
>> अश्विनी पारकर
पिकाला जन्म घालणारी शेतातील मायमुक्त असते. ती जेव्हा उपाशी पोटानं राग आळवू लागते तेव्हा स्त्रीत्वाचा प्रवास सत्त्वाकडे सुरू झालेला असतो. संगीताला सीमा नसतात. विद्रोह गल्लीतही श्वास घेतो आणि त्याचे स्वरबीज भेगाळलेल्या जमिनीतही अंकुरते. संसाराचं गणित सोपं करून सांगणारी जात्यावरची गाणी गात मोठय़ा झालेल्या केराबाई माणदेशी तरंग वाहिनीवर समालोचन करतात आणि त्यांच्या रचनाही सादर करतात. या आरजे केराबाई सरगर यांच्याशी केलेली ही दिलखुलास बातचित.
उपाशी पोट जेव्हा बेंबीच्या देठातून सुरेल ओरडू लागतं तेव्हा विद्रोह श्वास घेऊ लागतो. संगीत जसं ‘गल्ली’तलं तसंच शेतातलं आणि चाराछावणीतलंही. संगीताला सीमा नसतात. संसाराचं गणित सोपं करून सांगणारी जात्यावरची गाणी ऐकत-गात केराबाई लहानाच्या मोठय़ा झाल्या. संगीताचा वारसा त्यांनी जोपासला अन् शेतात तण उपटणारे कष्टाळू हात चिरतरुण झाले.
रेडिओ वाहिनीच्या खोलीचा दरवाजा उघडला आणि केराबाईंची पाठमोरी आकृती दिसली. मला पाहताच केराबाई मागे वळल्या. आलात व्हयं! कसा झाला प्रवास? सुकलेल्या त्या माण तालुक्यातील परिस्थितीच्या झळांचे चटके सोसणाऱया केराबाईंची मूर्ती शेतातील पिकाइतकीच लांब होती. हिरवीकंच साडी आणि झिजलेल्या वहाणा त्यांच्या कष्टाची साक्ष देत होत्या. केराबाईंच्या त्या पाणीदार डोळ्यांत जणू तिथं दुर्भिक्ष असलेल्या पाण्याचा बांध जमला होता. करडय़ा रंगाची बुब्बळे थकलेल्या वयाची साक्ष देत होते.
पिशवीतील चिखलाने मळलेली साडी केराबाई दाखवत म्हणाल्या, येताना नेसलेली साडी इथं बदलली. येताना वांगी, लसूण, कांदा भिजवून आले. मोटार सुरू केलेली नव्हं. शेतातलं काम उरकलं नि लगेच इथं निघाले. आज केराबाईंच्या मुलाची मोटरसायकल नव्हती त्यामुळे काही किलोमीटरचा रस्ता त्यांनी पायी तुडवला होता. तिथून पुढे त्यांना वाटेत गावातील एका व्यक्तीचा टेम्पो मिळाला. त्यांच्या गावाचं नाव दिरबागवाडी. दहिवडच्या जवळ हे गाव आहे. दहिवड ते म्हसवड सुमारे 35 किलोमीटरचा रस्ता आहे. केराबाईंनी त्यांच्या दोन मुलींच्या जन्मानंतर पहिल्यांदा रेडिओ ऐकला. त्यावेळी त्या सकाळी सहा वाजता रेडिओ ऐकत. मुलगी बाजारातून आली की आम्ही रेडिओ ऐकायचो. त्यावेळी पुणे, सातारा, मुंबई केंद्र, विविध भारतीवरची आम्ही गाणी ऐकताना कामं पटापटा उरकायची. कधी तरी आपण बी रेडिओवर गाणं गावं असं वाटायचं, पण आपण साधं गावाकडचं माणूस. आपला आवाज बी गावरान. आपल्याला कोण ऐकणार असं वाटायचं.’ केराबाई लिहीत-वाचत नाहीत, पण त्या नवनवीन गाणी तयार करतात आणि नंतर सादरही करतात. याबद्दल केराबाई सांगतात, ‘‘मी लहान होते तेव्हा माझी माय, चुलती, आत्या जात्यावरची गाणी गायच्या. त्यांना गाणं बोलताना बघून लयं बरं वाटायचं. मग म्या त्यांच्यासोबत गाणं म्हणायचे. तवा त्या गाण्याचे शब्द लक्षात ठेवण्यापरीस माझ्याकडं काही मार्गचं नव्हता. कारण आम्ही शाळा पाहिलीच नाही. कोण धाडणार? माझं तर बहिणीच्या बी आधी लग्न करून दिलं.
‘‘तुम्हाला आठवतं का हो तुमचं लग्न, किती वय होतं तुमचं?’’. केराबाई उत्तरल्या, मला तवा काय बी कळत नव्हतं! तुम्हा पोरींना आता मोत्याच्या, फुलांच्या मुंडावळ्या मिळतील लग्नात. आमच्या लग्नाच्या येळी मुंडावळ्या ज्वारीच्या, बाजरीच्या, शेतातल्या धान्याच्या. त्यात सुकामेवा, खोबरं. मी लहान. त्या मुंडावळ्या तोडून खात होते. माझ्या घरी तशी आम्ही कमी माणसं. त्या इतक्या मानसांना बगून रडत व्हते.
