
>> अस्मिता येंडे
कविता म्हणजे कमीत कमी शब्दांत जास्तीत जास्त व्यक्त होणं. मनातील भावनांना अलगद शब्दरूप देऊन कागदावर उतरवणं म्हणजे कविता. कविता म्हणजे एक प्रकारचं मेडिटेशन आहे असे मानणाऱ्या कवयित्री नीता ठाकूर यांचा ‘गंधाळलेल्या शब्दसरी’ हा पहिलाच काव्यसंग्रह आपल्या भेटीला आलेला आहे. यशोदीप पब्लिकेशन्स, पुणे यांनी हा काव्यसंग्रह प्रकाशित केलेला आहे. कवयित्री नीता ठाकूर यांनी आधी दोन इंग्रजी कादंबऱ्यांचे लेखन केलेले आहे.
‘गंधाळलेल्या शब्दसरी’ हा काव्यसंग्रह वेगवेगळ्या विषयांनी बहरलेला आहे. त्यांच्या कवितांमधून निसर्ग सतत भेटत राहतो. निसर्ग, झाडे, फुले, समुद्र, सकाळ, संध्याकाळ, मन असे विविध विषय आपल्याला या काव्यसंग्रहात वाचायला मिळतात. प्रेम, विरह या संवेदनांचे सुंदर वर्णन या कवितांमधून व्यक्त होताना दिसते.
‘आठवणींचे आकाश’, ‘स्वप्न तूच होतास’, ‘गुलाबी ठंडी’, ‘भावना मनीच्या’ , ‘मिठीत जाता तुझ्या सख्या रे’ या कवितांमधून प्रेम, विरह, यातना, एकटेपण या भावना व्यक्त होताना दिसतात.
‘काव्यमय सकाळ’ या कवितेत कवयित्रीने सकाळच्या वेळी खुललेले निसर्गाचे सौंदर्य सुंदररित्या वर्णिलेले आहे. तसेच ‘संध्याकाळ ती रंगत होती’ या कवितेत संध्याकाळी घडलेल्या निसर्गाचे दर्शन या कवितेतून दिसून येते.
पाऊस म्हटला की, हिरवळ, गारवा, मातीचा सुगंध, पण त्या पावसासोबतच मनात साठलेल्या भावनांना बाहेर पडण्याचा मोह का होतो, आठवणी का वाहवत जातात, काय नातं असतं या पावसाचं आणि आठवणींचं? कवयित्रीने हेच नाते ‘पावसाचे आठवणींशी नाते’ या कवितेत मांडले आहे.
‘लग्न’ आयुष्यातील सगळ्यात महत्त्वाचा क्षण. लग्न म्हटलं की, घाई-गडबड, मांडव, हळद, अलंकार, साडय़ा, नटणं-मुरडणं, मानपान, जेवणं, नाच-गाणी, सप्तपदी, दोन कुटुंबांतील गोड नातं निर्माण करणारा एक संस्कार सोहळा. लग्न म्हटलं की, हे संपूर्ण चित्र डोळ्यांसमोर उभे राहते. ‘अशाच एका लग्नघरी’ या कवितेत कवयित्रीने लग्नघरातील कामाची गडबड, जोरदार तयारी या सगळ्यांचे वर्णन काव्यरूपात मांडले आहे.
‘प्रेम म्हणजे काय असतं’ या कवितेत कवयित्री सांगते, ‘‘प्रेम म्हणजे काय असतं? दोन शब्दांत सामावणारे खूप काही असते. दोन मनात विसावणारे अवघे जगच असते. हृदयाने हृदयाशी जोडलेले निःस्वार्थी नाते असते…’’
किती सुंदर, सहज शब्दांत कवयित्रीने प्रेमाची व्याख्या सांगितली आहे! खरेच कविता करायला असेच संवेदनशील मन लागते.
‘वृक्ष महती’, ‘आर्जवं वृक्षाची’ या कवितांमधून झाडांचे मनोगत, त्यांच्या वेदना कवयित्रीने मांडल्या आहेत. ‘गझल म्हणाली कवितेला’ या कवितेत ‘गझल’ आणि ‘कविता’ यांची जुगलबंदी रंगलेली दिसते. दोघीही आपापली वैशिष्टय़ं सांगण्यात पटाईत. कवयित्रीने या दोन्हींची वैशिष्टय़ं या कवितेतून सांगितली आहेत. ‘हाक शेतकऱ्याची’ या कवितेतील शेतकरी आपली व्यथा मांडतोय. दुष्काळामुळे शेतात धान्य नाही, प्यायला पाणी नाही, धान्य पिकत नाही. मग खायचे काय? तो देवाकडे मागणे मागतोय. ‘‘शिवार फुलू दे, दुष्काळ संपू दे, घासभर अन्न मिळू दे, प्राण जाण्याआधी घोटभर पाणी लाभू दे…’’ अशी आर्त विनवणी तो देवाकडे करतो आहे.
‘कविता ही कविता’, ‘कविता म्हणजे काय असते’, ‘शब्दांविन कविता’, ‘कविता जन्मली अशी’ या कवितांमधून कवयित्रीने कविता नेमकी काय असते, तिचं महत्त्व काय हे सांगितले आहे.
कवयित्री नीता ठाकूर यांच्या कवितांमधून निसर्ग डोकावताना दिसतो. प्रेम, विरह, यातना या सगळ्या संवेदना कवयित्री काव्यातून व्यक्त करते. तसेच कवयित्री सामाजिक भान जपताना दिसते. तिच्या कवितेतील शब्दांना आठवणींचा गंध आहे. तिच्या प्रत्येक शब्दातून हा गंध पसरत राहतो. ‘गंधाळलेल्या शब्दसरी’ या काव्यसंग्रहाला प्राध्यापिका रूपाली अवचरे यांची प्रस्तावना लाभलेली आहे. काव्यसंग्रहाचे मुखपृष्ठ यशोदीप पब्लिकेशन्सचे श्री. निखिल लंभाते यांनी केलेले आहे. त्या त्या कवितेला साजेशी चित्रेही या काव्यसंग्रहात दिलेली आहेत. या ‘गंधाळलेल्या शब्दसरी’ रसिकांना नक्कीच सुखावतील…
-अस्मिता प्रदीप येंडे
गंधाळलेल्या शब्दसरी (काव्यसंग्रह)
कवयित्री – नीता ठाकूर
प्रकाशन – यशोदीप पब्लिकेशन्स, पुणे
मूल्य- 110 रुपये




























































