
>> डॉ. संतोष पाठारे
सिनेमा ही खरे तर समूहाच्या साक्षीने आस्वाद घ्यायची कला. मात्र गेल्या काही वर्षांत प्रेक्षक ओटीटी माध्यमाला सरावला आहे. प्रेक्षकांनी थिएटरमध्ये आवर्जून यावे यासाठी गोष्टी सांगण्याच्या तंत्रामध्ये बदल घडत आहेतच परंतु या सगळय़ात चित्रपटाचा आत्मा असलेली कथा जर हरवली तर प्रेक्षक पाठ फिरवतात. त्यामुळे चित्रपटाची सशक्त कथा-पटकथा आणि ती पडद्यावर मांडण्याची पद्धत प्रभावी असणे गरजेचे असते. सिनेमातील हे घटक प्रेक्षकांना थिएटरमध्ये घेऊन येण्यास भाग पडतात हे ‘अमलताश’, ‘लापता लेडीज’ आणि ‘भ्रमयुगम’ या चित्रपटांनी सिद्ध केले आहे.
’अमलताश’ पाहिलात का?’ व्हॉट्सअॅपवर कुतूहलाने विचारणा होते. ‘लापता लेडीज’ अजिबात चुकवू नकोस, एक सिनेमाप्रेमी मित्र फोन करून सांगतो. ‘भ्रमयुगम’ची तिकिटे काढली आहेत. तुम्ही सोबत यायलाच हवे. मराठीच्या बरोबरीने दाक्षिणात्य चित्रपट आवडीने पाहणारा दर्दी प्रेक्षक आग्रहाचे निमंत्रण देतो.
‘अमलताश’ , ‘लापता लेडीज’ , ‘भ्रमयुगम’ हे गेल्या दोन-तीन आठवडय़ांत थिएटरमध्ये प्रदर्शित झालेले सिनेमे. कोविड काळाने ओटीटीवर घरबसल्या नव्याने प्रदर्शित झालेले चित्रपट पाहण्याची सवय लावलेल्या प्रेक्षकांना थिएटरमध्ये ओढून आणण्याची ताकद या चित्रपटांमध्ये आहे. यथावकाश हे चित्रपट ओटीटीवर येतीलच, पण त्याची वाट न पाहता प्रेक्षक हे चित्रपट थिएटरमध्ये जाऊन पाहत आहेत, या मागील कारणांचा शोध घेणे मनोरंजक ठरेल. सिनेमा ही खरे तर समूहाच्या साक्षीने आस्वाद घ्यायची कला आहे. दूरदर्शन आणि त्यानंतर आलेली व्हिडीओ संस्कृती यामुळे घरबसल्या सिनेमाचा आनंद प्रेक्षक घेऊ लागले. आता तर ओटीटीमुळे हातातल्या मोबाईलवर सिनेमा पाहण्याची स्वस्त सोय झाली आहे. कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी आजूबाजूचे भान विसरून सिनेमा बघण्यात रममाण झालेले प्रेक्षक आपल्याला दिसतात. पण खऱया अर्थाने चित्रपटातील दृश्य आणि ध्वनी यांचा आस्वाद घ्यायचा असेल तर थिएटरमध्ये जाऊन सिनेमा पाहण्याला पर्याय नाही. घरात बसून सिनेमा पाहण्याची चटक लागलेला प्रेक्षक थिएटरमध्ये आवर्जून यावा यासाठी अनेक दिग्दर्शक आपल्या गोष्टी सांगण्याच्या तंत्रामध्ये बदल घडवून आणत आहेत. डिजिटल युगात व्हीएफएक्स तंत्राच्या सहाय्याने पडद्यावर भव्यदिव्य प्रतिमा निर्माण करणे, अद्भुत दृश्यांबरोबर ध्वनी संयोजनाच्या आधारे ती दृश्ये अधिक प्रभावी करणे आणि ती थ्रीडी, 4 एक्स सारख्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचे कौशल्य प्राप्त करणे चित्रपट निर्मात्यांसाठी आवश्यक ठरत आहे. सिनेमा व्यवसायाचा तो आता अविभाज्य भाग झालाय. अर्थात प्रेक्षक केवळ अशी अद्भुत दृश्ये पाहायला येणार नाहीत याची जाणीव निर्मात्यांना असायला हवी. या सगळय़ात चित्रपटाचा आत्मा असलेली कथा जर हरवली तर प्रेक्षक या चकचकीतपणाकडे पाठ फिरवतात. त्यामुळे चित्रपटाची सशक्त कथा-पटकथा आणि ती पडद्यावर मांडण्याची पद्धत प्रभावी असणे गरजेचे असते. सिनेमातील हे घटक प्रेक्षकांना थिएटरमध्ये घेऊन येण्यास भाग पडतात हे ‘अमलताश’ , ‘लापता लेडीज’ आणि ‘भ्रमयुगम’ या चित्रपटांनी सिद्ध केले आहे.
