
>> अरविंद दोडे
कादंबरीच्या विश्वात समकालीन लेखकांच्या दमदार यादीत चांगदेव काळे हे नाव आता सर्वश्रुत झाले आहे. ‘आशाळभूत’, ‘सुभेदार’, ‘मल्हारराव होळकर’, ‘नूरजहाँ’ या कादंबऱया आणि ‘मदत’, ‘आता काय करायचं’ हे दोन कथासंग्रह त्यांच्या नावावर असून अनेक पुरस्कारांचे ते मानकरी आहेत. ‘वेदीवर’ ही त्यांची नवी कादंबरी अद्भुतरम्य ऐतिहासिक पार्श्वभूमीवर घडणारी.
राजपूत घराण्याचा स्वाभिमान आणि प्रतिष्ठेसाठी ‘प्राण जाए पर वचन न जाए’ असा रणझुंजार बाणा जपणारी काही पात्रे समोर येतात आणि वाचकांस थक्क करतात. भरगच्च घटना, त्यांना साजेशी उचित मांडणी, प्रत्येकाचे यथोचित भावदर्शन, शिवाय कालोचित भाषा / संवाद आणि परिसराबाबतची चित्रदर्शी शैली चित्तवेधक आहे. अत्यंत संयमित प्रणय प्रसंगातील हळुवारपणा अतिशय देखणा आहे. तसेच देशभक्तीविषयक उत्कट भावनांचे उदात्त दर्शन हेसुद्धा विलोभनीय आहे. राजकीय वातावरणामुळे संपूर्ण कथानक हे संघर्षपूर्ण असल्याने कादंबरीच्या बहुतांश निकषांवर आकर्षकपणे खरे ठरले आहे. विशेष म्हणजे कधीकाळी घडून गेलेली ही कहाणी सार्वकालिक जीवनाशी मिळतेजुळते विचार मांडते. दर्जेदार कथावस्तूचे हेच मूलतत्त्व असल्याने प्रत्येक युगात, प्रत्येक काळात प्रेमी जीवांना आध्यात्मिक पातळीवर भाग्याला खुडून टाकणारे जहर प्यावे लागते हे एक कटुसत्य आहे. या गद्य काव्याला इतिहासाचा आधार असला तरी अद्भुत वास्तवता विलक्षण मनोवेधक आहे.
राजकुमारी कृष्णकुंवरच्या हृदयस्पर्शी जीवनाची शोकात्म नाटय़मयता एखाद्या भव्य चित्रपटाची जणू प्राणमयता आहे. माणसामाणसांतील नातीगोती आणि परस्परांमधील स्पर्धात्मक राजकारण हे राजघराण्याला साजेसेच आहे. कथानक नायिकेच्या केंद्राभोवती फिरत असले तरी संभावितांचा अवकाश आदिबंधात्मक आहे. जोडीला निसर्गाचा भव्य कॅनव्हास असल्याने प्रत्येक पात्राच्या मानसिक आंदोलनाचा लंबक कधी सुखाकडे तर कधी दुःखाकडे झोके खात राहतो. थोडक्यात काय तर इतिहासाला जिवंत करण्याचे किंवा सजीव करण्याचे साहित्यमूल्य या कादंबरीस लाभले आहे. दैवयोगाने राजा झालेला तरुण महाराणा भीमसिंह आणि त्याच्या चार महाराण्या यांच्यातील धूसफूस, महाराणाच्या अविवाहित दोन बहिणी, त्यांच्या व्यथा – वेदना म्हणजे मोठय़ांची मोठी दुःखे व्यक्त करतात. माणूस सज्जन असो वा नसो, सुखदुःखाच्या चक्रात अडकलेला असतोच. त्यात ‘पिसले’ जाणे हेसुद्धा अपरिहार्य असते. त्रिकालाबाधित अवकाशातील खटकेबाज संभाषिते कहाणीला वेग देतात.
साडेचारशे पानांचा हा भव्य पट कुठेही कंटाळवाणा होत नाही. प्रत्येक पात्र नखशिखांत राजस्थानी किंवा मुसलमानी रंगरूपांसह वाचकांच्या नजरेसमोर साकारते हे यशस्वी कादंबरीकाराचे कसब दिलखुलास दाद द्यावी असेच दिलखेचक आहे. त्याला साजेसे मुखपृष्ठ सतीश भावसारांचे आहे.
वेदीवर
लेखक – चांगदेव काळे
प्रकाशन – मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस
पृष्ठ – 446, मूल्य – 500 रुपये





























































