
>> दिव्या नेरुरकर-सौदागर
आपल्या लहानपणापासून ‘गट किंवा समूहात राहताना पाळायचे नियम’ आपल्या डोक्यात भरवले जातात. ज्याला आपण ‘Group Norms’ असेही म्हणतो. ते जर का पाळले गेले नाहीत तर त्या व्यक्तीला आऊटसायडर ठरवले जाते. तसंच काही वेळा तिची गणना ही ऍबनॉर्मल असण्यात केली जाते. हे सर्व खूपच वेदनादायक असतं आणि खरोखर जी व्यक्ती या सर्वांतून जात असेल तर तिला स्वतःशी (‘मी करतोय ते चूक की बरोबर’) तसंच इतरांशीही (‘मी पण तुमच्यासारखी आहे’) आपली बाजू मांडण्यासाठी लढावं लागतं.
‘‘शाळा! बाकीच्यांचा जिव्हाळ्याचा विषय असेल; पण माझा … अजिबातच नाही. मी माझ्या शाळेच्या कुठल्याही आठवणीत रमलेले नाही आणि रमणं शक्यही नाही. शाळा हे मला पडलेलं दुःखद स्वप्न आहे म्हणा ना…’’ सई (नाव बदलले आहे) आपलं म्हणणं काहीशा गंभीरपणे तसेच अगदी ठासून सांगत होती. ‘‘मी शाळेला कसं तोंड दिलंय हे माझं मला माहीत आहे. शाळेत मला फक्त मनस्ताप झाला आणि म्हणूनच कदाचित मला तुमच्याकडे येण्याची गरज भासली असेल’’… सईने एवढं बोलून तिच्या समुपदेशनाचा हेतू सांगूनही टाकला.
सई ही कॉलेजवयीन युवती होती, जी महत्त्वाकांक्षी होतीच, शिवाय स्वतःची मतं आग्रहपूर्वक मांडणारीही होती. घरी लाडाकोडात वाढल्याने हट्टीही वाटत होती. त्यामुळे ‘‘मी म्हणते ते खरं आहे आणि मी मला पटेल तेच करणार’’ असा काहीसा तिचा स्वभाव लहानपणापासूनच बनला असावा असं जाणवत होतं.
तिच्या म्हणण्याप्रमाणे तिच्या शाळेत विलक्षण कडक शिस्त होती. वागण्या-बोलण्याचे नियम भलतेच कडक होते. शाळेमध्ये प्रत्येक इयत्तेतील अभ्यासात कमी आणि मस्तीखोर विद्यार्थ्यांसाठी एक-एक वेगळा वर्ग बनवला गेला होता. त्या वर्गाला ‘स्पेशल वर्ग’ असे नाव होते. एखादा विद्यार्थी जर मस्ती करत असेल किंवा अभ्यासात मागे असेल तर त्या विद्यार्थ्याची रवानगी त्या वर्गात होई. या ‘स्पेशल वर्गा’तील मुलांना वेगळ्या पद्धतीने शिकवले जाई आणि हाताळले जाई. बाकीच्या मुलांसाठी आणि शिक्षकांसाठीही हा वर्ग म्हणजे ‘ढ’ आणि वाया गेलेल्या मुलांचा वर्ग होता.
‘इतकं विचित्र वाटलं मला मॅडम, काय सांगू? मी माझ्या शिक्षकांना सांगत होते, मी ‘ढ’ नाहीये’’ सई तिच्या मनातली सल बोलून दाखवत होती. शाळेत सहावीपासून तिच्यावर बसलेला ‘त्या वर्गातली विद्यार्थिनी’ हा शिक्का तिच्या व्यक्तिमत्त्वावर खोल परिणाम करून गेला. ती माणसांना तेव्हापासून टाळायला लागली. तिचा मित्रपरिवारही कमी होत गेला. जसजशी ती मोठी होत गेली तसतशी ती अधिकाधिक एकटी राहायला लागली. नातेवाईक तसंच घरच्यांनाही टाळायला लागली. स्वतःला हुशार आणि कर्तृत्ववान सिद्ध करण्यासाठी अभ्यासात स्वतःला तासन्तास गुंतवायला लागली आणि इथेच गोष्टी बिनसायला सुरुवात झाली.
सईचं एकटं राहणं, स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द, त्यासाठी तासन्तास न खातापिता अभ्यासात स्वतःला बुडवून घेणं (सलग 6 तास) या सर्वांमुळे तिच्यावर ‘ऍबनॉर्मल’ असण्याचा शिक्का हळूहळू तिच्या घरच्यांकडून आणि नातेवाईकांकडून लावला गेला. तिचं कुठलंही वर्तन हे इतरांसाठी नॉर्मल नव्हतं. या सर्वांमुळे सई मनातून कमालीची दुखावली गेली आणि अधिकाधिक कठोर बनली. दहावीत चांगले मार्क येऊनसुद्धा तिच्याकडे अविश्वासाने बघितलं गेलं. तिला नैराश्य यायला लागले. त्यामुळे तिच्या मानसोपचारांमध्ये औषधोपचार आणि समुपदेशन हे दोन्ही सुरू करावे लागले.
