लेख – हिंदुस्थानची भावी ‘ड्रोन’ रणनीती!

प्रातिनिधीक फोटो

>> ब्रिगेडियर हेमंत महाजन, [email protected]

हिंदुस्थानने प्रगत देशांच्या मदतीने स्वदेशी ड्रोन तंत्रज्ञान विकसित करायचा प्रयत्न केला पाहिजे. कारण ज्या वेळेला आपण अशी शस्त्रs परदेशाकडून घेतो त्या वेळेला त्यांची किंमतही पुष्कळ जास्त असते. म्हणजेच आर्मेनिया आणि अझरबैजानमध्ये झालेल्या लढाईमध्ये घडलेल्या घटनांचे विश्लेषण करून हिंदुस्थानने स्वतःचे ड्रोन वापराचे धोरण, संशोधन धोरण तयार केले पाहिजे. ड्रोनच्या लढाईमध्ये चीन आणि पाकिस्तानच्या विरोधात ड्रोनचा वापर आक्रमक कारवाई करण्याकरिता कसा करता येईल हे निश्चित केले पाहिजे.

आर्मेनिया-अझरबैजान युद्ध अझरबैजाननं जिंकलं. अझरबैजानकडून     झालेल्या ड्रोन हल्ल्यात आर्मेनियाचे खंदकात दबा धरून बसलेले सैनिक, रणगाडे, तोफखाना आणि रडार सहजपणे टिपले गेले. हा हल्ला एवढा तीव्र होता की, आर्मेनियाला शरणागती पत्करण्याशिवाय गत्यंतर नव्हते. आर्मेनियाने लढाईमध्ये रणगाडे, तोफखाना आणि विमान प्रणालीचा वापर केला. ड्रोन अशा सगळ्या शस्त्र प्रणालीवर हल्ला करू शकतात, ज्यामधून इलेक्ट्रॉनिक्स रेडिएशन बाहेर येतात. ड्रोनच्या हल्ल्यांना जास्त यश मिळाले. कारण त्यांचा अचानक जास्त प्रमाणात वापर करण्यात आला. एवढेच नव्हे तर ड्रोन्स पाठवायच्या आधी अझरबैजानने आर्मेनियाला फसविण्याकरिता काही जुनी विमाने वापरली. त्यामुळे आर्मेनियाने लगेच आपली संरक्षण प्रणाली सुरू केली, ज्यामधून इलेक्ट्रॉनिक्स रेडिएशन बाहेर आली आणि मागे असलेल्या  ड्रोन्सनी या प्रणालीवर लगेच हल्ला केला आणि मोठय़ा प्रमाणामध्ये नुकसान केले. अचानक केलेल्या हल्ल्यामुळे आर्मेनियाच्या सैनिकांच्या मनोबलावरसुद्धा मोठा परिणाम झाला. कारण आकाशात लपलेले ड्रोन कधी आणि केव्हा हल्ला करायचे हेच समजत नव्हते. ते अचानक यायचे, हल्ला करायचे आणि पुन्हा आकाशामध्ये गायब व्हायचे. आर्मेनियायाला तर असे वाटायला लागले की, त्यांचे रणगाडे आणि अतिशय महागडी फायटर विमाने यांचा सध्याच्या लढाईमध्ये काहीच उपयोग नाही.

ड्रोन तंत्रज्ञान हे तुलनेने कमी खर्चिक आणि अधिक अचूक असल्याने दहशतवादी संघटना आणि पाकिस्तानसारखी राष्ट्रं ते वापरू शकतात. त्यातील काही पैलू किंवा धडे हिंदुस्थानकरिता महत्त्वाचे आहेत, परंतु आपण या सगळ्या युद्धाचे विश्लेषण हिंदुस्थानच्या दृष्टिकोनातून केले पाहिजे. अशा प्रकारची ड्रोन तुर्कस्तान पाकिस्तानला देऊ शकतो का? उत्तर आहे अर्थात ‘हो’. एवढेच नव्हे तर चीननेसुद्धा ड्रोन प्रणाली अतिशय उत्तम पद्धतीने तयार केली आहे. म्हणून तशी ड्रोन चीनकडूनसुद्धा पाकिस्तानला मिळू शकतात.

सध्या आपल्या सैन्यातील ‘14 कोर’ लडाख सीमेवर चीनच्या विरुद्ध तैनात आहे. ती दहा ते पंधरा लांब पल्ल्याचे हेरोन ड्रोन आणि वीस ते पंचवीस मल्टी कोप्टर जवळ निरीक्षणाकरिता विकत घेत आहे. हिंदुस्थानकडे चीनच्या तुलनेत टेहाळणी करणाऱया आणि आकाशात फिरत राहणाऱया लोईटरिंग ड्रोन कमी आहे. मागच्या वर्षी सैन्याने सहाशे मिनी ड्रोन हाय अटिटय़ूडमध्ये टेहळणी करण्याकरिता विकत घेतलेले होते. नौदलाने समुद्रात टेहळणी करणासाठी दोन ड्रोन्स मागच्या आठवडय़ात भाडय़ाने घेतली आहेत.

