>> दिलीप जोशी
‘रानारानात गेली बाई शीळ’ हे मराठीतलं 1930 च्या दशकात ध्वनिमुद्रित झालेलं कविवर्य ना. घ. देशपांडे यांचं मराठीतलं पहिलंवहिलं ‘ध्वनिमुद्रित’ झालेलं भावगीत. ना. घ. देशपांडे यांच्या अवचित घडलेल्या भेटीचं हे चित्रण.
काही योगायोग मोठे विलक्षण असतात. 1993 मध्ये आम्ही खगोल मंडळी जगप्रसिद्ध लोणार विवर सरोवर पाहायला आणि त्याचा अभ्यास करायला गेलो होतो. खगोलीय दृष्टीने महत्त्वाच्या या विवराची माहिती घेऊन त्याची व्हिडीओ फिल्म बनवण्याचं ठरलं होतं. रवींद्र कदम त्यावेळच्या ‘व्हीएचएस’ कॅमेऱयासह सज्ज होता. दिवसभर सारं चित्रण झालं. मग तिथलं छोटं विवर पाहून संध्याकाळी जीपने परतताना छान काहीतरी चित्रित झालंय याचा आनंद आमच्या टीमला झाला होता. त्यातच गाण्याच्या भेंडय़ा सुरू झाल्या आणि मी ‘र’ अक्षरावरून ‘रानारानात गेली बाई शीळ’ गीताच्या चार ओळी म्हणताना ‘‘हे मराठीतलं 1930 च्या दशकात ध्वनिमुद्रित झालेलं कविवर्य ना. घ. देशपांडे यांचं मराठीतलं पहिलंवहिलं ‘ध्वनिमुद्रित’ झालेलं भावगीत आहे’’ असं म्हटलं. मला त्या गीताचे गायक जी. एन. जोशी यांच्याकडून पूर्वी ते कळलं होतं. हे ऐकताच लोणारचे बुगदाणे गुरुजी चटकन् म्हणाले, ‘‘अहो ना. घ. इथेच राहतात, मेहकरला.’’
आम्ही जीप फिरवली आणि थेट नाघंच्या दारात जाऊन उभे राहिलो. संध्याकाळची वेळ. त्यात आम्ही अनाहूत पाहुणे- बुगदाणेंना म्हटलं ‘‘कवी भेटतील का विचारा. आम्ही जीपमध्ये थांबतो…’’ आणि पाच मिनिटांत चौऱयाऐंशी वर्षांचे ना.घ. बाहेर येत खास वैदर्भी आदरातिथ्याने बोलले, ‘‘अरे तेथे का थांबला… या ना आत या…’’ अवचित घडलेल्या या भेटीचे साक्षीदार माझे काही मित्रही आहेत. आमच्याकडे एक कॅसेट शिल्लक होती. तिथेच नाघंची मुलाखत चित्रित करायचं ठरवलं. ‘क्रिप्ट’, पूर्वतयारी वगैरे काहीच नाही. ‘‘बघू या, गप्पातून काय जमतंय ते’’ असा विचार… आणि एक अप्रतिम मुलाखत चित्रित झाली.
आज हे सगळं आठवण्याचं कारण म्हणजे मध्यंतरी प्रसिद्ध कवी आणि ज्येष्ठ मित्र अशोक नायगावकर यांचा फोन आला. त्यांनी ‘यूटय़ूब’वर ‘अनुदिनी’मध्ये माझ्या नावे असलेली ती मुलाखत पाहिली. ‘‘अरे तूच आहेस ना तो…’’ असं नायगावकर विचारत होते. साहजिकच आहे. तेव्हा चाळिशीत असलेल्या माझ्या माथ्यावर दाट केस होते आणि आता सत्तरीत ते शोधावे लागतील इतका बदल झालाय. मला हसू आलं. म्हटलं, ‘‘तो मीच आहे!’’… ही चित्रफीत मी नाघंच्या नातसुनेला दिल्याचं आठवलं. मूळ चित्रीकरण पाऊण तासापेक्षा अधिक आहे.
त्यामध्ये नाघंनी ‘रानारानात गेली बाई शीळ’ या कवितेच्या तसंच ‘कंपनी’ या त्यांच्या दीर्घ कवितेच्या काही ओळी म्हणून दाखवल्या आहेत. नाघंचे सुपुत्र शिवरामभाऊ यांनी सुरेल स्वरात आम्हाला नाघंची गाणी पेटीच्या साथीने गाऊनही दाखवली. नाघंच्या कन्येनेसुद्धा एक गाणं म्हटलं. आपली गीतं ऐकताना ना.घ. आनंदाने ताल धरत होते आणि सारं चित्रबद्ध होत होतं. ध्वनिचित्रमुद्रणासाठी मी ठरवून अनेकांच्या मुलाखती घेतल्या. त्यात काही ऑडिओ आणि काही व्हिडीओ आहेत, पण ना. घ. देशपांडे कवी सुधांशू, गायक-नायक मास्टर अविनाश यांचं चित्रीकरण दुर्मिळ आहे असं वाटतं. नाघंची मुलाखत दूरदर्शनसाठी घेतली गेली होती असं मला नंतर समजलं. कदाचित ‘सह्याद्रीच्या पाऊलखुणा’अंतर्गत ती जपलेली असेल.
नाघंच्या ‘शीळ’ कवितेने त्या काळातल्या तरुणांना भारून टाकलं. त्यानंतर त्यांची ‘नदीकिनारी नदीकिनारी,’ ‘मन पिसाट माझे अडले रे’, ‘घर दिव्यात मंद तरी,’ ‘अंतरीच्या गूढ गर्भी, एकदा जे वाटले’ अशी कितीतरी गाणी दिग्गज गायक-गायिकांनी गायली. नाघंनी मुलाखतीत आपलं मनोगत व्यक्त करताना ‘‘कविता सुचते खरी, कशी सुचते ठाऊक नाही’’ असं म्हटलं होतं, पण ती गाणी आजही जवळपास 90 वर्षांनंतरही लोकप्रिय आहेत. त्यांचं चित्रीकरण त्यांना द्यायला आम्हाला पाच वर्षे लागली. तोपर्यंत ना. घ. 89 वर्षांचे झालेले होते. आम्ही पुन्हा एकदा त्यांच्या घरी जाऊन त्यांना पूर्वीचं चित्रीकरण अर्पण केलं. त्याचीही फिल्म घेतली आणि मूळ चित्रफितीला जोडली. आता ते सारं चित्रफितीवर आणि स्मृतिकोषातलं ‘संचित’ आहे.
– [email protected]





























































