
>> दिलीप जोशी , [email protected]
आज महाराष्ट्र राज्य स्थापनेला 65 वर्षे पूर्ण होत आहेत. मराठी जनतेच्या एका अपूर्व लढय़ाची आणि विजयाची ही गाथा 107 हुतात्म्यांच्या बलिदानातून साकारली आहे. शेकडो सत्याग्रहींच्या त्यागातून सिद्ध झाली आहे हे विसरता येणार नाही आणि सीमाप्रश्नाच्या लढय़ातही महाराष्ट्र असाच यशस्वी होवो अशीच इच्छा मराठी मनात आजही आहे.
मराठी माणसाचाच महाराष्ट्र याला शेकडो वर्षांच्या इतिहासाची साक्ष असून ‘जेथे मराठी भाषा वर्तते ते महाराष्ट्र’ हा अगदी महानुभावांच्या ‘श्रुती पाठ’मधील उल्लेख महाराष्ट्राचे महत्त्व अधोरेखित करतो. सातवाहन, शिलाहारांपासून राष्ट्रकुट आणि देवगिरीचे यादव अशा अनेक घराण्यांनी मराठी मुलखावर राज्य केले. मुंबईतही यादव घराण्यातील बिंब राजाची सत्ता पंधराव्या शतकात होती. प्रभादेवीचे देऊळही 1715 पासून आहे. वालुकेश्वराचे मंदिर तर शिलाहारांच्या काळातले! आधुनिक मुंबईच्या जडणघडणीतसुद्धा पहिले ‘मर्चंट प्रिन्स’ म्हणून ओळखले गेलेले रामा कामती, जगन्नाथ शंकरशेट, लक्ष्मण (भाऊ) अजिंक्य, डॉ. भाऊ दाजी लाड अशी एकोणीसाव्या शतकातही मुंबईच्या उभारणीतील काही महत्त्वाची मराठी नावे. तरीहीसुद्धा मुंबई महाराष्ट्राला देताना खळखळ झालीच. कधी मुंबईचे वेगळे राज्य, तर कधी महाराष्ट्र-गुजरात यांचे द्वैभाषिक असे राजकीय डाव दिल्लीच्या नेहरू सरकारने टाकले. परंतु अखेरीस मराठी निश्चयापुढे त्यांना मान तुकवावीच लागली. 1 मे 1960 रोजी मुंबईसह महाराष्ट्र राज्याची घोषणा पंतप्रधान नेहरूंना करावी लागली.
याच छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात (तेव्हा शिवाजी पार्क म्हणत) किंवा शिवतीर्थावर 1958 मध्ये महर्षी कर्वे यांच्या शतायुषी जीवनाचा सन्मान करण्यासाठी नेहरू आले असताना महर्षी एकच वाक्य बोलले, ‘‘जीवनातील माझ्या सर्व आकांक्षा पूर्ण झाल्या आहेत. आता नजीकच्या भविष्यकाळात महाराष्ट्र व गुजरात ही दोन (वेगळी) राज्ये अस्तित्वात आलेली ‘याची देही याची डोळा’ दिसली म्हणजे माझी कोणतीच इच्छा उरणार नाही.’’ यावर नेहरू काहीच बोलू शकले नाहीत.
वास्तविक स्वतंत्र हिंदुस्थानात भाषावार प्रांतरचना असावी हा विचार 1914 मध्ये डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर (कोषकार) आणि डॉ. पट्टाभी सीतारामय्या यांनी ‘भाषिक-प्रांत सभा’ स्थापन करून मांडला आणि तसा प्रचार सुरू केला होता. त्याला काँग्रेसचा पाठिंबा मिळावा म्हणून 1917 मध्ये कोलकाता येथे भरलेल्या खास अधिवेशनात त्यांनी तसा ठरावही आणला. परंतु या तरुणांच्या न्याय्य म्हणण्याला पं. मालवीय, डॉ. अॅनी बेझन्ट, सर सैय्यद आणि महात्मा गांधीनींही विरोध केला. तेव्हा ‘लोकमान्य टिळकांना येऊ द्या’ असा विचार केतकर आणि सीतारामय्या यांनी व्यक्त केला. लोकमान्य आल्यावर त्यांनी ही गोष्ट समजून घेतली आणि भाषिक राज्यांच्या बाजूने असा काही तर्कशुद्ध, आवेशयुक्त युक्तिवाद केला की, बाकीचे सर्व नेते गप्प झाले. म्हणजे भाषावार राज्यांची योजना काँग्रेस तेव्हापासूनच जाणून होती.
स्वातंत्र्य मिळाल्यावरही काही राज्यांची भाषिक तत्त्वावर निर्मिती झालीच. पोट्टी श्रीरामुलु यांनी 58 दिवसांचे उपोषण करून प्राणार्पण केल्यावर आंध्र राज्य अस्तित्वात आले. 1956 मध्ये कर्नाटक राज्य निर्माण झाले. केवळ महाराष्ट्राच्याच बाबतीत ‘गुजरातसह द्वैभाषिक’ किंवा मुंबई महाराष्ट्र आणि गुजरात अशी तीन वेगळी राज्ये असा कुटिल डाव सुरू झाला. मराठी माणूस हा अन्याय सहन करणं शक्यच नव्हतं. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची चळवळ जोर धरू लागली. त्याची मागणी 1936 च्या साहित्य संमेलनातही झाली होती. अभिजन-बहुजन सारे एकवटले. तत्कालीन मराठी प्रदेशातले सर्वपक्षीय नेते, कलाकार-पत्रकार, लेखक-कवी, शिक्षणतज्ञ, शेतकरी-कामगार आणि संतांसह सारे सारे एकमुखाने संयुक्त महाराष्ट्राला पाठिंबा देण्यास सरसावले. शाहीर आत्माराम पाटील, शाहीर अमरशेख महाराष्ट्राच्या कवनांनी जनजागृती करू लागले.