इस्रायलची आकाशात चकरा मारणारी ड्रोन्स (Loitering drones) एखाद्या शिकाऱयाप्रमाणे आकाशात फिरत असतात आणि ज्या वेळेला एखादे लक्ष त्यांच्या टप्प्यात येते तेव्हा त्यावर ती लगेच हल्ला करतात, त्यांना बरबाद करतात आणि पुन्हा गायब होतात. आर्मेनिया आणि अझरबैजानच्या लढाईमध्ये ड्रोनचा अचानक वापर करून लढाई तात्पुरती जिंकली गेली. मात्र आर्मेनियाने त्याचा बदला अझरबैजानच्या शहरांवर क्षेपणास्त्रांचा वापर करून घेतला. हिंदुस्थान-पाकिस्तान किंवा हिंदुस्थान-चीनमध्ये असे होणे जवळ जवळ अशक्य आहे. कारण हिंदुस्थानची विमानविरोधी प्रणालीही मजबूत आहे. याशिवाय ड्रोन पाडण्याचे प्रशिक्षणसुद्धा हिंदुस्थानी सैनिकांना दिले जाते.

हिंदुस्थान-चीन सीमेवर चिनी घुसखोरीवर लक्ष ठेवण्याकरिता या प्रणालीचा वापर हिंदुस्थानी सैन्य नक्कीच करत आहे. हिंदुस्थान- चीन सीमा साडेतीन हजार किलोमीटर लांब आहे. अतिउंच  डोंगराच्या रांगा, बर्फ पडलेली शिखरे यामुळे येथे लक्ष ठेवणे सोपे नसते. म्हणूनच हिंदुस्थानने हिंदुस्थान सीमेवर ड्रोनचा वापर वाढवणे अत्यंत गरजेचे आहे. चीनमध्ये असा दावा पण केला होता की, त्यांचे सैनिक लडाखमध्ये तैनात आहे व त्यांना गरम जेवण पाठवण्याकरिता ड्रोनचा वापर करत आहेत. अर्थातच हे अजून शक्य नाही, परंतु एवढे नक्की की, जास्त उंचीवर ड्रोन वापर करून लढायचे सामान तिथे पाठवता येईल का यावर संशोधन सुरू आहे.

हिंदुस्थान-पाकिस्तान पारंपरिक युद्ध होणे हे अशक्य आहे. कारण तसे झाले तर हिंदुस्थान पाकिस्तानचे अक्षरशः तुकडे करेल. म्हणूनच ड्रोनचा वापर पारंपरिक युद्धामध्ये कसा केला जाऊ शकतो यावर विश्लेषण जास्त महत्त्वाचे नाही. महत्त्वाचे आहे की, अपारंपरिक आव्हानामध्ये पाकिस्तान याचा वापर हिंदुस्थानविरुद्ध कसा करू शकतो? लक्षात असावे, इंटरनॅशनल बॉर्डरवर आता फेन्स म्हणजे कुंपण लागल्यामुळे तिथून दहशतवाद्यांना स्फोटक पदार्थ, दारूगोळा किंवा हत्यारे पाठवणे हे कठीण झालेले आहे. ड्रोन पाठवून पाकिस्तान इंटरनॅशनल सीमेवरील हिंदुस्थानी बीएसएफच्या तैनातीमधील फटी शोधून दहशतवादी हिंदुस्थानात घुसवण्याचा प्रयत्न करत आहे. पाकिस्तान ड्रोनचा वापर अफू, गांजा, चरस किंवा खोटय़ा नोटा पाठवण्यात करतो. स्मगलिंग करण्याकरिता जास्त किमतीचे सामान पाठवणे ड्रोनने जास्त सोयीचे आहे.

चीन जगाला ड्रोन्स विकणारा एक सर्वात मोठा देश आहे. त्यामुळे वेगवेगळ्या देशांना लागणाऱया आणि त्यांच्या गरजेचे संशोधन करून त्यांना पाहिजे तसे ड्रोन्स ते पुरवत असतात. त्याला प्रत्युत्तर म्हणून हिंदुस्थाननेसुद्धा ड्रोन प्रणालीवर आपले संशोधन सुरू केले पाहिजे आणि चिनी ड्रोन्सच्या एक पाऊल पुढे राहिले पाहिजे. हिंदुस्थान सध्या फ्रान्स, इस्रायल, अमेरिकेबरोबर ड्रोन्सविषयी संशोधन करण्याकरिता कार्यक्रम तयार करत आहे, परंतु हिंदुस्थानच्या संशोधनाचा वेग हा अर्थातच चीनपेक्षा जास्त असायला पाहिजे.

आपली प्रतिक्रिया द्या