
>> डॉ. अभय फडके
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या अहवालानुसार गेल्या पाच वर्षांत ‘एच1एन1’ विषाणू संसर्गाचे प्रमाण घटले आहे. कारण मास्कचा वापर संसर्गापासून दूर राहण्यास नक्कीच मदत करतो.
‘स्वाईन फ्लू’ हा श्वसननलिकेत होणारा संसर्ग आहे. इन्फ्लूएन्झा ‘टाईप-ए’ च्या ‘एच1एन1’ विषाणूमुळे स्वाईन फ्लू हा आजार होतो. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, एच1एन1 विषाणूने शरीरात प्रवेश केल्यानंतर 1 ते 7 दिवसांच्या कालावधीत रुग्ण स्वाईन फ्लू संक्रमित होतो. लक्षणं दिसू लागल्यानंतर पुढील सात दिवस रुग्ण हा आजार दुसऱयांमध्ये पसरवू शकतो. लहान मुलं दीर्घकाळ स्वाईन फ्लूचा संसर्ग पसरवू शकतात.
‘स्वाईन फ्लू’ची लक्षणे कोणती?
‘स्वाईन फ्लू’ हा सामान्य ‘फ्लू’सारखा असल्याने याची लक्षणंही सामान्य फ्लूसारखीच असतात. ताप येणं, थंडी वाजणं, कफ होणं, घसादुखी, अंगदुखी, डोकेदुखी, खूप जास्त थकवा येणं, डायरिया व उलटय़ा होणं अशी लक्षणं आढळून येतात.
अशावेळी अशी खबरदारी घ्या…
खोकला किंवा शिंक येत असल्यास नाकातोंडावर रूमाल ठेवा. हातांची स्वच्छता राखा, डोळे, नाक आणि तोंडाला अस्वच्छ हातांनी स्पर्श करणे टाळा. गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका. ताप आला असेल आणि श्वास घेण्यास अडथळा होत असेल तर स्वतःच्या मर्जीने औषधं घेण्याचं टाळा. त्वरित वैद्यकीय सल्ला घ्या.
या आजाराचा जास्त धोका कोणाला?
5 वर्षांखाली मुलांना आणि 65 वर्षांवरील वयस्कर व्यक्तींना जास्त धोका असल्याचं दिसून येतं. मधुमेह, उच्च रक्तदाब, लिव्हर, किडनी, हृदय यांचे आजार असणारे तसंच गरोदर माता, स्तनपान करणाऱया माता, एचआयव्ही /एड्स, कॅन्सर, श्वसन संस्थेचे आजार (दमा, टीबी) रोग प्रतिकारक शक्ती कमी झालेल्या व्यक्ती…
या सर्व व्यक्तींनी वेळीच (लक्षणे दिसून येताच 48 तासांच्या आत) रोगनिदान व उपचार करण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा अन्यथा रुग्ण दगावण्याची शक्यता असते.
निदान कसे होते?
फ्लूचे अचूक निदान करण्यासाठी संशयित रुग्णाच्या नाक व घशातल्या स्त्र्ाावाची तपासणी करणं आवश्यक आहे. असे नमुने घेणे व त्याची तपासणी करणे या गोष्टी ठराविक ठिकाणीच उपलब्ध आहेत. तपासणीचा निष्कर्ष (अहवाल) एक ते दोन दिवसात प्राप्त होतो.
लस कोणती दिली जाते?
एच1एन1 फ्लूचा आजार टाळण्यासाठी हिंदुस्थानात सध्या दोन प्रकारच्या लसी उपलब्ध आहेत. त्यापैकी एक लस नाकाद्वारे (स्प्रेच्या सहाय्याने) दिली जाते. यातली नाकाद्वारे दिली जाणारी लस तीन वर्षांवर असणाऱया व्यक्तींना देण्यात येते. परंतु ही लस गरोदर माता, स्तनपान करणाऱया माता, रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेल्यांना दिली जात नाही. दुसरी लस इंजेक्शनद्वारे दिली जाते. इंजेक्शनद्वारे दिली जाणारी लस 18 वर्षांवर असणाऱया व्यक्तींना देण्यात येते. हे इंजेक्शन एकदाच घ्यावे लागते. लस घेतलेल्यांमध्ये 90 ते 95 वर्षांच्या व्यक्तींना पुढील 1 वर्षापर्यंत आजार होण्याची शक्यता नसते.
2017 मध्ये 6144 प्रकरणे व 778 जणांचा मृत्यू झाला. 2022 मध्ये 131 प्रकरणे एकही रुग्ण दगावलेला नाही. परंतु जुलैमध्ये परिस्थिती बदलली असून एकटय़ा मुंबई शहरात 182 प्रकरणांचे निदान झाले आहे आणि गेल्या 4 दिवसांत (31जुलैपर्यंत) 40 नवीन प्रकरणांची नोंद झाली आहे.
गेल्या महिन्यात शहरात फक्त 2 केसेस होत्या, तर गेल्या वर्षी मुंबईत 21 केसेस आढळून आल्या होत्या. 4 ऑगस्ट 2022 पर्यंत, महाराष्ट्रात स्वाइन फ्लूचे 833 रुग्ण आहेत, त्यापैकी 27 रुग्णांचा संसर्गाने मृत्यू झाला आहे.
(लेखक एसआरएल डॉ. अविनाश फडके लॅब्सचे केंद्र प्रमुख तसेच एमडी इन पॅथेलॉजी आहेत)





























































