
>> दिलीप ठाकूर
मराठी मनोरंजन क्षेत्रातील एक यशस्वी कलाकार दांपत्य प्रकाश भेंडे व उमा भेंडे. दुर्दैवाने उमा भेंडे यांच्या निधनानंतर प्रकाश भेंडे यांनी आपल्या चित्रकलेच्या आवडीत मन रमवले. 19 जुलै 2017 रोजी उमा भेंडे यांचे निधन झाले. प्रकाश भेंडे अलीकडे काही दिवस आजारीच होते आणि 28 एप्रिलच्या रात्री उशिरा त्यांचे निधन झाले. कला क्षेत्रावर भरभरून प्रेम करणारा एक मनस्वी कलाकार आपल्यातून निघून गेला.
प्रकाश भेंडे यांचा जन्म रायगड जिह्यातील मुरुड-जंजिरा येथील. वडील डॉक्टर होते. प्रकाश भेंडे यांचे बालपण गिरगावातील. कालांतराने ते सायन येथे राहायला गेले आणि अखेरपर्यंत ते तेथेच राहायला होते.
ते मूळचे टेक्स्टाईल डिझायनर होते. चित्रपटसृष्टीत त्यांनी कलाकार म्हणून पाऊल टाकले. सुरुवातीच्या काळात त्यांनी गुरुबाळ दिग्दर्शित ‘नाते जडले दोन जिवांचे’ (1971), कमलाकर तोरणे दिग्दर्शित ‘अनोळखी’ ( 1973) अशा चित्रपटांतून लहानमोठय़ा भूमिका साकारल्या. अभिनेत्री उमा यांच्याशी विवाहबद्ध झाल्यावर त्यांनी श्रीप्रसाद चित्र ही चित्रपट निर्मिती संस्था स्थापन केली. पहिलाच चित्रपट ‘भालू’ (1980) या चित्रपटाचे दिग्दर्शक राजदत्त होते आणि या चित्रपटात प्रकाश भेंडे, उमा यांच्यासह रंजना, विक्रम गोखले, चंद्रकांत, शाहू मोडक, विवेक, निळू फुले तसेच नाना पाटेकर यांची भूमिका होती. नाना पाटेकर यांचा हा अगदी सुरुवातीचा चित्रपट. त्यानंतर ‘चटक चांदणी’ ( 1982) या चित्रपटापासून त्यांनी चित्रपट दिग्दर्शनात पाऊल टाकले. या चित्रपटाची कथा, पटकथा, दिग्दर्शन व प्रमुख भूमिका या जबाबदाऱया प्रकाश भेंडे यांनी उत्तम सांभाळल्या. या चित्रपटात जयश्री टी. नायिका होती, तर उमा भेंडे यांनी या चित्रपटाच्या निर्मितीची जबाबदारी उत्तमरीत्या साकारली. ‘आपण यांना पाहिलंत का?’ ( 1992) या चित्रपटात त्यांनी चार नवीन चेहऱयांना संधी दिली. याची त्या काळात बरीच चर्चा झाली. ते नवीन चेहरे होते ललित, गिरीश, रेशम टिपणीस व हेमांगी खोपकर. या चित्रपटात प्रकाश भेंडे, उमा भेंडे, विक्रम गोखले, उपेंद्र दाते इत्यादींच्याही भूमिका आहेत. त्यानंतर त्यांनी ‘प्रेमासाठी वाट्टेल ते’ चित्रपटाची निर्मिती व दिग्दर्शन केले. त्यांनीच निर्मित व दिग्दर्शित केलेल्या ‘आई थोर तुझे उपकार’ ( 1999) या चित्रपटात उमा भेंडे, अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, मोहन जोशी, विक्रम गोखले, कुलदीप पवार, सतीश पुळेकर, अविनाश खर्शीकर, सुकन्या कुलकर्णी, प्राजक्ता दिघे अशी भलीमोठी स्टारकास्ट होती. सहकुटुंब सहपरिवार पाहिले जातील असे चित्रपट त्यांनी निर्माण केले आणि त्यांच्या चित्रपटाच्या सेटवर कायमच खेळीमेळीचे व कौटुंबिक वातावरण असे.
एकीकडे मराठी चित्रपटसृष्टीतील आपली वाटचाल करीत असतानाच त्यांनी आपली चित्रकलेची आवडही जपली. फेस्पोक या चित्रशैलीसाठी ते प्रसिद्ध होते. दक्षिण मुंबईतील मान्यवर अशा कलादालनात त्यांच्या चित्रकलेची प्रदर्शने आयोजित केली जात आणि रसिकांचा त्यांना उत्तम प्रतिसाद मिळत असे. दादरसारख्या मध्यवर्ती भागात त्यांनी फार पूर्वीच श्रीप्रसाद चित्र या निर्मिती संस्थेचे कार्यालय स्थापन केले. हीदेखील एक वैशिष्टय़पूर्ण गोष्ट ठरली. या कार्यालयाबाहेरच्या शोकेसमध्ये त्यांच्या दिग्दर्शनातील चित्रपटांची लॉबी कार्डस् पाहायला मिळत. ती पाहण्यासाठी वारंवार येणाऱया रेशमला त्यांनी चित्रपटसृष्टीत येण्याचे सुचवले. चित्रपट माध्यम व व्यवसाय यावर मनोमन प्रेम करणारे असे प्रकाश भेंडे हे व्यक्तिमत्त्व होते. गप्पांत रमणारे आणि माणसे जोडणारे हीदेखील त्यांची वैशिष्टय़े होती.