
>> चंद्रसेन टिळेकर
अत्रे कट्ट्याच्या माध्यमातून सामान्य माणसाने एकत्र येणं, मत मांडत स्वतंत्र भूमिका घेणं घडू लागलं. समाजामध्ये घडलेल्या, घडत असलेल्या अनेक इष्ट-अनिष्ट गोष्टींचा पंचनामा करणारा कट्टा सामान्य माणसाचा आवाज बनू लागला. हे यश सामान्य माणसाचंच म्हणायला हवं.
अत्रे कट्टा आता दर शनिवारी नित्यनियमाने भरू लागला. वेळेच्या बाबतीत आम्ही खूप तत्पर होतो. बरोबर साडेपाच वाजता कट्टा सुरू करायचो. काही वेळा त्या वेळी फक्त 30-40 माणसंच जमलेली असायची, पण आम्ही कटाक्षाने वेळ पाळायचो. समाजामध्ये घडलेल्या, घडत असलेल्या अनेक इष्ट-अनिष्ट गोष्टींचा पहिल्या पाऊण तासामध्ये जणू पंचनामा केला जायचा. परिसरातील काही दुकानदारांकडून होणारी नाना प्रकारची फसवणूक, फुटपाथवरील फेरीवाल्यामुळे पादचाऱयांना होणारा अडथळा इत्यादी इत्यादी. सरकारी, निमसरकारी कार्यालयातील वेळकाढूपणा, भ्रष्टाचार यांची उत्तरपूजा तर नित्यनियमाने व्हायची.
काही मंडळी कट्ट्यावर कविता सादर करायची. म्हणून नव्याने एक कविता लिहून आणायचे. त्यातीलच काही जणांचे पुढे कवितासंग्रह निघाले आणि त्यांनी अत्रे कट्ट्यामुळे आपण कवी झालो असे कृतज्ञतेने नमूदही केलेले आहे.
पण एका शनिवारी मात्र मला कट्ट्याच्या सामर्थ्याचा धक्कादायक साक्षात्कार झाला. दिलेल्या विषयावर बोलण्यासाठी म्हणून त्या शनिवारी विषय दिला होता, ’मराठी माणूस मागे का!’ शिवसेनेच्या जन्मानंतर हा विषय उघडपणे माणसे बोलू लागली होती. त्यासंदर्भात कट्ट्यावर खल चालू असताना पार्ल्यातील एक शिक्षिका बोलायला उभ्या राहिल्या. त्यांच्या कुटुंबाने देशासाठी मोठा त्याग केला होता. पार्ल्यातल्याच एका बँकेत त्यांचे खाते होते. दर महिन्याला त्या बँकेत आपली पेन्शन घ्यायला जायच्या. बँकेतले बहुतेक कर्मचारी मराठीच होते. तेव्हा बँकेने बाईंना प्राधान्याने सेवा द्यायला हवी होती. कारण मी आधी म्हटल्याप्रमाणे बाईंचा नावलौकिक होता. त्यांच्या कुटुंबाने देशासाठी मोठा त्याग केलेला होता, पण बँक कर्मचाऱयांना त्याचे काही सोयरसुतक नव्हते. त्यामुळे अनेक वेळा त्यांना इतर खातेदारांप्रमाणे ताटकळत बसावे लागायचे. एकदादोनदा त्यांनी काऊंटरवर जाऊन अजून किती वेळ लागेल अशी विचारणा केली, तर पलीकडून ‘’अहो, इथे आम्ही काय माश्या मारतोय का? तुमची वेळ आली की बोलावू तुम्हाला.” असे खडसावण्यात आले. ही हकीकत बाई कट्ट्यावर सांगताना आश्चर्य व्यक्त करीत म्हणाल्या की, ‘’मी मराठी आणि समोरचा कर्मचारीही मराठी. तरी तो माझ्याशी असा तुसडेपणाने बोलला. आपण मराठी माणसे जर एकमेकांचा आदर सन्मान करीत नसू तर इतर तरी आपला आदर का करतील?” ही कहाणी ऐकून सगळा कट्टा सुन्न झाला. काही काळ कोणीच काही बोलेना.
