दखल – चित्रमय काव्यानुभूती

>>अस्मिता येंडे

कविता म्हणजे काय? याची साधी सरळ व्याख्या म्हणजे ‘कमीत कमी शब्दांत जास्तीत जास्त आशय व्यक्त करणारी रचना’. हिंदुस्थानी मीमांसकांपासून ते पाश्चिमात्य भाषाभ्यासकांपर्यंत अनेकांनी काव्याची व्याख्या करण्याचा प्रयत्न केला, पण कवितेची ठोस अशी व्याख्या आपण ठरवणं शक्य नाही.

कविता मनाच्या गाभाऱयापर्यंत पोहोचण्यासाठी महत्त्वाचा दुवा आहे भाषा. अनुवाद या प्रािढयेमुळे इतर भाषेतील साहित्याचा आस्वाद घेणे शक्य झाले आहे. असाच एक काव्यसंग्रह रसिक वाचकांच्या भेटीस आला आहे. साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त कोंकणी कवितासंग्रह ‘चित्रलिपी’ याचे मूळ कवी परेश कामत आहेत. या मूळ कोंकणी कवितांचा मराठी अनुवाद संवेदनशील कवी, लेखक, निवेदक, संपादक, अनुवादक गीतेश शिंदे यांनी यथार्थपणे केला आहे.

‘चित्रलिपी’ कवितासंग्रहातील कविता या प्रवाही आहेत तसेच वास्तवतेचा स्वीकार करणाऱया आहेत. विविध प्रतिमांच्या माध्यमातून मानवी मनाचा तळ अगदी स्पष्टपणे प्रतिबिंबित केला आहे. मूळ आशयाला कुठेही धक्का न लावता मूळ कवीला अभिप्रेत असलेला भाव गीतेश शिंदे यांनी समर्पकपणे ‘चित्रलिपी’मधून उलगडला आहे. या कविता वाचताना मूळ कोंकणी कविता वाचण्याचा मोह होतो. या कवितासंग्रहामुळे कोंकणी कवितेचा एकूण प्रवास जाणून घेण्याची उत्सुकता वाचकांना सतत खुणावत राहील. समुद्र, खडक, पाणी, झाडे, पक्षी, होडय़ा अशा प्रतिमांचा वापर करून मानवी जीवनाचे सूत्र, त्याच्या भावना टिपल्या आहेत. या कवितांमध्ये हिरवागार रंग आहे, पाण्याच्या प्रवाहात निर्माण होणारे जलतरंग आहेत, पक्ष्यांची किलबिल आहे, आकाशात निर्माण होणाऱया पिवळय़ा रंगाच्या किरणांचं दृश्य आहे, पानांची सळसळ आहे, एकंदरीत निसर्गाने निर्माण केलेल्या विविध रंगांची उधळण या कवितांमध्ये उतरली आहे.

मानवी मनाचे व्यवहार, निर्मळ शब्दांनी विणलेले प्रीतीचे बंध आणि निसर्ग प्रतिमांनी स्व-अस्तित्वाची जाणीव करून देणारा हा कवितासंग्रह आहे.