फेसबुक ते मेटा : उडी की रंग सफेदी?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> अतुल कहाते

‘फेसबुक’चे नामकरण ‘मेटा’ असे करण्याची घोषणा फेसबुकचे सर्वेसर्वा मार्क झुकेरबर्ग यांनी केली आणि त्याविषयी समाजमाध्यमांवर चर्चा सुरू झाली. ‘मेटा’ हे नाव ‘मेटाव्हर्स’ या संकल्पनेचे छोटे रूप आहे. आता फेसबुकसारख्या कंपनीचे हे अचानक ‘बारसे’ करण्यामागे काय कारण आहेत, हे नामकरण म्हणजे खरंच मोठी उडी आहे की नुसतीच रंगसफेदी याविषयीची उत्तरे येणाऱया काळातच मिळू शकतील.

फेसबुक म्हणजेच आताची मेटा या कंपनीमध्ये ‘रिऑलिटी लॅब्ज’ नावाचा गट गेली अनेक वर्षे आभासी सत्य (व्हर्च्युअल रिऑलिटी) या तंत्रज्ञानाविषयीचं संशोधन करत आहे. हजारो बुद्धिमान लोक त्यात सहभागी झालेले आहेत. इतकंच नव्हे तर या कामासाठी आपण आता आणखी 10 हजार लोक युरोपमध्ये भरती करणार असल्याची घोषणाही मेटाच्या वतीनं करण्यात आली आहे. या तंत्रज्ञानासाठी आपण तब्बल एक हजार कोटी डॉलर्स खर्च करणार असल्याचंही सांगण्यात आलं. एकूणच तंत्रज्ञानाच्या भविष्याची दिशा कशी असणार आहे याची चुणूक यानिमित्तानं जगाला बघायला मिळाली असं आपण म्हणू शकतो. याचं कारण म्हणजे फँग गटामधल्या कंपन्या जे करतात त्यानुसार जग वाटचाल करतं असा अलीकडचा इतिहास आहे.

जगभरातल्या लोकांना समाज माध्यमांचं आणि संदेश वहनाच्या सुविधांचं प्रचंड मोठं व्यसन लागण्याला कारणीभूत ठरलेल्या फेसबुक कंपनीचं बारसं होत असल्याच्या घोषणेमुळे सगळीकडे चर्चा सुरू आहे. फेसबुकचा सर्वेसर्वा मार्क झुकेरबर्ग यांनी आता इथून पुढे ‘मेटा’ या नावानं आपल्या कंपनीचे नवे प्रकल्प राबवले जाणार असल्याची घोषणा केली. अर्थात मुळात फेसबुक हे या कंपनीचं मूळ नाव नव्हतंच; याची खूप कमी जणांना कल्पना असते. ही कंपनी सुरुवातीला ‘फेसबुक’ नव्हे तर ‘फेसमॅश’ या नावानं ओळखली जात असे. अर्थात फेसमॅश ते फेसबुक हा प्रवास खूप जुना आणि ही कंपनी फारशी कुणाला माहीत नसतानाच्या काळातला असल्यामुळे आता फेसबुक ते मेटा हा प्रवास मात्र खूप चर्चेत आला आहे. फेसबुक, ऍपल, ऍमेझॉन, नेटफ्लिक्स आणि गुगल या कंपन्यांच्या नावांच्या आद्याक्षरांपासून बनलेल्या ‘फँग’ या नावानं या अतिबलाढय़ कंपन्या ओळखल्या जातात. काही देशांच्या सकल राष्ट्रीय उत्पादनापेक्षा या कंपन्यांचे उत्पन्न जास्त असल्याचं दिसून येतं. साहजिकच यामधल्या कुठल्याही कंपनीनं अशा प्रकारची घोषणा केल्यावर अख्ख्या जगावर तिचे परिणाम होणार यात शंका नाही.

