विचित्र संगीत दिनाच्या निमित्ताने …

577

>> अतुल दाते, संगीत आस्वादक

आज आंतरराष्ट्रीय विचित्र संगीत दिन. विचित्र संगीत. आपला कानांचा पाया अनेक संगीत प्रकारांवर भक्कम उभा आहे. लोक संगीत, शास्त्रीय संगीत, भावगीत, सुगम संगीत, गझल इ. इ. आज या साऱया बावनकशी सोन्याची मोडतोड करून खरेच विचित्र संगीत जन्माला येत आहे. आपले प्राचीन संगीत विचित्र होऊ न देणं आपल्याच हाती आहे.

हिंदुस्थानी संगीतामध्ये मुळात संगीताचा पाया हा शास्त्रीय संगीताचा होता. शास्त्रीय संगीतातूनच वेगवेगळय़ा संगीताचे बाज दिसून आले. मग ते भक्तिसंगीत असो, नाटय़संगीत असो, भावसंगीत असो किंवा सिनेसंगीत असो. हे सगळे संगीताचे प्रकार हे त्या शास्त्रीय संगीतातून आलेले प्रकार आहेत. पण याच पायांना विचित्र संगीताने बहुधा कापायचे ठरवले आहे. किंबहुना आपण असं म्हणू शकतो की ना शास्त्रीय संगीत, ना भक्तिसंगीत, ना नाटय़संगीत व ना भावसंगीत अशी आजच्या संगीताची परिस्थिती आहे. सगळय़ाचा थोडा थोडा वापर करण्याच्या नादामध्ये वरील सगळय़ाच प्रकारचं संगीत हरवून बसलंय आणि शेवटी धागा पाश्चिमात्य संगीताचाच बांधला जातोय.

आज आपण संगीतात नेमकं काय शोधतो? चांगले शब्द, चाल, आवाज की चांगल्या वाद्यवृंदाचा मेळ हा प्रश्न आहे. गेल्या दहा-पंधरा वर्षांत कधीतरीच चांगली कविता, प्रसंगी चांगली चाल जन्माला आली. न जमलेला वाद्यवृंद आणि बेताचा आवाज याचा मागोवा घेतच आपण गाणी ऐकत आलो. कधीतरी एखादं चांगलं गाणं समोर येतं, जे वरील गोष्टींना अनुरूप असतं. मग काही दिवस ते मनात घर करून राहते. मागच्या वर्षी असंच एक गाणं आलं होतं. त्याला बरेच पुरस्कारही मिळाले. ते गाणं होतं ‘माझे तुझे’. ‘मुरांबा’ चित्रपटातलं हे गाणं असंच मनात घर करून राहिलं. खरंतर हे गाणं चित्रपटात अर्धंच वापरलं गेलं, पण ते लोकांना इतकं भावलं की माझ्यासकट अनेक संगीतवेडय़ा रसिकांनी ते पूर्ण कुठे मिळेल याचा मागोवा घेण्याचा प्रकार केला आणि पूर्ण मिळवलंही. असं आज आपण किती गाण्यांच्या बाबतीत करतो? किंबहुना माझ्या वडिलांच्या काळात किंवा आजोबांच्या काळात फक्त गाण्यांसाठी चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहिला असे अनेक वेळा घडत असे. माझ्या वडिलांनी मला लहानपणी भगवानदादांचा गाजलेला ‘अलबेला’ चित्रपट दाखवला. सी. रामचंद्र यांचं संगीत असलेल्या या चित्रपटात अकरा गाणी होती. ही सगळीच्या सगळी गाणी ‘हिट’ होती. गाणं सुरू झालं की लोकांनी पडद्यावर पैसे टाकलेले आणि गाण्याचा आस्वाद घेताना मी पाहिलं आहे. मुळात एका चित्रपटात दहापेक्षा जास्त गाणी. प्रत्येक गाणं वेगळय़ा पद्धतीचं, तरीही दर्जेदार. आज याचा विचारही करू शकत नाही. वाद्यवृंदाच्या गोंगाटात आज गाणंच हरवलेलं दिसतं; कारण तीस-चाळीस नर्तक अभिनेत्याबरोबर नाचत असतात. त्यांच्या त्या नाचात शब्दांचं अक्षरशः पिठलं होतं.

