हिंदुस्थानी सिनेमाचे जनक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> धनंजय कुलकर्णी

हिंदुस्थानी सिनेमाचे जनक दादासाहेब फाळके यांची दीडशेव्या जयंती वर्षाची सांगता 30 एप्रिलला होत आहे. सिनेमा तंत्र हिंदुस्थानात आणण्याचे व ही कला फुलवण्याचं काम या महान व्यक्तीने केले.

आपण हिंदुस्थानी लोक आपल्या संपन्न इतिहासाच्या पाऊलखुणा जपण्यात कमालीचे उदासीन असतो. हिंदुस्थानी सिनेमाचे जनक दादासाहेब फाळके यांची दीडशेव्या जयंती वर्षाची सांगता येत्या 30 एप्रिलला होत आहे. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस आलेल्या सिनेमा या तंत्राने विसाव्या शतकातील समाजजीवनात आपले पाय घट्ट रोवले. आज करोडो लोकांची रोजीरोटी आणि सांस्कृतिक भूक भागविणाऱया चित्रपट कलेला हिंदुस्थानात आणून रुजविण्याचे महान कार्य धुंडिराज गोविंद फाळके तथा दादासाहेब फाळके यांनी केले.

फाळके यांनी चित्रपटाचे हे शिवधनुष्य उचलताना अनंत यातना सोसल्या. तन मन धन वेचून झपाटल्यागत त्यांनी चित्रपट निर्मितीचा ध्यास घेतला. त्या काळी या कला माध्यमाचं काही शिक्षण नव्हतं, प्रशिक्षण द्यायला कोणी मार्गदर्शक नव्हता. अशा नकारार्थी वातावरणात त्यांनी आपली जिद्द सोडली नाही आणि हिमतीने हिंदुस्थानातील पहिला चित्रपट ‘राजा हरिश्चंद्र’ 3 मे 1913 रोजी बनवून प्रदर्शित केला. अलीकडे परेश मोकाशी यांनी `हरिश्चंद्राची फॅक्टरी ` या चित्रपटाद्वारे हिंदुस्थानातील पहिल्या चित्रपटाचे मेकिंग दाखवल्यामुळे किमान या पिढीला फाळकेंचे नाव तरी माहीत झाले आहे.

दादासाहेब फाळके यांचे चित्र कर्तुत्व अभ्यासताना त्यांच्यातील एकूणच कलागुणांचा समुच्चय पाहून आश्चर्य वाटते. त्या काळात उपलब्ध असलेल्या तंत्रज्ञानावर त्यांनी भन्नाट ट्रिक सीन्स केले. `लंकादहन’ या चित्रपटात हनुमानाने घेतलेली उडी, `कालियामर्दन’ चित्रपटातील कालिया, स्वर्गातून अवतीर्ण होणारे विमान हे सारं चित्रपटातून मांडण्याची त्यांची शैली अफलातून होती. 1937 साली वयाच्या सत्तरीनंतरही आर्थिक विपन्नावस्थेतदेखील ते थ्रीडी सिनेमा बनविण्याचा विचार करत होते. सिनेमाकरिता जाहिरात करण्यात ते माहीर होते. पुण्याच्या आर्यनमध्ये त्यांचा `राजा हरिश्चंद्र’ चालू होता. आर्यनचे मालक पाठक यांची पिठाची गिरणी त्याला लागूनच होती. त्या वेळी `अमुक अमुक पायली दळण दळल्यावर सिनेमाचे तिकीट फ्री` अशा आयडीया त्यांनी यशस्वी केली.