अनपेक्षितपणे एक व्यक्ती उभी राहिली आणि बाईंना म्हणाली, ‘’कोणत्या बँकेत आपले खाते आहे त्या बँकेचे नाव सांगा.” मी म्हणालो, “त्याने काय होणार आहे?” ते म्हणाले, “इथे जमलेल्यांपैकी किती जणांची त्या बँकेत खाती आहेत हे कळेल.” हे ऐकताच अठरा जणांनी हात वर केले. मग ती व्यक्ती म्हणाली, “आपण सर्वांनी आता त्या बँकेतून आपली खाती बंद करून दुसऱया बँकेत उघडायची. त्या बँकेवर निदान पार्लेकरांनी तरी बहिष्कारच टाकला पाहिजे.” कट्टेकरी मंडळींचा संताप रास्त होता, परंतु तसे लोकांनी केले असते तर कदाचित त्या बँकेच्या मॅनेजरची नोकरी गेली असती आणि न जाणो तो मराठीच असायचा! म्हणजे कळत-नकळत आपण रागाच्या भरात एका मराठी माणसाची नोकरी घालवणार होतो. हा धोका माझ्या वेळीच लक्षात आल्याने मी कट्टेकरी मंडळींना म्हणालो, ‘’तूर्तास आपली खाती बंद करू नका, पण तुमच्यापैकी कोणाला उत्तम चहाडी करता येत असेल तर मला कट्टा संपल्यानंतर येऊन भेटा.” मी ते बोलून विसरून गेलो.
कट्टा संपल्यावर दोघेजण माझ्यासमोर येऊन उभे राहिले. मी त्यांना म्हणालो, ‘’काय हो, ते आपण चहाडीचे म्हणाला होतात ना. आम्ही दोघं उत्तमपैकी चहाडी करतो.” आता मला माघार घेऊन चालणारे नव्हते. मी त्यांना म्हणालो, ‘’तुम्ही त्या बँकेच्या मॅनेजरकडे जायचं आणि आज कट्ट्यावर काय झालं ते त्यांच्या कानावर घालायचं.” त्या दोघांनी अगदी इमानेइतबारे चहाडी केली असावी. कारण दोनच दिवसांत मला त्या बँकेच्या मॅनेजरचा फोन आला. अजिजीच्या स्वरात ते म्हणाले, ‘’टिळेकर, आमच्या कर्मचाऱयांकडून अक्षम्य चूक झाली आहे. आम्हाला हेही समजलं आहे की, त्या मातेचा एकुलता एक पुत्र कश्मीरमध्ये आतंकवाद्यांशी लढताना धारातीर्थी पडला. यापुढे त्यांना रांगेत बसावं लागणार नाही. त्या आल्या की, थेट माझ्या केबिनमध्ये पाठवा असं मी माझ्या कर्मचाऱयांना सांगितलं आहे. त्यांना मी माझ्या हस्ते पेन्शन देणं हा माझा मोठा सन्मान समजेन. आपण म्हणत असाल तर मी कट्ट्यावर येऊन सर्व कट्टेकरांची क्षमा मागायला तयार आहे.”
मी त्यांना म्हणालो, ‘’एका मराठी माणसाने दुसऱया मराठी माणसासमोर नाक घासावं म्हणून आम्ही हा कट्टा काढलेला नाही. कृपया तुमच्या कर्मचाऱयांना सांगा की, अत्रे कट्ट्याच्या माध्यमातून सामान्य माणसाची युनियन आता तयार होत आहे. केवळ पार्ल्यातल्या शाखेवर बहिष्कार टाकला जाईल असं नाही, तर तुमची जिथे जिथे म्हणून शाखा आहेत तिथेही नागरिक बहिष्कार टाकतील. कारण आमचे कट्टे आता ठिकठिकाणी उभे राहत आहेत.”
मित्रहो, आज त्या बँकेत गेल्यावर अत्यंत सौजन्यपूर्वक वागणूक मिळते. म्हणजे बघा, हा सर्वसामान्यांवरचा अन्याय आपण किती वेगळ्या पद्धतीने दूर करू शकलो. कुठे घेराव नाही, मोर्चा नाही, दगडफेक नाही. याचे कारण सामाजिक बहिष्कार हे एक मोठे शस्त्र सामान्य माणसांच्या हातात आहे, पण आपण ते वापरत नाही. त्यासाठी अशा प्रकारचे अत्रे कट्टे केवळ मुंबईतच नव्हे, तर गावोगावी स्थापन झाले पाहिजेत. समर्थांनी उगाच नाही म्हटलं, ’सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे!’
– [email protected]
(लेखक वैज्ञानिक व वैचारिक विषयाचे अभ्यासक असून विवेकवादी चळवळीशी निगडित आहेत.)




























