वास्तविक पाहता सईचं वागणं आणि तिचे विचार हे जरी वेगळे असले तरी ते इतरांसाठी त्रासदायक मुळीच नव्हते. तिचं स्वतःमध्ये राहणं हे तिच्यासाठी आनंददायी होतं, पण तिच्या माणसांच्या गोतावळ्यात राहणाऱया कुटुंबाला हे पचनी पडत नव्हतं. तिचे विचार हे पुढारलेले होते. तिला लग्न उशिरा करायचं होतं; पण तिच्या काही कर्मठ नातेवाईकांना हे ऍबनॉर्मल वाटलं होतं. सईला तिचा कोणी खास मित्र नव्हता. पण तिला बॉयफ्रेन्ड नसणं हे तिच्या भावंडं आणि तिच्या मित्रमैत्रिणींसाठी नक्कीच ऍबनॉर्मल होतं.
सई भरपूर लढत होती…स्वतःला सिद्ध करण्यासाठी, पण तिचा हा लढा तोकडा पडत चालला होता. लहानपणापासून बसलेला ऍबनॉर्मलपणाचा शिक्का तिला पुसून काढायचा होता, पण कसा ते काही तिला समजत नव्हतं. ती असहाय्य झाली होती आणि तिची असहाय्यता तिच्यामधल्या रागाला जास्तीत जास्त उत्तेजन देत होती. त्याचे पर्यवसान शेवटी तिच्या एकलकोंडय़ा स्वभावात झाले.
सईसारख्या अनेक व्यक्ती आज आपल्यात आहेत, ज्यांचे वर्तन आणि विचार चारचौघांपेक्षा निराळे असतील आणि मुख्य म्हणजे त्यांचा कोणालाही त्रास होतही नसेल. जसं की, कोणाला साधं राहायला आवडत असेल, तर कोणाला मॉलमध्ये जायला आवडत नसेल. कोणाला स्मार्टफोनच आवडत नसेल. मात्र आजूबाजूला त्यांच्या आवडी-निवडीच्या विरुद्ध आवड असलेल्या व्यक्ती असतील तर मग या लोकांची चांगलीच पंचाईत होत असेल. सईचंही तसंच होत असल्याने ती स्वतःची बाजू मांडून मांडून थकली होती. कारण ती सांगत असलेली कारणं तिचे आई-वडील आणि तिची भावंडं ‘‘तू बहाणे बनवतेस’’ असं बोलून उडवून लावत होती. शेवटी तिने खोटं बोलायला सुरुवात केल्यावर तिच्या घरचे तिच्यापासून दुरावले.
आपल्या लहानपणापासून ‘गट किंवा समूहात राहताना पाळायचे नियम’ आपल्या डोक्यात भरवले जातात. ज्याला आपण ‘Group Norms’ असेही म्हणतो. ते जर का पाळले गेले नाहीत तर त्या व्यक्तीला आऊटसायडर ठरवले जाते. तसंच काही वेळा तिची गणना ही ऍबनॉर्मल असण्यात केली जाते. हे सर्व खूपच वेदनादायक असतं आणि खरोखर जी व्यक्ती या सर्वांतून जात असेल तर तिला स्वतःशी (‘मी करतोय ते चूक की बरोबर’) तसंच इतरांशीही (‘मी पण तुमच्यासारखी आहे’) आपली बाजू मांडण्यासाठी लढावं लागतं.
सईचं असंच काहीसं होत असल्याने तिने या मनस्तापात जवळ जवळ दहा वर्षं काढली. तिचे घरच्यांशी खटके उडत होते. नातेवाईक दुरावले होते. त्यामुळे समुपदेशन करताना तिच्यासह तिच्या घरचे, म्हणजे आईवडील आणि भाऊ यांना तिच्या मनस्तापाची आणि तिला होणाऱया त्रासाची कल्पना देण्यात आली. सईवर त्याच वेळेला काम चालू होतंच. तिने स्वतःला पटवून देण्यासाठी शोधलेला मार्ग (न बोलणे, स्वतःला त्रास देणे) यापेक्षा संवाद कौशल्याद्वारे आपले म्हणणे कसे मांडता येईल हे तिला काही सत्रांत दाखवलं गेलं. राग, ताण नियंत्रण कसं करायचं याबद्दल सांगण्यात आलं व त्यासाठी मेडिटेशन सुचवण्यात आले आणि त्याच्या जोडीला भावनांमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी मानसशास्त्र्ाातील काही उपचार पद्धती वापरण्यात आल्या.
सईवर त्याचा अपेक्षित परिणाम दिसत होताच. शिवाय, तिच्या घरचेही हळूहळू तिला ती आहे तशी स्वीकारायला लागले होते. सई आता हळूहळू मार्गाला लागत होती, पण तिच्यासारख्या असंख्य व्यक्ती आज स्वतःसाठी लढत आहेत. त्यांचे चारचौघांत ‘न फिट होणारे’ विचार आणि वर्तनसुद्धा ‘फिट आहे’ हे सिद्ध करत आहेत. अशा व्यक्तींना त्यांच्या बाजूने बघण्याची गरज आहे, ज्यामुळे त्याही कशा नॉर्मलच आहेत हे समजून येईल. तसेच आपल्याही दृष्टिकोनात थोडासा फरक करता येईल.
(लेखिका मानसोपचारतज्ञ व समुपदेशक आहेत.)
– [email protected]
























































