मनतरंग – असा मी! असा मी !!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> दिव्या नेरुरकर-सौदागर

समलैंगिक व्यक्ती ही स्त्री आणि पुरुषाच्या क्षमता स्वतःमध्ये बाळगत असते. त्यामुळे या दोन्ही घटकांची स्वभाव वैशिष्टय़े म्हणजेच स्त्रीची संवेदनशीलता आणि ममत्व तसेच पुरुषाची शारीरिक ताकद हे सर्व एकत्र अनुभवायला मिळतं. असे पुरुष हेही स्वतःच्या बळावर पुढे जातात आणि यशस्वी होतात, पण दुर्दैवाने त्यांना बऱ्याच अग्निदिव्यातून जावे लागते. अशा व्यक्तींच्या समाजाकडून काही जास्त अपेक्षा नसतात. फक्त ‘आमचा स्वीकार करा आणि सन्मानाने जगू द्या’ एवढीच अपेक्षा असते.

‘‘मॅडम, मला तुमची आजची अपॉइंटमेंट मिळेल का?’’ फोनवर पलीकडून एक तरुण हळू आवाजात बोलत होता. ‘‘मला लवकरात लवकर भेटायचंय…’’ त्याच्या बोलण्यात आर्जवही जाणवले. वेळ सांगितल्यावर लगेच तातडीने तो क्लिनिकमध्ये हजरही झाला. ‘‘मी हेमंत (नाव बदलले आहे), एका सामाजिक संस्थेमध्ये प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून कामाला आहे’’. त्याने स्वतःची जुजबी ओळख करून दिली.

खरोखर तो कसल्यातरी ताणात असावा. त्याच्या देहबोलीतून हे स्पष्ट दिसत होते. त्याच्या हातापायांच्या हालचाली एकसारख्या चालू होत्या. स्वतःबद्दल सांगतानाही तो सारखा केसांतून हात फिरवत आणि शर्टाची व्यवस्थित असलेली कॉलर पुनःपुन्हा सारखी बसवत होता.

‘‘अॅक्चुअली मी स्वतःच्या आयुष्याला खूप कंटाळलोय. सारखं खोटेपणाने वावरतोय. माझ्या मनाची घुसमट वाढत चालली आहे. मी आनंदात आहे आणि मस्त जगतोय असं माझ्या आईला आणि बायकोला वाटत असतं. माझी बायको तर कायम माझ्या मागेपुढे करत असते. तिचीही मला चीड येत चालली आहे. सारखं सारखं काय ते चिकटायचं अंगाला?’’ हेमंत बोलता बोलता पटकन थांबला.

आवंढा गिळत त्याने हळू आवाजात सांगितलं, ‘‘मला लग्न नव्हतं करायचं. माझं एकावर प्रेम आहे.’’ एवढंच बोलून तो गप्प बसला. ‘‘मी ‘गे’ (Gay) आहे’’ असं सांगताना त्याची नजर आता खालीच होती. त्याचा त्रास काय असेल आणि तो आजपर्यंत किती सहन करत आला असेल याची कल्पना त्याने स्वतः ‘समलिंगी’ असल्याची कबुली दिल्यावर आलीच. ‘‘हे गुपित मला आणि एका मित्रालाच माहीत आहे. मी काल आत्महत्या करण्याच्या विचारात होतो, पण माझ्यावर असलेल्या जबाबदाऱ्या आठवल्या आणि हा विचार झटकून टाकला. समुपदेशन घेण्याचं ठरवलं आणि तुमच्याकडे आलोय.’’ हेमंतला हे सगळं सांगताना भरपूर रडायला आलं.

तो सध्याच्या त्याच्या परिस्थितीत असहाय्य बनला होता. लहानपणापासून तो एक चेष्टेचा विषय बनला होता. जरी त्याचे घरचे विषय काढत नसले तरी त्याच्या नाजूक हालचाली नक्कीच त्याच्या घरच्यांकडून सुटल्या नव्हत्या. म्हणूनच त्याने वडिलांचा जास्तीत जास्त मार खाल्ला होता आणि आईबरोबर तो बाबा-बुवांकडे गेला होता. शाळा – कॉलेजात असतानाही त्याला इतर मुलांकडून भरपूर त्रास झाला होता. मग एकटं राहणं, अभ्यासात मन न लागणं, चिडचिड या सगळ्याचा सामना त्याने ‘मी नक्की मुलगा की मुलगी?’ या स्व-संघर्षासह केला होता.

त्यातच हेमंत हा बाललैंगिक अत्याचारांनाही बळी पडला होता. वयात येताना त्याला या दुर्दैवी घटनेचा सामना करावा लागला होता. ‘पुरुष मुलावर अत्याचार करतोय’ हे कदाचित लोकांना खोटं वाटेल आणि त्याहूनही अधिक ‘आपली बदनामी होईल. आपलं भांडं फुटेल’ या भीतीने त्याने अत्याचार चारेक वर्षे सहन केले होते.