1910 साली नाताळात मुंबईत `लाइफ ऑफ क्राइस्ट’ हा चित्रपट त्यांनी बघितला आणि त्यांच्या डोळ्यापुढे येशू ख्रिस्ताच्या जागी राम कृष्ण यांचे चित्र उभे राहिले. आपणही आपल्या संस्कृतीतील महान दैवतांवर चित्रपट तयार करावा ही जाणीव त्यांना झाली. पण या माध्यमाबाबत कुठेही शिक्षण मिळण्याची व्यवस्था नव्हती. परदेशातून येणारे बुकलेट्स, पुस्तक वाचून ते स्वत: स्वत:चे शिक्षक बनले. सिनेमाचे तंत्रशुद्ध शिक्षण घेण्यासाठी 1912 साली ते इंग्लंडला रवाना झाले. तिथे प्रसिद्ध चित्रपट निर्माते सेसिल हेपवर्थ यांनी फाळकेंना चित्रनिर्मितीची सर्वांगीण माहिती दिली. एक कॅमेरा आणि चित्र निर्मितीची साधने घेऊन ते मायदेशी परतले ते पूर्ण तयारीनिशी!

पुढे त्यांनी मेहनत घेऊन चित्रपट निर्मिती सुरू केली. समाज तर फाळके यांना वेड लागले असेच म्हणत होता. स्त्रीभूमिका करण्यासाठी कुणीही तयार होत नव्हते. रेड लाईट एरियामधील स्त्रियाही काम करायला तयार झाल्या नाहीत. शेवटी पुरुषांना स्त्री भूमिका देत हिंदुस्थानातील पहिला चित्रपट `राजा हरिश्चंद्र` मुंबईच्या कॉरोनेशन थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. त्यांच्या जिद्दीने हिंदुस्थानी समाज जीवनातील कला जीवनाचा नवा अध्याय सुरू झाला.

1917 साली त्यांनी आपली फाळके कंपनी बंद करून `हिंदुस्थान फिल्म कंपनी काढली. पुढच्या दहा वर्षांत तब्बल 87 चित्रपट दिग्दर्शित केले. फाळके यांच्या चित्रपट निर्मितीने प्रोत्साहित होऊन हिंदुस्थानात मूकपट सर्वत्र तयार होऊ लागले. 14 मार्च 1931 रोजी हिंदुस्थानातील पहिला बोलपट चित्रपट `आलमआरा` प्रदर्शित झाला आणि मूकपटाचा जमाना हळूहळू संपत गेला. फाळके यांचे वय झाले तरी त्यांचा उत्साह प्रचंड होता. `गंगावतरण` हा एकमेव बोलपट त्यांनी 1936 साली बनवला. हिंदुस्थानात चित्रपट निर्मितीच्या रौप्य महोत्सवी वर्षी म्हणजे 1938 साली मोठा समारंभ झाला. या समारंभात त्यांनी केलेले भाषण वाचल्यावर आजही डोळे पाणावतात. सिनेमाच्या ध्यासाने पछाडलेले हिंदुस्थानी चित्रपट सृष्टीचे जनक, पितामह फाळके यांचे 16 फेब्रुवारी 1944 साली निष्कांचन अवस्थेत देहावसान झाले. त्यांच्या शताब्दी वर्षापासून 1970 सालापासून त्यांच्या नावाचा सिनेमाच्या दुनियेतील असा सर्वोच्च पुरस्कार सुरू झाला. कलासक्त मनाच्या दादांना व्यावहारिक दुनियेत अपयश आले, पण त्यांनी लावलेल्या कलेच्या रोपाने अनेकांच्या आयुष्याला अर्थ आला आहे.

समृद्ध वारसा पोहोचवणारे व्यासपीठ
दादासाहेब फाळके यांच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवाच्या उंबरठयावर फाळके कुटुंबीयांनी एक वेब साईट सुरू केली आहे. www.dpiam.org.in या वेबसाईट द्वारे करण्यात आलेल्या व्यासपीठाच्या माध्यमातून दादासाहेब फाळके यांचे व्यक्तीमत्व, त्यांचे अतुलनीय कार्य, प्रवाहाविरुध्द पोहण्याची त्यांची जिद्द, त्यांचा देशाभिमान, त्यांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी सोसलेल्या हालअपेष्टा हे सारं सारं नवीन पिढीपर्यंत पोचलं पाहिजे, हा त्यांचा प्रयत्न असणार आहे.

– (लेखक चित्रपट अभ्यासक आहेत)