाऊसगीतं मराठीत, हिंदीत आजही आहेत. राज कपूरच्या चित्रपटातला पाऊस, त्याच्या नायिकेला चिंबचिंब भिजवितो. ब्लॅक अॅन व्हाईट चित्रपटातल्या त्याच्या सर्वच नायिका अत्यंत देखण्या दिसतात. मधुबाला आणि पाऊस हे एक अजब रसायन आहे. पाऊस म्हणजे मधुबाला आणि मधुबाला म्हणजेच पाऊस. तिच्या उल्लेखाशिवाय पाऊस अधुरा आहे. अप्रतिम सौंदर्य, मुग्धता (निरागस) आणि परिपक्व अभिनय आणि त्यात पाऊस! आजच्याही पिढीवर देखील हे गारूड कायम आहे. गीतकार असो- शायर असो, मराठी, हिंदी कवी असोत, त्यांच्या काव्यसंग्रहात पाऊस आहेच आणि त्यावरील कविताही! पावसाचे वर्णन आणि त्याचे सौंदर्य प्राचीन कवी, संस्कृत कवी या सर्वांच्या काव्यात आढळून येते. महाकवी कालिदासांचे महाकाव्य ‘मेघदूतम’ हे एका सुंदर विषयाचा अप्रतिम अद्धितीय काव्यानुभव आहे. आकाशातल्या जलौघाला आपला दूत करून विरहात मग्न असलेल्या, आपल्या प्रियतमेला मी व्यवस्थित आहे, लवकर आपण भेटू आला निरोप देणारा भक्ष! आणि महाकवी कलिदासांची सुंदर कविकल्पना! यांचा अजोड मिलाफ म्हणजे ‘मेघदूतम’! हेही काव्य कालिदासांना आषाढातल्या, आकाशात फिरणाऱया पावसाळी मेघाला पाहून स्फुरलेले आहे. धन्य तो कवी आणि धन्य ती कल्पना आणि धन्य तो पावसाळा!
सरत्या पावसात देखील सौंदर्य असते! भरपूर पाऊस पडून गेल्यावर आकाश बघा, किती सुंदर मनमोहक रंगांची उधळण करते! त्यात ऐन संध्याकाळी सांज खुलते! सांज खुलणं म्हणजे नक्की काय! तर सूर्याच्या सरत्या सूर्यकिरणांना अकस्मात सोनेरी पिवळ्या रंगाचा स्पर्श होतो. सर्वत्र सुंदर पिवळा रंग विखुरतो! त्यातच झाडांचा हिरवा पोपटी रंग तेजाळून निघतो. काही क्षणांपुरतेच हे सृष्टीसौंदर्य.. यालाच सांज खुलणे असे म्हणतात. हलक्या गुलाबी निळसर रंगात ही सांज परावर्तीय होत जाते. मधुमालती, सोनचाफा, जाई, जुई, सायली क्वचित कुठे रातराणी, हलकासा प्राजक्त आपल्या सुगंधाची लयलूट करतात… काय ही निसर्गाची किमया? कुठल्याही सौंदर्यस्थळापेक्षा ही सांज अधिकच देखणी! मनोवेधक असते. पण ही सरत्या पावसाची भेट असते.
खरं पाहता सर्वांनाच पावसाळा म्हणा किंवा पाऊस कोणत्याही ऋतूतला फारच प्रिय असतो. अगदी डिसेंबरच्या चढत्या थंडीत जरी तो आला तर आपण त्याचे स्वागतच करतो. विविध सुगंध आणि पाऊस, लता, तलत, मुकेश यांची पाऊसगाणी आणि कपातल्या कॉफीचा एक गरम घोट, खरेच म्हणावसे वाटते ‘और जिनेको क्या चाहिए’ जुन्या सुखद आठवणींना आपल्या मनात कायम जीवंत ठेवणाऱया या पावसाचे किती अप्रूप आहे हे ज्यांना पाऊस आवडतो त्यांनाच कळेल.


























