हेमंत यामुळे पूर्ण खचला होताच, पण जेव्हा ‘तो लग्न झाल्यानंतर सुधारेल’ या समजातून त्याचे लग्न लावून दिले गेले तेव्हा त्याची असहाय्यता नैराश्यात बदलली. सगळे मार्ग बंद झाले असं त्याला वाटायला लागलं, पण घरच्यांवरील प्रेमामुळेच तो पाठी फिरला आणि समुपदेशनासाठी आला होता.

आज हेमंतसारखे असंख्य तरुण आहेत, जे समलैंगिक आहेत. ज्यांना स्त्रीपेक्षा पुरुषांचा सहवास अधिक रोमांचक वाटतो, पण दुर्दैवाची गोष्ट अशी की, अशा तरुणांना समाजाकडून अवहेलना आणि तिरस्कार मिळत असतो. मग असे तरुण किंवा पुरुष हेटाळणीचा विषय ठरतात. ज्यामुळे त्यांच्या मानसिक स्वास्थ्यावर दूरगामी घातक परिणाम होतात. असे काही तरुण मग एकतर निराश किंवा बंडखोर तरी होतात नाहीतर ड्रग्ज, दारूच्या आहारी जाऊ शकतात. काही जण हे वाईट संगतीलाही लागू शकतात.

अशा समलैंगिक पुरुषांना बऱयाच वेळेस काही गैरसमजांचा सामना करावा लागतो.

– समलैंगिक असणं हे सामान्य नाही हे पूर्णतः चुकीचे आहे. जसे विरुद्ध लैंगिक असणे सामान्य आहे तसेच समलैंगिक असणेही सामान्य आहे.

– समलैंगिकता म्हणजे विकृती असे नसून ती एक निसर्गाने काही जणांना बहाल केलेली देणगी आहे. कारण असे पुरुष/स्त्री हे दोन्ही प्रकारच्या मनांना अधिक चांगल्या प्रकारे समजत असतात.

– समलैंगिक असणं म्हणजे गेल्या जन्मीचं पाप हा शास्त्र्ााrय दृष्टिकोनातून चुकीचा समज आहे.

– समलैंगिक व्यक्तीला मूल होऊ शकत नाही असं नसून बऱयाचदा असं पाहिलं गेलं आहे की, अशा व्यक्ती शक्यतो विवाह करत नाहीत. त्यामुळे अशा व्यक्तींना स्वतःचे मूल नसते.

– समलैंगिक व्यक्ती म्हणजे समाजकंटक असे नसून या व्यक्ती उलट निरुपद्रवी असतात.

समलैंगिकता असणं ही माझ्या मते निसर्गदत्त देणगी आहे, ज्यामुळे अशी व्यक्ती ही स्त्री आणि पुरुषाच्या क्षमता स्वतःमध्ये बाळगत असते. त्यामुळे या दोन्ही घटकांची स्वभाव वैशिष्टय़े म्हणजेच स्त्रीची संवेदनशीलता आणि ममत्व तसेच पुरुषाची शारीरिक ताकद हे सर्व एकत्र अनुभवायला मिळतं. असे पुरुष हेही स्वतःच्या बळावर पुढे जातात आणि यशस्वी होतात, पण दुर्दैवाने त्यांना बऱयाच अग्निदिव्यातून जावे लागते. अशा व्यक्तींच्या समाजाकडून काही जास्त अपेक्षा नसतात. फक्त ‘आमचा स्वीकार करा आणि सन्मानाने जगू द्या’ एवढीच अपेक्षा असते.

हेमंतनेही हीच व्यथा बोलून दाखवली. त्याच्या दुखावलेल्या स्वाभिमानावर जेवढं काम करणं गरजेचं होतं तेवढंच त्याच्या मानसिक आघातांवरदेखील मलमपट्टी गरजेची होती. त्या दिशेने समुपदेशन सत्रे सुरू झाली. या सर्व प्रक्रियेत हेमंत स्वतःवर प्रेम करायला शिकला. त्याचा आत्मविश्वास परत आला. त्याच्या पत्नीलाही नंतर (त्याच्या परवानगीने) समुपदेशनात सामील करण्यात आले, जे गरजेचेच होते. एक चांगली गोष्ट अशी की, तिनेही सर्व समजल्यावर हेमंतला स्वीकारले. अर्थात हे सोपे नव्हते, पण हेमंतमध्ये झालेला सकारात्मक बदल आणि तिच्या मनात असलेल्या गैरसमजांना मिळालेली उत्तरे यामुळे तीही त्याची एक चांगली मैत्रीण झाली आणि खऱया अर्थाने दोघांच्या सहजीवनाला सुरुवात झाली.

(लेखिका मानसोपचारतज्ञ व समुपदेशक आहेत.)
– [email protected]