
>> डॉ. चैतन्य कुंटे
21 जून 1982 रोजी फ्रान्सचे सांस्कृतिक मंत्री जॅक लॅग आणि संगीतकार फ्लोरे मोरीस यांच्या पुढाकाराने ‘फेतदे ल म्युझीक’ (शब्दशः अर्थ ‘संगीतोत्सव’) साजरा करण्यात आला. सर्वसामान्य नागरिकांनी आपापल्या वसाहतींत, रस्त्यांवर मुक्तपणे, मनसोक्त संगीत सादर करावे, स्वतःस संगीताद्वारे व्यक्त करावे, त्यातून संगीताची विविधता व मौज अनुभवावी, असा हेतू या उपक्रमामागे होता. पुढे हा दिवस ‘विश्व संगीत दिन’ म्हणून साजरा होऊ लागला.
या दिवशी अनेक युरोपीय देशांत व अमेरिकेत व्यावसायिक संगीतकारांखेरीज हौशी गायक-वादकांच्या चमूंचे कार्यक्रम गल्लोगल्ली सादर होतात, त्यांना प्रोत्साहन दिले जाते. अर्थात यामागे तेथील संगीत व संस्कृतीविषयक काही धारणा वा नियम आहेत, ते समजून घेणे योग्य ठरेल. एक म्हणजे युरोप-अमेरिकेत व्यावसायिक कलाकारांच्या अधिकृत संस्था असतात व केवळ त्यांनाच रंगमंचांवर औपचारिकपणे, व्यावसायिकरित्या संगीत सादर करता येते. हिंदुस्थानप्रमाणे कोणीही उठला आणि संगीतकार म्हणून बिदागी घेऊन कार्यक्रम करू लागला असे तिकडे नसते. तिकडे कलावंतांना रीतसर पंजिकृत होऊन, परवाना घेऊनच तसे करता येते. त्यामुळेच जे अव्यावसायिक, हौशी कलावंत असतात त्यांना व्यक्त होण्यासाठी, सर्वसामान्य लोकांनाही मनमोकळे सादरीकरण करता येण्यासाठी या एका दिवशी संधी दिली जाते. दुसरे असे की, तिकडे सार्वजनिक जागांत संगीत सादर करणेच काय मोठे आवाज करणेही दखलपात्र गुन्हा असतो. त्या पार्श्वभूमीवर हा एक दिवस ध्वनीवरची बंधने सैल करून दिवसभर संगीताचा जल्लोष केला जातो. हिंदुस्थानसारख्या ध्वनिप्रदूषणाने भरलेल्या आणि हौशी कलावंतांच्या विनापरवाना प्रस्तुतींची रेलचेल असलेल्या देशात अशा विशेष ‘संगीतोत्सवा’ची आवश्यकता बिलकूलच नाही.
तिसरे असे की, पाश्चिमात्य जगात संगीत ही एक पैसे मोजून विकत घेण्याची, सन्मानाने विकली जाणारी कला आहे. ती आपल्या हिंदुस्थानातल्यासारखी स्वस्त नाही आणि फुकट तर मुळीच उपलब्ध नसते. त्यामुळे या एका दिवशी सर्वांना विनामूल्य संगीत ऐकावयास मिळावे, असा उद्देशही तिकडच्या या संगीतोत्सव दिनामागे आहे. हे तिसरे कारणही हिंदुस्थानात गैरलागू ठरते.
मात्र हा उत्सव हिंदुस्थानात वेगळ्या प्रकारे साजरा करता येऊ शकेल. हिंदुस्थान आणि एकंदर विश्वात जे वैविध्यपूर्ण, विशाल आणि ‘ऐकावे तेवढे अजबच’ असे संगीताचे जग आहे त्याचा आस्वाद घेऊन हा ‘विश्व संगीतोत्सव दिन’ नक्कीच साजरा करता येईल. हिंदुस्थानात सर्वसामान्य जनतेला आज फिल्मी गाणी, भावगीते, भक्तिगीते, टीव्ही चॅनेल्सवरून वाजणारे (आणि दिसणारेही) चलनी संगीत आणि अत्यल्प प्रमाणात शास्त्र्ााsक्त रागदारी संगीत एवढेच सीमित संगीत-वास्तव ठाऊक असते. या मर्यादित समजेच्या पलिकडे कितीतरी व्यापक, बहुरंगी असे संगीताचे वास्तव आहे याची कल्पना फारच थोडय़ांना असते. या ‘विश्वसंगीत दिना’च्या निमित्ताने संगीताच्या या व्यापक वास्तवाची आपण ओळख करू घेतली, पुढे त्याचा आस्वाद घेऊ लागलो आणि नंतर त्याचा अभ्यासही करू लागलो तर हा दिवस नक्कीच सत्कारणी लागेल. हिंदुस्थानच्या प्रत्येक प्रांतात तिथल्या आदीम संगीताच्या, लोकसंगीताच्या, धर्मसंगीताच्या आणि जनसंगीताच्याही कितीतरी सुंदर पण दुर्लक्षित परंपरा आहेत. सर्वसाधारणतः हिंदुस्थानी संगीत आणि कर्नाटकी संगीत या कलासंगीताच्या म्हणजे शास्त्र्ााsक्त रागदारी संगीताच्या दोन ठळक प्रणाली लोकांना माहीत असतात. परंतु त्यांखेरीज गुरुबाणी संगीत, पुष्टिमार्गी संगीत, मणिपुरी संकीर्तन संगीत, आसामी सत्रीय संगीत, ओडिशी संगीत, केरळचे सोपान संगीत अशा धर्मसंगीतातून उन्नयन होत कलासंगीताच्या पातळीवर पोचलेल्या परंपराही आहेत. गेल्या पाव शतकाच्या काळात आंतरजाल (इंटरनेट) आणि समाजमाध्यमांच्या विस्फोटानंतर या परंपरांवर फार मोठे संकट आले आहे. या माध्यमांतून व्यावसायिकरित्या विकल्या जाणाऱया ठराविकच प्रकारच्या संगीताचे एक प्रकारचे आक्रमण या एतद्देशीय, पारंपरिक संगीतावर झाले आहे. परिणामस्वरूप हिंदुस्थानातले हे पारंपरिक संगीत नष्टप्राय झाले आहे.