सुहास देसले दिग्दर्शित ‘अमलताश’ हा चित्रपट 2018 च्या मामि महोत्सवात दाखवला गेला होता. त्यावेळी ज्या प्रेक्षकांनी तो पहिला त्यांनी त्याचे भरभरून कौतुक केले. दुर्दैवाने योग्य वितरक न मिळाल्याने आणि नंतर आलेल्या कोविडच्या संकटामुळे या चित्रपटाचे थिएटरमधील प्रदर्शन लांबले. मराठी सिनेमाला मल्टिप्लेक्समध्ये शो कमी मिळतात आणि तेसुद्धा प्राइम टाइमला मिळणे दुरापास्त असते. अशा परिस्थितीत तो चित्रपट जर पावार ते रविवारदरम्यान बऱयापैकी गर्दी खेचू शकला तरच सोमवारपासून त्याचे शो मल्टिप्लेक्समध्ये लावले जातात. सध्या प्रदर्शित होणारे अनेक मराठी चित्रपट मल्टिप्लेक्समध्ये तग धरू शकत नाहीत यामागचे हे मुख्य कारण आहे. प्रेक्षकांनी पहिले तीन दिवस गर्दी करावी इतपत त्या चित्रपटाचा दर्जा असणे आणि निर्मात्यांनी प्रसिद्धी केलेली असावी हे घटकदेखील महत्त्वाचे ठरतात. ‘अमलताश’ या बाबतीत सुदैवी ठरला असे म्हणायला हवे.
पुण्यात वाद्यांचे दुकान चालवणारा गायक /संगीतकार तरुण राहुल (राहुल देशपांडे) आणि आपल्या आजीला कॅनडाला घेऊन जाण्यासाठी आलेली कीर्ती (पल्लवी परांजपे) यांची तरल प्रेमकथा ‘अमलताश’मध्ये चित्रित केली गेली आहे. साधे व सरळ कथानक असलेला हा चित्रपट किमान पुणे आणि मुंबई या शहरांमधील थिएटरमध्ये माऊथ पब्लिसिटीमुळे प्रेक्षकांपर्यंत पोहोचला. प्रेक्षकांनी दिलेल्या हाऊसफुल प्रतिसादामुळे नंतर त्याचे शो वाढले. मराठी सिनेमा म्हणजे एकतर सामाजिक प्रबोधन किंवा बटबटीत विनोद या समजातून प्रेक्षकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न ‘अमलताश’मधून केला गेला आणि तो बऱयापैकी यशस्वी झाला असे म्हणायला हवे. पुणे, मुंबई बाहेरील शहरांतसुद्धा जर निर्मात्यांनी या चित्रपटाचे योग्य पद्धतीने वितरण केले तर ‘अमलताश’ला अधिक व्यावसायिक यश मिळू शकेल आणि इतर निर्मात्यांनासुद्धा असे चित्रपट निर्माण करण्याचा हुरूप येईल.
आमिर खानची निर्मिती असलेला, किरण राव दिग्दर्शित ‘लापता लेडीज’ प्रदर्शित झाला तेव्हा पहिल्या आठवडय़ात काहीसा दुर्लक्षित राहिला. रविकिशन आणि छाया कदम हे अव्वल दर्जाचे अभिनेते वगळता या चित्रपटात मुख्य भूमिकेत कोणतेही नामवंत कलाकार नाहीत आणि ट्रेलरमधून दिसलेले ग्रामीण भागात घडणारे कथानक यामुळे प्रेक्षक सुरुवातीला हा सिनेमा पाहायला थिएटरमध्ये वळले नाहीत. पण ‘अमलताश’प्रमाणेच समाज माध्यमांवर आलेल्या सकारात्मक पोस्ट वाचून प्रेक्षकांना या चित्रपटाविषयी कुतूहल निर्माण झाले आणि प्रेक्षक ‘लापता लेडीज’ पाहायला गर्दी करू लागले.
