स्वराज्याचे शिलेदार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> अरविंद दोडे

छत्रपती शिवरायांचा लक्षवेधक इतिहास आणि चित्तथरारक चरित्र पुनः पुन्हा वाचावेसे का वाटते? प्रत्येक पिढीला त्या रोमहर्षक बखरींबद्दल आकर्षण वाटावे असे काय आहे? ‘जय भवानी, जय शिवाजी’ असा नारा दिला की, देशभक्तीची लहर का दौडते? अशी काय जादू आहे शिवरायांच्या शिलेदारांमध्ये की, स्वातंत्र्यासाठी आणि सुराज्यासाठी लढण्याची स्फूर्ती मिळते? जगण्याला उभारी देणारा तो ज्वलंत भूतकाळ आपल्याला हवाहवासा का वाटतो? या आणि अशी अनेक प्रश्नांची उत्तरे देणारा एकंदर सोळा पुस्तकांचा संच नुकताच प्रकाशित झाला आणि प्रथम आवृत्ती महिनाभरातच संपली!

उत्तम साहित्य वाचकांपर्यंत पोहोचविण्याचे उत्तम तंत्र वापरून महाराष्ट्रभर आपल्या वितरणाचे जाळे शिस्तबद्ध रीतीने पसरवून ‘व्यास क्रिएशन्स’ने खरोखर एक चमत्कार करून दाखवला आहे.

छत्रपती शिवरायांचे एकनिष्ठ सेवक पाहिले तर लक्षात येते, स्वतः राजा सर्वश्रेष्ठ असेल तर त्याचे सहकारीसुद्धा तळहातावर शीर घेऊन लढतात (एका रात्रीत पक्ष बदलणारे राजकारणी असतील तर लोकशाहीची कशी वाताहत होते हे काय हिंदुस्थानींना सांगायला हवे!). आपण पुनः पुन्हा शिवरायांचा पराक्रम आणि राजनीती आठवण्याचे हेच कारण आहे की, देश वाचवायचा असेल तर देशभक्ती पुन्हा एकदा या समाजमनात रुजवायला हवी. इतिहास हा (आपली इच्छा असेल तर!) शहाणपण शिकवतो आणि पुन्हा सार्वभौम सत्तेच्या शिखरावर नेऊन ठेवू शकतो.

कोंडाजी फर्जंद हा स्वराज्यातील भीमपराक्रम करणारा होता. ज्याला प्रतिशिवाजी म्हणतात तो नेताजी पालकर होता. सरनौबत प्रतापराव गुजर, रणझुंजार बाजीप्रभू देशपांडे, दर्यासारंग दौलतखान, नरवीर तानाजी मालुसरे, प्रसंगावधानी जीवा महाला, रणधुरंधर येसाजी कंक, रणसम्राट कान्होजी जेधे, सर्वश्रेष्ठ गुप्तहेर बहिर्जी नाईक, शूरवीर सूर्याजी काकडे, आग्रावीर हिरोजी फर्जंद, स्वामिनिष्ठ फिरंगोजी नरसाळा, सरसेनापती हंबीरराव मोहिते, नाभिक शार्दूल शिवा काशीद, मुरारबाजी देशपांडे, वीररत्न बाजी पासलकर, मोरोपंत पिंगळे, बाळाजी चिटणीस या महान महाराष्ट्रवीरांची ही वीरगाथा सर्वांसाठी आहे. योग्य त्या चित्रदर्शी शैलीतून लेखकद्वयीने इतिहासाचा कालपट उभा केला असून समर्पक संवादशैलीच्या आकर्षकतेने प्रत्येकाच्या चरित्राचे एकेक पान रंगले आहे.

महाराष्ट्रातील महत्त्वाच्या सोळा गडकिल्ल्यांनी मलपृष्ठ सजले आहे. शिवाय आतील पानात त्यांची थोडक्यात माहिती दिलेली आहे. मुखपृष्ठs आणि आतील रेखाचित्रे सुधीर खेडेकरांची असून सुधीर मुणगेकर यांनी अतिशय सौंदर्यपूर्ण सजावट आणि मांडणी केली आहे. प्रेरणादायी पुस्तकांचा हा रंगतदार संच आशय आणि अद्भुतता यांनी परिपूर्ण असून परस्परांनी सप्रेम द्यावा इतका सुंदर आणि महत्त्वपूर्ण आहे.

शूर आम्ही सरदार/इतिहास
महेश गुप्ते आणि रामदास खरे
सोळा पुस्तके, मूल्य रुपये 750/-
व्यास क्रिएशन्स, ठाणे – 2
सोबत – प्रभो शिवाजीराजा/चरित्र/सप्रेम भेट
एकूण पृष्ठs – 512 + 108 / सचित्र
संकल्पना – दिलीप सपाटे, नीलेश गायकवाड