
>> डॉ. अनुराधा कुलकर्णी
जुन्या कालखंडातील समाजरचनेत स्त्रीयांना आपले विचार व्यक्त करण्याची, हक्क मागण्याची संधीच नव्हती, असा विचार आज आपण उगाचच करतो. पण हा विचार नापास होतो. जेव्हा समरांगणावर स्वतःच्या सैनिकांना, मुलाला घेऊन लढणारी, पतीपश्चात देशमुखी वतनाचा कारभार समर्थपणे सांभाळणारी, समाजातील व कुटुंबातील नाती सांभाळणारी, प्रत्यक्ष जिजाऊसाहेब व शिवप्रभूंचा सहवास लाभलेली दिपाईआवा बांदल, हिरडस, मावळ ही कर्तृत्ववान मराठेकालीन स्त्री आपल्या समोर येते.
समरांगणावर हातात तलवार घेऊन लढलेली शिवकाळातील स्त्री म्हणजे हिरडस मावळची दिपाई पृष्णाजी बांदल देशमुखीण. कागदपत्रांमधून शिवकाळातील मोजक्याच स्त्रियांचे उल्लेख मिळतात.
छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या आढळराव देशमुख यांचे निवाडपत्र मी वाचत होते. शिवछत्रपतींबरोबर या न्यायनिवाडा सभेला महाराजांचे प्रधान, मुजुमदार, डबीर, वाकेनीस, सुभेदार या उपस्थित व्यक्तींची नावे आहेत. निवाडपत्रात देशमुख, देशपांडे, बलुतेदार या वतनदारांबरोबरच, मावळातील देशमुखांच्या यादीत दिपाईआवा बांदल देशमुखीण, हिरडस मावळ असे नाव मी वाचले. शिवरायांच्या न्यायसभेला उपस्थित, एका स्त्रीचे नाव वाचून आपली मोडी वाचनातील काही चूक झाली, असे वाटून हे नाव मी परत परत वाचले आणि न्यायसभेला उपस्थित असणाऱया मान्यवरांच्या यादीतील हे नाव एका स्त्रीचेच आहे हे मी स्वतःशीच कबूल केले. यानंतर शोध घेता भारत इतिहास संशोधक मंडळाने ऐतिहासिक संकिर्ण निबंध, खंड 10 मध्ये प्रसिद्ध केलेली बांदल घराण्याची काही कागदपत्रे वाचल्यानंतर, कर्तृत्ववान दिपाई बांदल समोर आल्या.
आदिलशाही सरदार फतेहखानाच्या स्वारीच्या वेळी झालेल्या लढाईत, दिपाईंनी आपला मुलगा बाजी बांदल यासह प्रत्यक्ष भाग घेतला होता. या लढाईच्या वेळी बांदलांच्या सैन्यातील अडीचशे लोक धारातीर्थी पडले होते. या मेहिमेतील कामगिरीबद्दल शिवरायांनी दिपाई यांना साडीचोळीसाठी पण्हेर हे गाव इनाम दिले होते. दिपाईंचे पण्हेर गावाचे साडीचोळीचे इनाम पुढे संभाजीराजांनीही चालवले.
जावळीच्या म्हणजे चंद्रराव मोरे यांच्या विरुद्धच्या मोहिमेवर जाताना, शिवाजीराजांनी दिपाईंना ‘धारेचे पान’ म्हणजे तलवार हातात देऊन रवाना केले, असा उल्लेख आला आहे.
हनुमंत अंगद रघुनाथाला।
तसे जेधे-बांदल शिवाजीला।
शाहीर अज्ञानदासांच्या अफजलखान वधावरील पोवाडय़ात आणि बांदल घराण्याच्या हकीकतीनुसार अफजलखान वधाच्या मोहिमेत, दिपाई बांदलांच्या सैन्यासह सामील झाल्या होत्या. ही मोहीम फत्ते झाल्यावर शिवाजी महाराजांनी बांदलांना हिरडस मावळातील भाणसदरे हे गाव इनाम दिले होते.
मराठय़ांच्या इतिहासातील रोमहर्षक प्रसंग म्हणजे, पावनखिंडीतील बाजीप्रभू देशपांडे यांचे बलिदान. बाजीप्रभू देशपांडे हे बांदलांचे सरनौबत होते. मुगल सरदार सिद्दी जौहरच्या पन्हाळा वेढय़ाच्याप्रसंगी बाजीप्रभू देशपांडे धारातीर्थी पडले. महाराजांनी याप्रसंगी खूप शोक व्यक्त केला. ‘‘तो लिहिता पूर्वत नाही’ असा उल्लेख आहे. यावेळी दिपाईआऊ यांनी महाराजांच्या पायी डोई ठेवून, अर्ज केला की, ‘‘माझे लोक व बाजी परभू देशपांडे सरनोबत अणकेही लोक साहेबकामावरी खर्च जाले. पदरीचे भांडवल सरले. तरी साहेबी त्यांचे घरचे समाधान करावे.’’ दिपाईंचे हे मागणे शिवप्रभूंनी मान्य केले. ‘साहेब बाजी परभूच्या घरात गेले. त्यांचे घरचे बायेका, लेक व भाऊबंद यांचे समाधान केले.’ दिपाई बांदलांच्या या हकीकतीमधून शिवचरित्राचा एक पैलूही समोर येतो तो म्हणजे, शिवछत्रपती धारातीर्थी पडलेल्या सैनिकांच्या घरी जाऊन, त्यांच्या नातेवाईकांना प्रत्यक्ष भेटून त्यांचे सांत्वन करीत.
बांदलांच्या हकीकतीनुसार शिवाजी महाराज आग्र्याला गेले त्यावेळी राजमाता जिजाऊसमवेत दिपाई बांदल राजगडावर राहिल्या होत्या. महाराज यशवंत होऊन सुखरूप स्वराज्यात आले तेव्हा मातुश्री जिजाऊ साहेबांनी ‘दिपाईंनी आपली खूप सेवा केली’ हे वर्तमान स्वतः शिवरायांना सांगितले.
दिपाईंना दीर्घायुष्य लाभले होते. मृत्यूपूर्वी त्यांनी आपले वाटणीपत्र करून ठेवले होते. या वाटणीपत्राद्वारे त्यांनी आपले स्त्रीधन व इनामी गावे आपल्या तीन नातसुना आणि सैनिक व धारातीर्थी पडलेल्या आपल्या जमावातील सैनिकांच्या पुटुंबाला वाटून दिले होते. मराठा काळातील एका स्त्रीने आपल्या स्त्रीधनाची वाटणी आपल्याच घरातील स्त्रियांना व सैनिकांच्या कुटुंबाला द्यावी हे मराठा काळातील स्त्रीजीवनाचे स्तुत्य दर्शन आजही आदर्श आहे.
ज्या कालखंडातील समाजरचनेतील स्त्रियांना आपले विचार व्यक्त करण्याची, हक्क मागण्याची संधीच नव्हती, असा विचार आज आपण उगाचच करतो. पण हा विचार नापास होतो. जेव्हा समरांगणावर स्वतःच्या सैनिकांना, मुलाला घेऊन लढणारी, पतीपश्चात देशमुखी वतनाचा कारभार समर्थपणे सांभाळणारी, समाजातील व कुटुंबातील नाती सांभाळणारी, प्रत्यक्ष जिजाऊसाहेब व शिवप्रभूंचा सहवास लाभलेली दिपाईआवा बांदल, हिरडस, मावळ ही कर्तृत्ववान मराठेकालीन स्त्री आपल्या समोर येते.
(लेखिका इतिहास विषयाच्या अभ्यासक आहेत.)





























