असं म्हणतात, जे हृदयाला भावतं ते भाव संगीत आणि जे कानांना चावतं ते अभाव संगीत. कानाला चावणाऱया आणि कविता सोडून धावणाऱया या आजच्या संगीताला कोण तारणार आहे हे पाहण्याजोगे आहे.

चांगला गुरु
उत्तम संगीत येण्यासाठी एका उत्तम गुरूची गरज असते. खरी गुरू-शिष्य परंपरा कुठे हरवली आहे याचा शोध घ्यायला हवा. गुरूकडे जाऊन गुरू-शिष्य नात्याने कला शिकण्याची परंपरा लोप पावत चालली आहे. गाणं शिकणं म्हणजे एखादं गाणं दहा वेळा घोकून शिकणं हा गाणं शिकण्याचा अर्थ झाला आहे. खऱया अर्थानं गुरूची सेवा करणं, गुरूगृही राहून शिकणं हे जरी आज शक्य नसेल तरी निदान आपल्या आवाजाची जात समजून त्या पद्धतीनं एखाद्या चांगल्या गुरूकडे गाणं शिकलं पाहिजे. गेल्या काही वर्षांत ज्यांना अजून स्वतःच चांगल्या गुरूंकडे खूप शिकण्याची गरज आहे असे लोक गुरू होऊन बसलेत. नुसते गुरूच नाही, तर पाच-सात वर्षे चित्रपटात काम करून एखादी स्पर्धा जिंकून ते स्वतःला ‘महागुरू’ समजायला लागलेत. यावरून कळते की आपलं संगीत कुठल्या महाभागांच्या हातात आहे. मी सारेगम करीत असताना अनेक वेळा माझ्याकडे विचारणा व्हायची की, आम्हाला एखादा गुरू सुचवा. एकदा एकाने हाच प्रश्न मला विचारला. मी त्यांना सुरेश वाडकरांच्या ‘आजीवासन’ या संस्थेचं नाव सुचवले. त्यावर तो गायक म्हणाला, ‘आम्हाला शास्त्रीय किंवा उपशास्त्रीय संगीत शिकायचे नाही. फक्त सारेगमच्या एक-दोन फेरीत गाता यावं एवढंच गाणं शिकायचं आहे. हे ऐकल्यावर सुरेश वाडकरांसारख्या अप्रतिम गुरूकडे त्या गायकाला न पाठविण्याचा निर्णय मी घेतला.

आधी गाणं
मी असेही कलाकार पाहिले आहेत, ज्यांना खरंच गुरू-शिष्य परंपरेने गाणं किंवा एखादी कला शिकायची आहे आणि कुठल्याच स्पर्धेत कधीच जायचं नाही. अशा कलाकारांबद्दल मला खरंच खूप आदर आहे. कारण तुम्ही जर चांगलं गात असाल तर त्यासाठी स्पर्धेची गरज नसते.

रियाज महत्त्वाचा
रियाज आणि त्याचे महत्त्व सांगणारा एक अप्रतिम किस्सा आहे. जगप्रसिद्ध व्हायोलिनवादक यहुदी मेन्यूहीन याचा किस्सा. तो एकदा संध्याकाळी त्याच्या रोजच्या रियाजाच्या ठिकाणी येतो. तिकडे येऊन पाहतो की, त्याचे पाच-सहा शिष्य रियाज करीत बसले आहेत. त्याला पाहून ते शिष्य आदराने उठतात. त्यांना पाहून तो म्हणतो, ‘तुमचा रियाज चालू द्या, मी माझा रियाज नंतर करीन.’ त्यावर ते शिष्य म्हणतात, ‘आमचा रियाज संपतच आला होता, पण आम्ही तुम्हाला एक विनंती करू शकतो का? आजपर्यंत आम्ही तुम्हाला रियाज करताना पाहिले अथवा ऐकले नाही. ती संमती आज द्याल का?’ यावर तो म्हणतो, ‘एरव्ही माझी हरकत नव्हती; पण आज सकाळचा माझा रियाज झालेला नाही. त्यामुळे आता हे वाद्य कसे वाजेल हे माहीत नाही. अशी इच्छाशक्ती असलेले विद्याथीं आज आहेत का?