या चळवळीतला एक प्रसंग मराठी माणसाची शक्ती दाखवणारा आहे. महाराष्ट्र हे राजधानी मुंबईसह भाषिक राज्य व्हावे या मागणीसाठी संयुक्त महाराष्ट्र समितीने थेट दिल्लीला धडक दिली. कारण नेहरूंच्या कानी मागणी पोहोचवायची होती.
जुलै 1956 मध्ये संसदेचे अधिवेशन सुरू असताना द्वैभाषिकाचा ‘डाव’ टाकला गेला होता तो नंतर लोकमताच्या रेटय़ाने उधळला. आता दिल्लीतच ताकद दाखवायला हवी याची खात्री पटताच सत्याग्रही दिल्लीला निघाले. वेगवेगळ्या ट्रेनमधून राजधानीत दाखल होऊ लागले. सत्याग्रही स्वतःचा खर्च स्वतः करणार होते. दिल्लीत कोणत्या सरकारी रोषाला सामोरे जावे लागेल याची कल्पना नव्हती. मात्र संसदेपुढे धरणे धरणारच असा निर्धार होता. हजारो पुरुष-महिला सत्याग्रही दिल्लीत दाखल झाले आणि त्यांच्या घोषणांनी कनॉट प्लेसचा भाग दुमदुमला! जुनी दिल्ली ते नवी दिल्ली मार्गावर संध्याकाळी भव्य मिरवणुकीने सत्याग्रही संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणा देत शिस्तीने चाललेले पाहून दिल्लीकरांना प्रचंड आश्चर्य वाटलं. भगवे फेटे बांधलेले बेळगावचे तरुण आघाडीवर होते. साधारण एक किलोमीटर लांबीचा मोर्चा घोषणा देत निघाला. तो दिल्ली पोलिसांनी अडवताच लोक तिथेच ठाण मांडून बसले आणि दिल्लीकरांना समजेल अशा शब्दांत शाहीर अमरशेख खडय़ा आवाजात गाऊ लागले.
‘जागा मराठा आज, जमाना बदलेगा’
हे स्वर थेट संसदेपर्यंत पोहोचले. अधिकारी मंडळी तत्कालीन संसद भवनाच्या गोल गॅलरीतून विस्मयाने या अभूतपूर्व मोर्चाकडे पाहत राहिली! अमरशेख ठणकावून गात होते. त्या हिंदी शाहिरीने अनेक खासदारच काय, पण दिल्लीकर जनता आणि तिथले पोलीसही भारावून गेले! या सत्याग्रहींमध्ये तरुण मंडळी होतीच, पण साठ ते ऐंशी वयाचे स्त्र्ााr-पुरुष सत्याग्रहीसुद्धा होते हे विशेष. लालजी पेंडसे लिहितात, ‘कित्येक मातांच्या कडेवर तान्ही मुलंही होती. सत्याग्रही स्त्र्ााr-पुरुषांचे हे सभ्य, सोज्वळ आणि धीरोदात्त रूप पाहून ही चळवळ म्हणजे मूठभर चळवळ्यांनी उठवलेली धांदल नसून जनतेच्या सर्व थरांतून (घटकांमधून) उभी राहिलेली आहे आणि तीन कोटी (मराठी) जनतेच्या जिवंत भावना प्रतीत करणारे ते सर्वव्यापी आंदोलन आहे, अशी सर्वांची खात्री पटली. खरोखरच मराठय़ांनी आपल्या शिस्तशीर, धीरगंभीर आणि सभ्य वर्तनाने दिल्ली जिंकली! महाराष्ट्राकडे पाहण्याचा (देशवासीयांचा) दृष्टिकोन या मोर्चाने बदलून टाकला. शेवटी नेहरूंना मराठी जनतेची मागणी मान्य करावी लागली. खुद्द त्यांची कन्या इंदिरासुद्धा मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या बाजूची होती. नंतर पंतप्रधान झालेल्या इंदिराजी 1 मे 1960 रोजी नेहरूंबरोबर मुंबईत आल्या होत्या. त्यांनी नवनिर्मित महाराष्ट्राला शुभेच्छा देताना म्हटलं, ‘‘ज्याच्या नावातच ‘महा’ आहे ते राज्य सर्वार्थाने ‘महा’राष्ट्र होवो!’’
त्याचदिवशी दुपारी यशवंतराव चव्हाण यांच्या मंत्रीमंडळाचा शपथविधी झाला. आज त्या मंगल घटनेला 65 वर्षे पूर्ण होतायत. मराठी जनतेच्या एका अपूर्व लढय़ाची आणि विजयाची ही गाथा 107 हुतात्म्यांच्या बलिदानातून साकारली आहे. शेकडो सत्याग्रहींच्या त्यागातून सिद्ध झाली आहे हे विसरता येणार नाही.