विचारांचा उपवास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> ब्रह्मकुमारी नीताबेन

उपवास म्हणजे काय? तो कोणत्या प्रकारचा असावा हे जाणून घेणे गरजेचे आहे. काही गोष्टी परंपरागत चालत आल्या वा त्याचा आपण अंगीकार केला. आज ही काही श्रद्धाळू माणसे उपवास म्हणजे काही खाद्यपदार्थ तसेच पेय यांचा त्याग असेच समजतात. हे शरीर एक मशीन आहे. त्यालासुद्धा विश्रांतीची गरज आहे. जसं पिठाच्या गिरणीलासुद्धा आठवडय़ातून एक दिवस बंद ठेवले जाते. त्याचप्रमाणे आपल्या पोटालासुद्धा एक दिवस विश्रांती मिळावी या हेतूने उपवास केला जायचा. जेणे करून या शरीररूपी मशीनचं ऑयलिंग (oiling) आणि क्लिनिंग (clining) होऊ शकेल.

मनोविज्ञानामध्ये सांगितले जाते की, जर एखाद्या गोष्टीवर सतत आपण लक्ष्य केंद्रित केले तर ती गोष्ट वृद्धीस पावते. ज्याला आपण संकल्पशक्ती असेसुद्धा म्हणू शकतो. आज थोडा वेळ काढून जर आपण आपल्या मनाची तपासणी केली तर हे प्रकर्षाने जाणून येते की हे मन काही क्षणासाठी सुद्धा स्थिर राहात नाही. मनाच्या एकाग्रतेची कमी असल्याचे दिसून येते. मनामध्ये सतत विचारांचे वारे वाहत असतात. पण जर हे विचार नकारात्मक किंवा व्यर्थ असतील तर त्याचा दुष्परिणाम आपल्या शरीरावर तसेच जीवनावरही होतो. जर स्वतःला भाग्यशाली किंवा सुखी-समाधानी बनवू इच्छित असाल तर विचारांचा उपवास करणे आवश्यक आहे.

प्रत्येक समस्येचे, दुःखाचे मूळ आपल्या विचारांमध्ये आहे. जसे एखादा आजार ठीक करण्यासाठी वेगवेगळ्या औषधांचा आपण वापर करतो, पण आजाराला मुळापासून नष्ट करण्यासाठी कडू औषधे तसेच रोजच्या रोज काही नियम पाळले जातात. त्याचप्रमाणे दुःखांना, समस्यांना नष्ट करण्यासाठी आणि आयुष्यात सर्वकाही प्राप्त करण्यासाठी विचारांना सकारात्मक दिशा देणे तितकेच महत्त्वाचे आहे. पूर्ण दिवस कदाचित सकारात्मक राहणे हे खूप मोठे आव्हान असू शकेल. पण दिवसभरामध्ये फक्त एक तास आपण नियमितपणे मनाला सकारात्मक विचारांनी भरण्याचा प्रयत्न अवश्य करावा. हा तासाभराचा अभ्यासही मनाला सुखद तसेच शक्तिशाली बनवण्यास मदत करू शकतो.

शरीर कार्यरत ठेवण्यासाठी जसं अन्नग्रहणाच्या दिवसातल्या तीन ते चार वेळा आपण निश्चित करतो. या अन्न पदार्थाद्वारे शरीराला आवश्यक अशी सर्व जीवनसत्त्वे मिळावी यावर विशेष लक्ष दिले जाते. त्याचप्रमाणे मनाला आवश्यक असणाऱया पवित्र, शक्तिशाली तसेच सुविचारांची वेळसुद्धा निश्चित करावी जेणेकरून येणाऱया प्रत्येक समस्येला तोंड देण्याची शक्ती आपल्यामध्ये यावी.

आपल्या विचारांचा शरीरावर खूप मोठा प्रभाव पडतो हे ध्यानात ठेवावे. म्हणूनच मनाची तार ईश्वराशी जोडून विचारांची शुद्धी सतत करत राहणे हे आवश्यक आहे. भक्तिमार्गामध्ये उपवास तोच करू शकतो ज्याची ईश्वरावर श्रद्धा, तसेच विश्वास आहे. विचारांचा उपवास म्हणजे प्रत्येक विचार स्व-स्मृतीत तसेच ईश्वरस्मृतीमध्ये राहून करणे. थोडक्यात म्हणजे विचारांद्वारे ईश्वराबरोबर केलेला वास म्हणजेच विचारांचा उपवास.