केराबाई रेडिओ जॉकी कशा झाल्या हे जाणूण घ्यायचं होतं मला. केराबाईंनी सांगायला सुरुवात केली, एकदा माणदेशी तरंग वाहिनी ऐकत असताना जाहिरात ऐकली. ज्याला कुणाला गायचं असेल त्यात रेडिओ वाहिनीमध्ये येऊन भेट द्या असं सांगत व्हते. माझा मुलगाच मला सगळीकडे घेऊन जातो. हितं बी घेऊन आला. आज दहा वरीस जालं मी माणदेशी तरंग वाहिनीवर गातेय. मी सगळी गाणी गाते. जात्यावरची गाणी, पांडुरंग, राम आणि किस्नाचा पाळणा, शेतकऱयांसाठी मी तयार केलेली गाणी. गाणी म्हणून दाखवता अशी नुसती फर्माईश करायचा अवकाश केराबाईंनी पांडुरंगाच्या पाळण्यापासून सुरुवात केली.
‘‘’पहिल्या दिवशी आनंद जाहला, टाळ विण्याचा गजर केला, चंदन, बुक्याचा सुवास केला, उठा लक्षुमी न्हाऊच घाला, पाळणा बांधीला राममंदिरी जो बाळा जो रे जो.’’
केराबाईंनी काही वेळापूर्वी दाखवलेल्या पिशवीतील गुलाबी मृदू साडीची आठवण होते. त्या साडीचा पोत जसा मऊसूत तसा केराबाईंचा गळा. गप्पा मारता मारता आम्ही समोरील स्टुडिओत जातो. तिथे केराबाईंचा कार्यक्रम ध्वनिमुद्रित करण्याची सर्व यंत्रणा सज्ज असते. केराबाई सांगतात, मी अडाणी पर माझी दोन्ही लेकरं शिकली. माझ्या नाती बी शिकतात. शाळंत जातात. माणसानं शिकलं पाहिजे. त्यांचं पुढील गाणंही या विचारांना अनुसरून आहे.
’वाहिल्यानं गंगा या ज्ञानमंदिरात, या ज्ञानहृदयात, सावित्रीबाई फुले यांना माझा दंडवत.’
सावित्रीबाई फुले नसत्या तर स्त्रिया शिकल्या असत्या का? सांगा बरं. म्हणून माझा त्यांना दंडवत असा या गाण्याचा अर्थ. गाणं सुरू राहतं. कोरी पाटी कधीही हातात न धरलेल्या केराबाई मूळाक्षरांवरचं प्रेम संगीतातून व्यक्त करत असतात. अशी अनेक गाणी केराबाईंनी लिहिलेली आहेत. केराबाई त्यांच्या गाण्यांमुळे प्रसिद्ध झाल्या, पण त्यांना सुरुवातीला याची काहीच कल्पना नव्हती. ज्यावेळी त्या साताऱयाला जात तेव्हा तेथील शेतकरी त्यांना विचारतं तुझा आवाज म्हसवडवरून आम्हाला इथे कसा ऐकायला येतो? आता केराबाईंची गाणी ऐकण्यासाठी ठरलेल्या वेळी शेतात रेडिओ सुरू केला जातो.
या संवादानंतर मात्र केराबाई सुरुवातीपासून पुन्हा सुरू करतात. रेडिओ जॉकी केराबाईंचं समालोचन सुरू झालेलं असतं. म्या केराबाई सरगर तुमच्या या माणदेशी तरंग वाहिनीवरून तुमच्यासाठी खास गीतांचा कार्यक्रम घेऊन आले हाये. केराबाई सरगर माझं गाव दिरबागवाडी. तुमच्यासाठी चमत्कारांची परंपरा ह्ये गाणं मी गाणार आहे. त्याआधी गाण्याविषयी थोडं सांगते. ऐका, मी अन् माझ्या नातवानं हे गाणं तयार केलं आहे. या बायांच्या अंगात येत. त्यांनी डॉक्टरांकडे जायला पाहिजे. भोंदूबाबांकडे न जाता शाळतं जायला पाहिजे. तवा हे पुढचं गाणं ऐकाच, सादर करते.
‘’चमत्कारांची परंपरा या धर्तीवर वाढली, या धर्तीवर वाढली, अन् भोंदूबाबाच्या चमत्काराला ही दुनियाही भाळली जी,
असं घडलंच नव्हतं कधी, असं होणार नाही कधी या दुनिवेमधी जी जी जी,‘’
गाणी सुरू राहतात. परतीच्या प्रवासात केराबाईंचा स्वर कानात उमटत असतो, कायेचे मन, हे मायेचे, चंदन मानसा, वंदन मानसा, करू वंदन मानसाला व्हं, वंदन मानसा.



























































