आपला माणूस : निरलस कार्यकर्ता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> दिलीप जोशी

कुणाच्या आयुष्याचा ‘पोत’ कसा असेल सांगता येत नाही, पण त्यातले सगळेच धागे दैवाधीन नसतात. आपल्या कार्यकर्तृत्वाचे धागे त्यात गुंफून आपल्याला हवं तसं जीवनवस्त्र विणणारे ध्येयासक्तही असतात. दिलीप हेर्लेकर यांच्यासारखा निरलस कार्यकर्ता त्यापैकीच एक.

मुंबईमध्ये पार्ल्यात बालपण आणि शिक्षण. पुढे ‘व्हीजेटीआय’ या मुंबईच्याच प्रसिद्ध संस्थेतून वस्त्र्ानिर्मिती तंत्रज्ञानातली पदवी (टेक्टाइल इंजिनीयर). त्यानंतर ‘फिन्ले’ या त्यावेळच्या प्रसिद्ध वस्त्र्ााsद्योगात नोकरी. एका सुविद्य मध्यमवर्गीय घरातली सुखाची संकल्पना पूर्ण करणारं सर्व काही दिलीप हेर्लेकर यांच्याकडे हात जोडून उभं होतं, परंतु एका अकल्पित घटनेने हेर्लेकरांचा जीवनपटच बदलला. बाबा आमटे यांच्या ‘आनंदवना’तील एका मित्र मेळाव्याला गेलेल्या हेर्लेकरांना तिथल्या वातावरणाने प्रभावित केले. त्याचवेळी (1983) आनंदवनातील कापड, वैद्यकीय बॅन्डेज याची मागणी वाढत होती. तिथे पावरलुम्स (यंत्रमाग) बसवण्याचं काम लाल फितीच्या कारभारात पुढे सरकत नव्हतं. हेर्लेकरांना हे समजलं आणि मुंबईला परतल्यावर त्यांनी फिन्ले मिलमधले वरिष्ठ अधिकारी तोंडापूरकर यांच्या सहकार्याने आनंदवनाला ‘पावरलूम’ बसविण्याचा ‘टेक्समार्क’ परवाना अवघ्या तीन आठवडय़ांत मिळवून दिला. आता त्यांचे आनंदवनाशी मैत्रीचे धागे घट्ट होत होते. आनंदवनात पावरलूम बसवण्यासाठी आपल्याच मिलमधले दोन कुशल तंत्रज्ञ घेऊन ते काम त्यांनी स्वतः करायचं ठरवलं. सुदैवाने सामाजिक भान असलेली माणसं त्यांच्या आसपास होती. त्यांचे सुपरिन्टेन्डन्ट टोपीवाला यांनी सर्वांना एकाच वेळी रजा मंजूर केली. ‘तू एक चांगलं काम करतोयस’ अशी त्यांची भावना होती. त्याच सुमारास मुंबईत आलेल्या बाबा आमटे यांनी पावरलूम खरेदीसाठी दिलीप हेर्लेकरांच्या हाती कोरा चेक दिला! या तरुणाच्या सचोटी आणि कार्यकुशलतेवर बाबांचा पूर्ण विश्वास होता. आता हेर्लेकरांची नैतिक जबाबदारीही वाढली होती. आनंदवनातल्या पावरलूम वेगाने कापडनिर्मिती करू लागल्या. तिथल्या कापडाची गरज भागली. पण बाहेरही मागणी वाढत होती. ‘एल ऍण्ड टी’सारख्या कंपन्यांकडे या यंत्रमाग विभागातले कापड जाऊ लागले. या कार्याचा वाढता व्याप लक्षात घेऊन 1985 मध्ये हेर्लेकर यांनी मुंबई सोडून सहकुटुंब आनंदवनात जायचं ठरवलं. पत्नी आणि तीन वर्षांच्या मुलाला घेऊन ते एका निर्धाराने आनंदवनात आले. एक दशकभर तिथे राहिले. मुंबईकर सुखवस्तू माणसाला, आनंदवनातलं जीवन अंगीकारणं सोपं नव्हतं, पण त्यांच्यापुढे, श्रीमंत घर आणि वकिलीचा त्याग करून कुष्ठरुग्णांसाठी वसाहत उभारणाऱया बाबांचा आणि त्या कार्यात स्वतःला विरघळवून घेणाऱया साधनाताईंचा आदर्श होता. हेर्लेकरांच्या पत्नीनेही त्यांना मोलाची साथ दिली. या दहा वर्षांच्या कालखंडातील सात वर्षे त्यांच्या घरी टीव्हीसुद्धा नव्हता, परंतु जे काम हाती घेतलंय त्यातलं यश आणि आमटे कुटुंबीयांशी जुळलेली ऋणानुबंधाची घट्ट वीण आत्मबळ देणारी ठरली.