लग्नानंतर सासरी येताना चेहऱयावरून ओढून घेतलेल्या घुंगटामुळे दोन नववधूंची रेल्वेच्या डब्यात झालेली अदलाबदल, त्यातून निर्माण झालेला गुंता आणि या पार्श्वभूमीवर स्त्राrच्या एकूणच अस्तित्वाबद्दल, तिच्या सामजिक स्थानाबद्दल लेखक दिग्दर्शिकेने उपस्थित केलेले प्रश्न ‘लापता लेडीज’मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. प्रेक्षकांना गुंतवून ठेवणारे कथानक, नाटय़पूर्ण प्रसंगातील उपरोधिक संवाद यामुळे ‘लापता लेडीज’ प्रेक्षकांचे मनोरंजन करता करता त्यांना अंतर्मुखसुद्धा करतो. चित्रपटातील पुरुष व्यक्तिरेखांना विनाकारण खलनायक न बनविता स्त्रियांच्या मूलभूत हक्कांबद्दल भाष्य करणारा ‘लापता लेडीज’ हा सध्या हिंदी व्यावसायिक चित्रपटातील आदर्श ठरावा.
मराठी, हिंदीच्या बरोबरीने महाराष्ट्रात सध्या दाक्षिणात्य चित्रपट पाहणारा प्रेक्षक वर्ग वाढला आहे. सशक्त कथानके, उत्तम निर्मिती मूल्ये यामुळे हे चित्रपट ओटीटीवर मोठय़ा संख्येने पाहिले जात आहेत, पण त्यातील उच्च दर्जाच्या तांत्रिक घटकांमुळे हे चित्रपट आवर्जून थिएटरमध्ये जाणारा प्रेक्षक वर्ग वाढीस लागला आहे. महाराष्ट्रात राहणारे दाक्षिणात्य प्रेक्षकच नव्हे तर मराठी प्रेक्षकसुद्धा हे चित्रपट थिएटरमध्ये पाहायला जात आहेत. हे चित्रपट कलेसाठी आश्वासक चित्र आहे.
‘भ्रमयुगम’चा दिग्दर्शक राहुल सदाशिवन याचा याआधीचा ‘भूतकालम’ हा भयपट गाजला होता. ‘भ्रमयुगम’ची कथा 17 व्या शतकात केरळमधील घनदाट अरण्यातील एका पडक्या वाडय़ात घडते. थेवन (अर्जुन अशोकन) हा गायक त्याच्या राज्यातील गुलामगिरीच्या जाचातून पळ काढून या वाडय़ात आश्रयाला येतो. त्या वाडय़ाचा गूढ मालक पोट्टी (मामुटी) आणि स्वयंपाकी (सिद्धार्थ) यांच्या कचाटय़ात तो सापडतो. ‘भ्रमयुगम’ या भयकथेची थरारक मांडणी कृष्णधवल रंगत करताना दिग्दर्शक एक राजकीय विधानसुद्धा नकळतपणे मांडतो हे या चित्रपटाचे विशेष आहे. ‘भ्रमयुगम’मधील थरार पाहण्या-ऐकण्यासाठी थिएटरमध्ये जाणे ाढमप्राप्त आहे.
वर उल्लेखिलेल्या प्रातिनिधिक चित्रपटांची गुणवैशिष्टय़े लक्षात घेतली तर मनोरंजन करणारा आशय आणि त्याच्या जोडीला असलेली उत्तम तांत्रिक अंगे ही प्रेक्षकांसाठी आकर्षण ठरू शकतात. चित्रपट महोत्सव आणि ओटीटी यामुळे प्रेक्षकांना जगभरातील दर्जेदार चित्रपट व मालिका पाहण्याची सवय लागली आहे. त्याच दर्जाची कलाकृती निर्माण करण्याचे आव्हान आपल्या दिग्दर्शकांपुढे आहे. ते पेलण्याचा प्रयत्न आता होऊ लागले आहेत. थिएटरपासून दूर गेलेला प्रेक्षक परत येण्यासाठी प्रादेशिक आणि राष्ट्रीय पातळीवर होत असलेले हे प्रयत्न प्रेक्षकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला तर यशस्वी होतील. चित्रपट कलेचे सामर्थ्य तिच्या समूहाबरोबर असलेल्या नात्याशी आहे. सोय म्हणून घरात चित्रपट पाहणाऱया प्रेक्षकांनी त्याचा सर्वार्थाने आस्वाद घेण्यासाठी कोणतीही कारणे न देता पुन्हा एकदा थिएटरमध्ये जायला हवे.
(लेखक चित्रपट अभ्यासक आहेत.)


























