समाजमाध्यमांद्वारे आपल्यापर्यंत पोहोचणाऱया संगीताखेरीज या सगळ्या संगीताचे किती मोठे वैभव आहे हिंदुस्थानात! पण आपणच करंटे – आपल्या अस्सल हिंदुस्थानी संगीताचा हा खास ठेवा सोडून आपण कुठल्यातरी भलत्याच उपऱया संगीताच्या तालावर डोलतोय! आता तरी हिंदुस्थानी कानांनी सजग व्हायला हवे आणि ही हिंदुस्थानी संगीताची ठेव अनुभवायला हवी. हे संचित नुसते साठवून चालणार नाही त्याला कालौघात खेळते ठेवायला हवे – प्रत्यक्ष गाऊन-वाजवून, ऐकून आणि ऐकवून! ‘विश्व संगीत’ (वर्ल्ड म्युझीक) या शब्दाचा. ‘विश्व संगीत’ म्हणजे नेमके काय याची सुस्पष्ट कल्पना अनेकांना नसते. ‘विश्व संगीत’ या संज्ञेद्वारे पाश्चात्य अभिजात संगीताखेरीज जगभरात अस्तित्वात असलेल्या अनेक संगीतप्रणालींतील संगीताचा निर्देश केला जातो; तसेच उत्तरआधुनिक काळात या सर्व संगीतसंस्कृतींच्या मिलाफातून आकारास येत असलेल्या संगमसंगीताचाही समावेश या संज्ञेत केला जातो. जगाच्या अनेक खंडांतील मानवी समाजांचे स्थानिक, वांशिक व पारंपरिक संगीत, तसेच या पारंपरिक संगीतास आधुनिकतेचा साज चढवून बनवलेले ‘नवपारंपरिक संगीत’ही या संज्ञेत समाविष्ट आहे. एकंदरीत काय ‘जगभरातल्या विविध मानवी समाजांतील पारंपरिक संगीत’ या अर्थाने ‘विश्व संगीत’ हा शब्द योजला जातो.
‘वर्ल्ड म्युझीक’ हा शब्द अजून एका अर्थानेही चलनात आला आहे. 1980च्या दशकापासून अमेरिकन व्यावसायिक संगीत विक्रेत्या कंपन्यांनी संगीताच्या अर्थकारणाच्या संदर्भात हा शब्द वेगळ्याच अर्थाने वापरायला सुरुवात केली. संगीताच्या बाजारपेठेत ध्वनिमुद्रणांच्या विक्रीसाठी उत्पादित संगीतास पाश्चात्य अभिजात संगीत, जनसंगीत, लोकसंगीत इ. गटांत विभागले जाते. अमेरिकन संगीत बाजारपेठेत ‘पाश्चात्य अभिजात संगीताव्यतिरिक्त असलेले जगभरातील जनप्रिय संगीत’ या अर्थाने ‘विश्व संगीत’ हे शीर्षक देण्यात येऊ लागले आणि ही संज्ञा अधिक रूढ झाली. एक आशिया खंडच घेतला तर इथे हिंदुस्थानी संगीतासोबत अरबी, पर्शियन, तुर्की, मध्य आशियाई, चिनी, जपानी, आग्नेय आशियाई अशा अनेकविध संगीतसंस्कृती आहेत. आशियाखेरीज एकंदर विश्वभरात संगीताच्या अशा कितीतरी विधा, नाना परी आहेत. विश्वभरातील या संगीतपटाचा अदमास घेणेही खूप रंजक, स्तिमित करणारे आहे. ‘विश्वसंगीत दिना’च्या निमित्ताने आपल्या कानांची कवाडे आपण जरा रुंद करून रूढ पाश्चात्य संगीताखेरीजचे हे बहुरंगी संगीत ऐकण्याचा संकल्प करूया!
(लेखक संगीतकार, संस्कृती-संगीतशास्त्र्ााचे अभ्यासक, ‘डॉ. अशोक दा. रानडे अर्काईव्ह्ज’चे संस्थापक-संचालक आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ‘ललितकला केंद्र’च्या संगीत विभागात ते अध्यापक आहेत.)





























