बाबांची त्यांना आनंदवनातल्या ‘संधी निकेतन’ या विभागाच्या अधीक्षकपदावर नियुक्त केलं. वयाने साधारण बरोबरीच्याच असलेल्या विकास आमटे यांच्याशी त्यांचा चांगलाच स्नेह जमला. विकास आमटे यांनी एका लेखात दिलीप हेर्लेकर यांच्याविषयी गौरवोद्गार काढताना म्हटलंय की, ‘1985 मध्ये बाबांनी संधी निकेतनच्या अधीक्षकपदाची धुरा दिलीपकडे सोपवली. त्यामुळे पावरलूम्ससोबत सगळय़ा उद्योगधंद्याची जबाबदारी दिलीपकडे आली. तंगडतोड करत, उद्योगांसाठी लागणाऱया कच्च्या मालाची खरेदी करण्यापासून ते ऑफिसमध्ये बसून रात्री जागरण करत हिशेब तपासण्यापर्यंत प्रत्येक कामात दिलीपचा सक्रिय सहभाग असे. बाबा आणि इंदूचं (साधनाताई& आमटे) प्रेम सगळय़ानाच मिळालं, पण दोघांचाही समान विश्वास कमावलेलं माणूस दिलीपशिवाय दुसरं कुणीच नाही. मूल्य, सचोटी, ध्येयनिष्ठा हे शब्द दिलीपपुढे खुजे ठरतात.’ दिलीपच्या कार्याशी परिचित असलेल्या कुणाचंही याबद्दल दुमत नसेल.

1995 मध्ये ‘आनंदवना’तून मुंबईत परतल्यावर हेर्लेकर ‘मराठी विज्ञान परिषदे’च्या कार्यात सहभागी झाले ते आजतागायत. तिथे त्यांनी गच्चीवरच्या शहरी शेतीचे प्रयोग केले. त्यावर पुस्तक लिहिलं. बाल्कनीतही आपल्यापुरती ‘शेती’ करता येते हे त्यांनी सप्रयोग सिद्ध करून दाखवलं. त्याविषयी मार्गदर्शन करणारे त्यांचे वर्ग आजही चालतात. सध्या विज्ञान परिषदेचे कार्यवाह म्हणून ते काम पाहतात आणि आनंदवनच्या ‘ट्रस्ट’वरही आहेत.

दोन वर्षांपूर्वी ‘पार्ले टिळक विद्यालय’ या शाळेतल्या हेर्लेकरांच्या एसएससी बॅचचा मेळावा आयोजित करण्यात त्यांनी पुढाकार घेतला. तब्बल पन्नास वर्षांनी मित्र-मैत्रिणींचा गोतावळा जमला. जुन्या आठवणी ताज्या झाल्या. असा हा माणसात रमणारा माणूस, परंतु केवळ गप्पागोष्टींसाठी नव्हे तर कृतिशील रचनात्मक कार्य करण्यावर विश्वास असलेला हाडाचा कार्यकर्ता! निरपेक्ष कार्यप्रवणतेचा वसा त्यांच्याकडून कुणीही घ्यावा.

– [email protected]