यासंदर्भातली घोषणा करताना झुकेरबर्ग आणि त्याचे जवळचे सहकारी ‘मेटाव्हर्स’ नावाच्या संकल्पनेविषयी बोलले. त्याचंच छोटं रूप म्हणून ‘मेटा’ हे नाव कंपनीला ‘फेसबुक’ऐवजी देण्याचं ठरलं आहे. काही जणांना हा काय नवा प्रकार आहे, असा प्रश्न पडला असेल. काही जणांना अचानकपणे फेसबुकच्या वतीनं ही घोषणा का करण्यात आली असावी असंही वाटत असणार. प्रत्यक्षात मात्र गेल्या काही वर्षांपासून कंपनीमध्ये सुरू असलेल्या अनेक प्रकल्पांमधून मिळालेल्या निष्कर्षांच्या आधारे केली गेलेली ही घोषणा आहे. इतक्या मोठय़ा कंपनीमध्ये असं काहीतरी अचानकपणे कधीच ठरत नाही किंवा तिच्या वतीनं जाहीर केलं जात नाही. त्यामागे ध्येयधोरणं, अभ्यास, निष्कर्ष, आडाखे हे सगळं असतं. आताही यापेक्षा काही वेगळं घडलेलं नाही.
आपलं प्रत्यक्षातलं जग आणि आभासी जग यामधली दरी मिटवून टाकणारा ‘मेटाव्हर्स’ नावाचा प्रकार जन्माला घालण्याचा हा प्रयत्न आहे. आपण आपल्या विश्वाला ‘युनिव्हर्स’ असं म्हणतो. हे विश्व बदलून झुकेरबर्गला ‘मेटाव्हर्स’ आणायचं आहे. यातच आधी उल्लेख केलेल्या आभासी सत्याच्या तंत्रज्ञानाचा समावेश असेल. म्हणजेच खरं किंवा सत्य काय आहे आणि आभासी काय आहे यामधला फरकच जणू संपून जावा अशी ही भन्नाट संकल्पना आहे. याच्या पुढचं पाऊल म्हणजे ‘ऑगमेंटेड रिऑलिटी (एआर)’चं तंत्रज्ञान. यामध्ये आभासी आणि प्रत्यक्षातलं जग यामधले फरक धूसर तर होतातच, पण आपण खऱया जगात आहोत का आभासी जगात आहोत, हेसुद्धा कळेनासं होतं. हे नेमकं कसं घडतं?

यासाठी आपल्याला विशिष्ट प्रकारची उपकरणं अंगात घालावी लागतात. उदाहरणार्थ एखादं विशिष्ट प्रकारचं हेल्मेट किंवा एखादा खास प्रकारचा गॉगल. याच्या पुढे जाऊन आपल्या शरीराला अनेक प्रकारच्या संवेदना पुरवणारी सेन्सर्सही लवकरच येतील. हे सगळं परिधान करून आपण आपल्या घरी बसल्यावर अशीच उपकरणं घातलेल्या इतर माणसांबरोबर आपण जणू मोटारीची शर्यत लावल्यासारखी आपण चित्तथरारक शर्यत लावू शकू. म्हणजेच आपण जणू एखाद्या गाडीत बसून ती चालवत आहोत असं आपल्याला वाटेल आणि तिकडच्या माणसाला किंवा माणसांनाही तसंच वाटेल. आपण गाडी चालवण्यासारख्या सगळ्या कृती बसल्या जागी करू. आपण जणू एखाद्या रस्त्यावर किंवा रेसिंग ट्रकवर हा अनुभव घेत असल्यासारखा अगदी अस्सल अनुभव यात मिळेल. आताच्या गेम्समध्ये हे फारच जुजबी प्रमाणात असतं. याचं कारण म्हणजे असा गेम खेळत असताना आपण आपल्या खऱया विश्वातून काही काळासाठी या गेमच्या विश्वात प्रवेश केलेला असल्याचं भान आपल्याला कायम राहतं. ‘मेटाव्हर्स’मध्ये मात्र हे भान निघून जाईल अशी संकल्पना आहे. म्हणजेच आपण नेमके कुठल्या जगात आहोत आणि कुठलं जग आभासी आहे, हेच कळेनासं होईल! आताच्या फेसबुकवर आणि इन्स्टाग्राम यांच्या कोटय़वधी युजर्सना अशा प्रकारे एकमेकांशी संवाद साधता आला तर त्यातून काय काय घडू शकेल याची कल्पनाही आता आपण करू शकत नाही. आभासी गेम्स, आभासी कार्यक्रम, आभासी वस्तूंची खरेदी, आभासी पर्यटन, आभासी कला प्रकारांची खरेदी, एकमेकांच्या आभासी अवतारांसह एकत्र भटकणं, आभासी शस्त्र्ाक्रिया आणि काय काय!

