
>> डॉ. अविनाश भोंडवे
कोरोना विषाणूच्या साथीमध्ये सर्व जग बुडले आहे. जगातील 185 देशांमध्ये थैमान घालणाऱया कोरोनामुळे होणाऱया मृत्यूचे आकडे दिवसागणिक वाढतच चालले आहेत. मृत्यूच्या या आकडेवारीकडे एक नजर टाकली तर लक्षात येते, की कोरोनाचा आजार ज्यांना आहे त्यांना काही ठराविक आजार असतील, तर त्यांच्यामध्ये मृत्यूचे प्रमाण अधिक सापडते. कोरोनाचां आजार झालेल्या माणसामध्ये हे जे अतिरिक्त आजार असतात, त्यांना कोमॉर्बिड आजार म्हणतात. आणि असे एकासोबत एक आजार असण्याच्या परिस्थितीला ‘कोमॉर्बिडिटीज’ म्हणतात.
‘कोमॉर्बिडिटीज’ या संकल्पनेची व्याख्या करू गेलो तर एका वेळेस दोन किंवा अधिक आजार असणे, आणि त्यातही त्या दोन्हीपैकी एखादा आजार खूप काळ आधीपासून असणे म्हणजे कोमोर्बिड कंडिशन्स.
कोरोनाच्या आजारात रुग्णाला अशा काही आजारांनी आधीच ग्रासले असेल तर त्या रुग्णाला आजार लवकर होतो, त्याची लक्षणे लगेच वाढतात आणि त्या आजारात त्याची तब्येत गंभीर होऊन मृत्यूचा धोकाही जास्त असतो. कोरोनामुळे होणाऱया मृत्युंमध्ये 86.2 टक्के व्यक्तींना काही न काही कोमॉर्बिड आजार असतात. कोरोनामध्ये वेगवेगळ्या कोमॉर्बिडिटीज असणाऱया रुग्णांच्या मृत्यूचे विश्लेषण केले तर लक्षात येते की-
1. उच्च रक्तदाब – 55.4 टक्के
2. मधुमेह – 37.3 टक्के
3. रक्तातील चरबी जास्त असणे (डीसलिपिडीमिया) – 18.5 टक्के
4. कोरोनरी आर्टरी डिसीज – 12.4 टक्के
5. मूत्रपिंडाचे आजार- 11 टक्के
6. डीमेंशिया- मनोविकार (अवमनस्कता)- 9.1 टक्के
7. सीओपीडी- 8.3 टक्के
8. कर्करोग- 8.1 टक्के
9. एट्रीअल फिब्रीलेशन- 7.1 टक्के
10. हार्ट फेल्युअर- 7.1 टक्के
हे आकडे आणि त्यांचे विश्लेषण दि. 7 एप्रिलपर्यंत अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरातील रुग्णांच्या नोंदीनुसार आहेत. पण सर्वसाधारणपणे त्यातला कल हा जगभरात सारखाच आहे.
कोमॉर्बिडिटीजची मुख्य कारणे
या विश्लेषणातून एक गोष्ट लक्षात येते की, विविध प्रकारच्या हृदयविकाराच्या रुग्णांचे प्रमाण यामध्ये जास्त आहे. त्यातही सर्वात जास्त प्रमाण उच्च रक्तदाबाच्या रुग्णांचे आहे. त्यानंतर रक्तातल्या चरबीचे म्हणजे कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढलेले असणे हे आहे. या दोन्ही गोष्टी एकमेकांशी निगडीत आहेत. रक्तदाब वाढण्याच्या अनेक कारणांमध्ये कोलेस्टेरॉल वाढलेले असणे हे प्रमुख आहे.
साहजिकच आहारामध्ये तेल, तूप, चीज, चरबीयुक्त पदार्थ जास्त असल्यास कोलेस्टेरॉल वाढते. करोनाच्या साथीमध्ये पिझ्झा-बर्गरच्या डिलिव्हरीज चालू आहेत. घरातही ते बनवले जातात. सर्वच लोक घरात असल्याने अधूनमधून स्नॅक्स म्हणून वडे, भजी तळणे सुरू आहे. जोडीला फरसाण, शेव, वेफर्स या गोष्टी किराणामालाच्या दुकानातून आणून खाणे चालू आहे. या साऱया खाद्यपदार्थांमध्ये स्निग्ध पदार्थांचे प्रमाण खूप असते. त्या जास्त प्रमाणात खाण्यात आल्याने रक्तातले कोलेस्टेरॉल वाढते. त्याच्या इतर परिणामांसोबत रक्तदाब हळूहळू वाढतोच तसेच कोरोनरी आर्टरीज म्हणजे हृदयाला रक्तपुरवठा करणाऱया सूक्ष्म रक्तवाहिन्यांच्या आतून कोलेस्टेरॉलचे थर जमा होतात, त्या अरुंद होतात. परिणामत: हृदयाला रक्तपुरवठा कमी होऊन हृदयविकाराचा झटका येतो. आणि हेच नेमके कोरोनाच्या कोमॉर्बिडिटीजचे कारण बनते.
