दीर्घायु भव : किशोरवयीन मुलांसाठी क्रॅश डाएट ठरतंय धोकादायक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हल्ली किशोरवयीन मुलांमध्ये क्रॅश डाएटचे (वजन कमी करण्यासाठी कमी कॅलरी आहार) फॅड दिसून येते. तो अजिबात उपयोगाचा नाही. या डाएटमुळे शरीराला गरजेचे असलेले पौष्टिक घटक मिळत नाहीत. किशोरवयात शरीराला पुरेसे पोषण मिळत नाही. याबद्दल नवी मुंबईतील मेडिकवर हॉस्पिटलच्या पोषण आणि आहारशास्त्र विभागाच्या प्रमुख राजेश्वरी पांडा यांनी केलेले मार्गदर्शन…

धोके काय आहेत…

किशोरावस्थेत शरीराची वाढ आणि विकास होत असतो. यासाठी लागणारे सर्वच घटक आहारातून मिळतात. क्रॅश डाएटमुळे शरीराच्या विकासात्मक गरजा पूर्ण करणे कठीण होते.

क्रॅश डाएटमुळे आरोग्यावर काही गंभीर परिणाम होतात. या नकारात्मक दुष्परिणामांपासून दूर राहण्यासाठी क्रॅश डाएटपासून दूर राहणे, हेच चांगले ठरेल.

संयमाने खा

आपल्या खाण्यावर नियंत्रण असणे. संतुलित आहार घेणे गरजेचे आहे. केवळ प्रथिनांचा समावेश असलेला आहार आणि फळांचा समावेश असलेला हे सर्व काही चुकीचे मार्ग आहेत. शरीराला सर्वच प्रकारच्या आहाराची गरज असते मग ते गोड, आंबट किंवा कडू असो, परंतु केवळ थोडय़ा प्रमाणात. सर्व काही खा, परंतु त्यावरही संयम असणे गरजेचे आहे

वाढ खुंटते

मुलांच्या शारीरिक वाढीत अडथळे येतात, स्नायू आणि हाडांचे निर्जलीकरण, बद्धकोष्ठता, कमकुवत रोगप्रतिकार, ऊर्जेचा अभाव यामुळे दैनंदिन जीवनात अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

कुपोषण

जेव्हा तुम्हाला आहारात पुरेशी जीवनसत्त्वे आणि खनिजे मिळत नाहीत तेव्हा कुपोषण होते. शरीर अशक्त होते आणि कमकुवत ठरते.

मूड बदलतो

तुम्ही जे खाता ते मानसिकतेवर परिणाम करू शकते. पुरेसा आहार न घेतल्याने नैराश्य, चिंता आणि चिडचिड होते.
क्रॅश डाएटवर लक्ष केंद्रित केल्याने मित्र आणि कुटुंबासोबत वेळ घालवणे, एकत्र जेवायला बसणे या गोष्टींपासून मुकावे लागते. थकवा जाणवू शकतो किंवा एकाग्रतेसंबंधी समस्या निर्माण होते.

हळूहळू वजन कमी करा

झटपट वजन कमी करण्याचा प्रयत्न करू नका. या गोष्टी करणे शरीरासाठी आरोग्यदायी नाही. जेव्हा तुम्ही वजन झपाटय़ाने कमी करता तेव्हा तुम्ही भविष्यात पुन्हा तेच वजन गाठण्याची शक्यता असते. सुरक्षित आणि यशस्वी वजन कमी करण्यासाठी, दर आठवडय़ाला सुमारे 1 ते 2 पौंड कमी करण्याचे लक्ष्य ठेवा.

हार्मोनल बदल

खूप लवकर वजन कमी केल्याने यौवनात विलंब होऊ शकतो किंवा मासिक पाळी सुरू झाली तरी ती थांबू शकते. यामुळे तुमच्या संप्रेरकांच्या कार्यपद्धतीवर परिणाम होऊ शकतो आणि नंतरच्या आयुष्यात गर्भधारणा होणे कठीण होऊ शकते.