नील स्टीफन्सन या विज्ञान लेखकानं सत्य आणि आभासी जगाची सरमिसळ बेमालूमपणे होईल असं भाकीत सुमारे तीन दशकांपूर्वीच केलं होतं, पण आता आपलं भविष्यच झुकेरबर्गनं यावर पणाला लावलं आहे. त्याच्या शब्दांमध्ये सांगायचं तर ‘मोबाईल इंटरनेटचं पुढचं पाऊल’ हेच असणार आहे. खरोखरच हे होईल का? फेसबुकचा इतिहास बघता आतापर्यंत तरी इतर अनेक कंपन्या विकत घेत घेत आणि त्यांच्या तंत्रज्ञानावर आरूढ होत फेसबुकची वाटचाल झालेली असल्यामुळे आपल्याला याविषयी साशंकता वाटते असं ‘न्यूयॉर्क टाईम्स’चा लेखक केव्हिन रूस म्हणतो.

आता महत्त्वाचा प्रश्न म्हणजे झुकेरबर्गला याची गरज का भासावी? यामागे काही कारणं आहेत. पहिलं कारण म्हणजे सुरुवातीला फेसबुकला आणि आता इन्स्टाग्रामलाही लोक कंटाळायला लागली आहेत. त्यामधलं नावीन्य संपल्यामुळे तरुण पिढी तर फेसबुकवर नसतेच, पण हळूहळू ती इन्स्टाग्रामपासूनही दूर चालली आहे. टिकटॉक, स्नॅपचॅट अशांसारख्या ऍप्सकडे ही मंडळी खेचली जाताना दिसते. साहजिकच या पिढीला धरून ठेवण्यासाठी काहीतरी रोमांचक करणं फेसबुकला भाग आहे. दुसरं कारण म्हणजे फेसबुकचं मोबाईल ऍप ऍपल आणि गुगल या कंपन्यांच्या ऑपरेटिंग सिस्टीम्स असलेल्या फोन्सवर चालत असल्यामुळे या कंपन्यांच्या धोरणांमधल्या बदलांचा फटका फेसबुकला बसतो. या कंपन्या फेसबुकच्या अगदी थेट शत्रू नसल्या तरी मित्र नक्कीच नाहीत. साहजिकच फेसबुकच्या प्रगतीमध्ये जितके खोडे त्यांना घालता येतील तितकं त्यांच्या दृष्टीनं चांगलंच असतं आणि त्यासाठी ते प्रयत्नशील असतात. हाही अडसर फेसबुकला नको आहे.
याखेरीज लोकांची माहिती अवैध रूपानं गोळा करणं, साठवणं, तिचा अनैतिक मार्गांनी वापर करणं, अमेरिकी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपासून इतर असंख्य बाबतींमध्ये लुडबूड करणं किंवा खोटी माहिती पसरवणं अशांसारख्या आरोपांमुळे फेसबुक बेजार झाली आहे. तिचे तुकडे करून काही उपकंपन्या निर्माण कराव्यात यासाठीचा खटला अमेरिकेमध्ये सुरू आहे. साहजिकच आपल्या व्यवसायाचं स्वरूप आमूलाग्रपणे बदललं तर कायदेशीरपणे कंपनीचं विभाजन करण्याच्या मुद्दय़ांमध्ये दम उरणार नाही असा झुकेरबर्गचा अंदाज असावा. यामुळे आपली प्रतिमा उजळून टाकण्यासाठी आणि ‘लोकांकडून सगळं ओरबाडून घेणारा संधिसाधू उद्योगपती’ याऐवजी आपल्याला लोकांनी ‘भविष्यवेत्ता’ म्हणून ओळखावं आणि आपल्या कंपनीची ओळखही तशीच व्हावी ही झुकेरबर्गची इच्छा असावी असा दाट संशय येतो.

वरवर जे दिसतं तसं ते बरेचदा नसतं असं आपल्याला कालांतरानं आढळून येतं. झुकेरबर्ग आणि फेसबुक यांचा निंद्य इतिहास बघता त्या दिवसाची वाट न बघता आताच आपण अशा प्रकारचा अंदाज बांधू शकतो. त्याविषयी ठामपणे कदाचित आता आपल्याला मत मांडता येणार नाही. तसं करणं योग्यही नाही. तरीही मूळ प्रश्नांना बगल देऊन चातुर्यानं आपली प्रतिमा उजळवत राहणाऱया लोकांची आपल्याला आता जशी सवय झालेली आहे तशीच झलक फेसबुकच्या प्रतिमा संवर्धीकरणाच्या रंग सफेदीच्या प्रयत्नानं आपल्याला बघायला मिळेल असं नक्कीच वाटतं!

माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ञ आहेत.)