व्यायामाचा अभाव हे कोलेस्टेरॉल आणि उच्च रक्तदाब वाढण्याचे आणखी एक महत्वाचे कारण असते. मुळात आजच्या बैठय़ा जीवनशैलीमुळे दैनंदिन जीवनातल्या साध्या हालचालीदेखील विसरले आहेत. म्हणजे जवळच्या जवळ जायचे असेल तरी पायी चालण्याऐवजी स्कूटर, मोटरसायकल नाही तर रिक्षा वापरली जाते. नियमित शारीरिक व्यायाम करणारे लोक फारच कमी आहेत. आणि त्यात आता लॉकडाऊनमुळे सगळ्यांना घरीच बसायचे असल्याने कोलेस्टेरॉल वाढणार हे सांगायला तत्ववेत्त्यांची गरज नाही.
जी गोष्ट कोलेस्टेरॉल आणि उच्च रक्तदाबाची आहे तीच नेमकी मधुमेहाचीसुध्दा आहेच. कोमॉर्बिडिटीजमध्ये दुसऱया क्रमांकावर असलेला हा आजार होण्याचे खरे कारण म्हणजे व्यायामाचा अभाव आणि त्यामुळे होणारी वजनवाढ हेच असते. त्याबरोबरच खाण्यामध्ये अतिरिक्त उष्मांक देणारे गोड पदार्थ, साखर आणि कृत्रिम स्वीटनर्स हे मधुमेहाचे प्रमाण वाढवायला कारणीभूत ठरतात.
जीवनशैली बदलणे
मधुमेह, उच्च रक्तदाब, कोरोनरी आर्टरी डिसीज, कोलेस्टेरॉल वाढणे आणि काही प्रमाणात हार्ट फेल्युअर हे सारे नव्या आणि बैठय़ा जीवनशैलीचे परिणाम आहेत. यांना ‘सायलेंट किलर्स’ म्हणतात .कारण या आजारांची लक्षणे वरून लवकर दिसत नाहीत, पण आपले आरोग्य अंतर्गतरित्या ते पोखरत राहतात. मधुमेह आणि उच्च रक्तदाब यामुळे मूत्रपिंडे निकामी होतात, आणि ही आणखी एक कोमोर्बिडिटी आहे.
या आजारांनी आपल्या शरीराची आपली एकुणातली प्रतिकार शक्ती कमी होते. आत्ता कोरोनाच्या साथीमध्ये गेल्या दोन महिन्यात मोठय़ा प्रमाणावर मृत्यू झाल्यामुळे कोमॉर्बिडिटीजचा हा मुद्दा ऐरणीवर आला आहे. पण एरवी इतर अनेक आजारांमध्येदेखील या कोमॉर्बिडिटीज आजार गंभीर होण्यास आणि रुग्ण दगावण्यास कारणीभूत ठरतात. आणि म्हणूनच त्यांचा प्रतिबंध करणे हे कोरोनाच नव्हे तर इतर आजार टाळण्यासाठी आवश्यक ठरतात.
उपाय-
1. आपल्या आजारांची औषधे नियमित घ्या. या आजारात एकही गोळी किंवा औषध एकही दिवस किंवा एकही डोस चुकवायचा नसतो.
2. तुम्हाला डॉक्टरांनी पुनर्तपासणीसाठी जेंव्हा बोलावले आहे त्यावेळेस जाणे आवश्यक आहे. अनेकदा एक महिन्यासाठी दिलेली औषधे, असे परत तपासायला बोलावले आणि रुग्ण गेला नाही, तर चार-सहा महिने घेतली जातात. मग यामध्ये काही औषधे एक महिन्याने डॉक्टरांना थांबवायची इच्छा असते, ती अकारण जास्त दिवस घेतली जातात. याचे तब्येतीवर दुष्परिणाम होऊ शकतात. आणि आजार वाढल्याचे रुग्णाच्या आणि डॉक्टरांच्या लक्षात येत नाही.
3. तुम्हाला सांगितलेल्या चाचण्या नियमित करा. यावरून आजार वाढत असल्यास वेळेवर उपाय योजना करणे डॉक्टरांना शक्य होते.
4, आहाराची पथ्ये काटेकोरपणे पाळा. यामध्ये काय खायचे काय टाळायचे, याबरोबरच मधुमेहासारख्या आजारात चार वेळा आहार घेण्याची आवश्यकता असते, त्याचेही पालन कटाक्षाने करावे लागते
5. व्यायाम नियमितपणे रोजच्या रोज करा. सध्या लॉकडाऊनमुळे चालायला जाने शक्य होत नाही. पण सोसायटीच्या आवारात फिजिकल डिस्टन्सिंग पाळून थोडय़ा फेऱया घालणे किंवा घरातच 15000 पावलं दिवसभरात अंतरा अंतरांनी चालणे असे उपाय करता येतात. शिवाय सूर्यनमस्कार, जोर-बैठका, दोरीवरच्या उडय़ा असे व्यायाम आपली तब्येत सांभाळून घरामध्येच करता येतात.
6. एवढे सांभाळूनही जर सर्दी, घसा दुखणे, खोकला आणि छाती भरून कफ होणे, दम लागणे अशी काहीही लक्षणे तुमच्यात निर्माण झाली, तर त्वरित तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
थोडक्यात, कोमॉर्बिडिटीज हा करोनाबाबत मोठाच प्रश्न आहे. ज्यांना त्या आहेत त्यांनी पूर्ण खबरदारी आणि काळजी घ्यावी. तुम्हाला करोनाची बाधा टाळायला नक्कीच उपयुक्त ठरेल.
– [email protected]





























