संगीताचे संस्कार
माझ्या जन्मापासून अत्यंत गुणी कलावंतांचे संगीत मी ऐकत आलो. 1940 ते 1980 या चाळीस वर्षांत अप्रतिम कवी, लाजवाब संगीतकार, सुरेल गायक यांच्या एकत्र येण्याने स्वर्गीय संगीताची निर्मिती झाली होती. संगीत क्षेत्रातले हे गुणी कलाकार एकत्र येऊन संगीतातला आनंद देऊन गेले. गेल्या दोन दशकांत त्या चाळीस वर्षांच्या संगीताच्या आठवणीने मन भरून येते; कारण ऊर भरून यावा असं संगीतच हरवलं आहे.

काही वर्षांपूर्वी रेडिओ आणि टीव्हीवर ‘ंवीकली टॉप टेन’ हा प्रकार सुरू झाला होता. त्यावेळी म्हणजे साधारण 15 वर्षांपूर्वी माझ्या वडिलांना एका पत्रकाराने विचारले, ‘आजच्या संगीताबद्दल तुम्हाला काय वाटतं?’ त्यावर माझे बाबा अरुण दाते म्हणाले की, प्रयत्न सगळेच चांगले करत आहेत; पण एक गोष्ट खटकते की, जे गाणं एका आठवडय़ात क्रमांक एकवर असतं ते दोन आठवडय़ांत गायब होतं. अशा दोन आठवडे टिकणाऱया संगीताबद्दल मी काय बोलणार? जाणकार रसिक चोखंदळ आहेतच.

रसिकांचा दर्जा कधीच खालावत नाही. उत्कृष्ट कवितेला, गाण्याला आणि आवाजाला दर्दी रसिक नेहमीच लाभत असतात. म्हणूनच रसिक चांगलं ऐकत नाहीत ही कारणंच चुकीची आहेत. मागच्या पिढीतील असे अनेक वयोवृद्ध आहेत. जे संसारापासून पूर्णपणे विरक्त झाले असले तरी त्यावेळच्या गायकांच्या सुरेल आवाजाच्या मोहपाशातून अजूनही विरक्त झाले नाहीत. गेल्या 60-70 वर्षांत ज्या तपस्वी लोकांनी संगीतामध्ये उत्कृष्ट काम करून ठेवलंय. ती त्यांची खरी तपस्या होती. तशी वर्षानुवर्षे तपस्या करण्याचा मानस आता दिसून येत नाही, कारण प्रत्येकाला 3-4 वर्षांत नामवंत व्हायचं असतं. मग आज अशा एका सामान्य गायकाचा ‘महागायक’ व्हायला वेळ लागत नाही. शास्त्र्ााrय संगीत आणि उपशास्त्रीय संगीताची बैठक पक्की असेल तर ते संगीत अनेक वर्षे टिकून राहतं.

मी स्वतः इतकी वर्षं जरी मीडियाचा एक भाग असलो तरी या संगीताच्या गळतीला मीडियाच बराचसा जबाबदार आहे असं मला वाटतं. मुख्य म्हणजे, टीव्ही मीडिया. कारण सांगीतिक स्पर्धा 50-60 वर्षांपूर्वीसुद्धा व्हायच्या, पण त्या स्पर्धेत फक्त संगीतालाच महत्त्व होतं. आपण दिसतो कसे, नाचतो कसे आणि आपल्या आईवडिलांसोबत खोटं रडतो कसे याला महत्त्व नव्हतं. उत्तम गुरूकडे उत्तम संगीत शिकून मगच या गाण्याच्या क्षेत्रात यायचे असा तो काळ होता असं मी ऐकून होतो आणि ते खरंही आहे. कारण रियाजाचे महत्त्व ज्या कलाकाराला कळले तोच कलाकार त्या त्या काळात आपले कौशल्य दाखवू शकला. मी म्हटल्याप्रमाणे 40-50 वर्षांआधीच्या काळात संगीताने आपल्यासमोर एक स्वरचित्र उभं केलं होतं. त्या स्वरचित्राचं विचित्र संगीत का झालं हा एक अभ्यासाचा विषय आहे, ज्याला खरं म्हणजे अजिबात अभ्यासण्याची गरज नाही.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या