…पहिली पायरी!

931

>> दिलीप जोशी

अपयश ही यशाची पहिली पायरी असते अशी सुभाषितवजा वाक्य आपण ऐकत असतो. याचा अर्थ प्रत्येक यशाआधी अपयश यायला हवं किंवा येतं असा मुळीच नाही. अनेकांच्या जीवनात ते जे कार्य हाती घेतात त्यात त्यांना सतत यशाची चढती कमानच अनुभवायला मिळते, परंतु पुष्कळ जण असेही असतात की, त्यांना पहिल्या पायरीला ठेच लागते. अशा अपयशाने कोणी खचून जाऊ नये म्हणून त्याला ‘यशाची पहिली पायरी’ म्हटलंय.

पठडीतलं किंवा चाकोरीबद्ध जीवन स्वीकारलं तर अपयशाची फारशी धास्ती नसते. आपल्यासारखे बरेच जण त्या वाटेवरून जात असतात. त्यांचा अनुभव आणि मार्गदर्शन मिळतं. म्हणूनच मळलेली वाट तुलनेने सोपी असते. मात्र वेगळं काही ध्येय मनाशी बाळगलं तर आपला मार्ग आपण शोधावा लागतो. या शोधात ‘चकवा’ येऊ शकतो. मग ते सारे प्रयत्न वाया जातात का? अनेकांना तसंच वाटतं. कोणी अभिमानाने म्हणतं ‘जे काम करावं त्यात यश मिळतच गेलं’ तर काहींची व्यथा असते ‘इतके प्रयत्न, परिश्रम केले, पण काहीच साध्य झालं नाही.’

आमचे एक शिक्षक सांगायचे, अपयशात आपण सगळंच गमावतो असं नाही तर कोणत्या प्रकारे प्रयत्न करू नयेत याचं ज्ञान अनुभवाने मिळतं. नेमकी हीच गोष्ट थॉमस अल्वा एडिसनसारखे संशोधक मनात घट्ट ठेवतात. अनेक शोधांची पेटंट मिळवलेल्या आणि विजेच्या बल्बचा शोध लावून जग कायमचं उजळणाऱया एडिसनला तो विजेरी गोलक बनवताना अनेक वेळा अपयश आलं. त्यावेळची भावना व्यक्त करताना नंतर त्यांनी म्हटलं. ‘‘प्रत्येक वेळी मला कळायचं की, कोणत्या मार्गाने जाऊ नये!’’ जिद्द अशी असते तेव्हा यशाचा मार्ग सापडतोच. प्रयत्नांचा वेग मात्र थांबवता कामा नये.

जगातल्या अनेक मोठय़ा माणसांचा शैक्षणिक किंवा इतर कारकीर्दीचा इतिहास जाणून घेतला तर त्यांनाही अनेकदा अपयशाचा सामना करावा लागल्याचं आढळेल, परंतु त्यातून नव्या उमेदीने बाहेर पडून आकाशगामी झेप घेण्याची प्रबळ इच्छा त्यांना यशस्वी आणि लौकिकार्थाने ‘मोठं’ करून गेली.

जीवनातल्या कोणत्याही क्षेत्रात वेगळी वाट स्वीकारणाऱयांना अनेक अपयशांची, अडथळय़ांची शर्यत पार करावी लागते. एकदा का या वाटेवर काटे असणारच असं गृहीत धरलं की, ते टोचण्याची धास्ती वाटत नाही. आपण मनापासून ठरवलेलं ध्येय समाधान देणारं असेल तर यशापयश त्यातले केवळ टप्पे ठरतात. समाधान तर पहिल्या पावलापासूनच मिळत असतं.
यशाची पहिली पायरी कठीण असली आणि तिथे अडखळायला झालं तरी त्यातून जिद्द वाढवायची की निराश व्हायचं हे ज्याच्या त्याच्या स्वभावावर (माइण्ड सेट) अवलंबून असतं. जगातल्या अनेक लोकांनी अपयश हे आव्हान म्हणून स्वीकारलं तेव्हा त्यांची जिंकण्याची उमेद द्विगुणित झाली. अशी विजिगिषू वृत्ती अपयश निर्माण करू शकते?

एका नव्या अभ्यासानुसार अपयशाची कडू चव चाखलेल्या अनेकांनी त्यावर मात करण्याचा चंग बांधला आणि त्यात ते यशस्वी झाले. आयुष्यात पंधरा टक्के अपयश आलं तर पंच्याएWशी टक्के यश मिळालं असं होतं. म्हणजे यशाचं माप काही कमी नाही. असा अभ्यास करणाऱयांच्या मते सतत शंभर टक्के यश मिळत राहिलं तर आनंद नक्कीच होईल, पण मग ‘नवीन’ काही शिकण्यासारखं किंवा वेगळा विचार करून, प्रश्न सोडवण्याची जिद्दच निर्माण होणार नाही. एखाद्या अपयशाचा धक्का पुढे अनेक धक्के पचवायला सक्षम करतो आणि वेगवेगळी आव्हानं घ्यायला प्रवृत्त करतो.

आपण अपयशावर मात कशी केली याची उजळणी मनाशी केली तरी जिद्द वाढते आणि इतरांना ते सांगितलं तर स्फूर्तिदायक ठरू शकतं. निराश मनांना दिलासा देऊ शकतं. अनुभवासारखा शिक्षक नाही असं म्हणतात. आयुष्यात सकारात्मक आणि नकारात्मक असे अनुभव येतच राहणार. त्यातून ‘शिकण्याचं’ सूत्र मात्र हरवता कामा नये.
अपयश आल्यावर त्याच्याशी दोन हात करण्याची ईर्षा मनात जगली पाहिजे. कारण हा लढा मनातल्या मनात, स्वतःचाच स्वतःशी असतो. त्याचं आकलन झालं की, कदाचित वाटय़ाला येणाऱया या ‘पहिल्या’ खडतर ‘पायरी’ची तमा बाळगण्याचं कारण नाही, पण जे साध्य करायचं ते ध्येय मात्र उत्तम आणि उदात्त असायला हवं. तरच अपयशही आत्मबळ देईल.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या