
>> डॉ. मुकुंद कुळे
कोणत्याही मानवी भावनांप्रमाणेच प्रेम हीदेखील नैसर्गिक भावनाच आणि तिची बाधा कधी, कुणाला, कोणत्या वयात होईल हेही सांगता यायचं नाही. हा प्रेमाचा त्रिकोण काही आताचाच नाही, पूर्वापार चालत आलेला. मग त्यातले रुसवे-फुगवेसुद्धा तेव्हापासूनचेच. शंकर-पार्वती-गंगा, विठोबा-रुक्मिणी-जनाई, खंडोबा-म्हाळसा-बाणाई या प्रेमत्रिकोणांचे लोकवाङ्मयातील दाखले पाहिलेत तर कुणीही अचंबित होईल.
जसे लोक तशा त्यांच्या लोकदेवता. साहजिकच मग मनुष्यातील गुण-दोष त्यांच्या लोकदेवतांमध्येही उतरतात. खरंतर त्यामुळेच या लोकदेवता जिवंत भासतात. आपल्यातल्या वाटतात. थेट नातंच जोडता येणार नसेल, तर मग या लोकदेवता काय कामाच्या? बोलूनचालून त्या दगडाच्या आहेत हे तर असतंच ठाऊक आपल्याला. पण लोकदेवतांची खासियतच ही आहे की, त्या अगदी सहजी लोकमानसाशी एकरूप पावतात. लोकमानसाची लोकश्रद्धाही एवढी रसरशीत की, ते आपल्या लोकदेवतांना मानवी भावभावनांशी अलगद जोडून घेतात. त्यामुळेच तर लोकवाङ्मयातील लोकदेवतांची गाणी-कथा ऐकताना-वाचताना श्रोत्यांना अनेकदा प्रश्न पडतो, ही कथा कुणाची- देवाची की सर्वसामान्य माणसाची? तर या कथा किंवा गाणी प्रत्यक्षात असतात, सामान्य माणसांचीच, पण ती कलम केली जातात देवदेवतांवर. मग ती गाणी किंवा कथा सुखाच्या असोत वा दुःखाच्या. पुराणात-महाकाव्यांत देवदेवतांच्या चरित्राला आदर्शाचा अलौकिक साज चढवलेला असतो, मात्र तेच चरित्र लोकवाङ्मयात आलं की त्याचा सारा साज-बाज उतरवला जातो. मग सामान्य माणसं घरात भांडावीत, तशा या लोकदेवता भांडत बसतात. विशेषतः प्रेमावरून!
इतर कोणत्याही मानवी भावनांप्रमाणेच प्रेम हीदेखील नैसर्गिक भावनाच आणि तिची बाधा कधी, कुणाला, कोणत्या वयात होईल हेही सांगता यायचं नाही… मात्र एकदा का ती झाली की मग कुणाची सुधबुध जागेवर राहत नाही. एवढंच कशाला, लग्नाची हक्काची बायको जवळ असतानाही, अनेकदा मग कुणाकुणाला तिसऱयाच कुणाची स्वप्नं पडू लागतात… आणि एकदा का असं झालं की वादावादी ठरलेलीच. मग तो देव असो वा सामान्य माणूस!
म्हणून तर प्रेमाचा त्रिकोण काही आताचाच नाही, पूर्वापार चालत आलेला. मग त्यातले रुसवे-फुगवेसुद्धा तेव्हापासूनचेच. शंकर-पार्वती-गंगा, विठोबा-रुक्मिणी-जनाई, खंडोबा-म्हाळसा-बाणाई या प्रेमत्रिकोणांचे लोकवाङ्मयातील दाखले पाहिलेत तर कुणीही अचंबित होईल. कारण प्रसंगी एकमेकांच्या झिंज्याच काय त्या उपटायच्या बाकी ठेवलेल्या दिसतात या लोकदेवतांनी. उदाहरणच देऊन सांगायचं तर हे लोकगीत पाहा-
‘पार्वती म्हणे गंगा तू मोठी पातक कारणी
भुलविले शिवाला कशी केलीस करणी
तू फार अमंगळ सवती तुज नाही कुळ जाती
मी आदिशक्ती आदिमाया अर्धांगा, जारिणी किती करशील दंगा
दोघी सवती भांडती पती मागट भुंगा
आपसात वर्म बोलती गौरी आणि गंगा…’
लोकपरंपरा अशी मोकळीढाकळी असते. ती उगाच काही लपवत नाही. तिचा सगळाच व्यवहार रोखठोक. तिथल्या तिथे बोलून मोकळं व्हावं, उगाच मागे कुरबुर नको. म्हणून तर आपल्या विठुरायाची रुक्मिणी थोडे दिवस बघून घेते, काय चाललेत आपल्या विठुरायाचे उद्योग ते. काय करतोय काय आपला विठुराया?
‘रुक्मिणीच्या मंदिरी बाई चांदीचे गडवे-पेले
जनाबाईच्या घरी देव मोग्यानं पाणी प्याले’
किंवा
‘रुक्मिणीच्या मंदिरी गाद्या गिरद्या बक्कळ
पांडुरंगाला आवडली जनाबाईची वाकाळ’
म्हणजे घरात चांदीचे गडू-पेले असताना देव जनाईकडे जाऊन तिच्या मोग्यानं पाणी पितो आणि घरात एवढय़ा मऊ गाद्या-गिरद्या असताना देव जनाईची घोंगडी पांघरतो म्हणजे… मग रुक्मिणीला राग येणार नाही तर काय? बरं एवढय़ावरच हे थांबलं असतं तर ठीक. एक दिवस देवाला आवडतं म्हणून रुक्मिणीने देवासाठी खास केळ्याचं शिकरण केलं. तर याने काय करावं?
‘रुक्मिणी जेवू वाढी, निरशा दुधामंदी केळं
पांडुरंगाला आवडलं जनाबाईचं ताक शिळं’
एवढं झाल्यावर कुणाला राग आल्याशिवाय राहणार आहे का? रुक्मिणीचा किती जीव आहे पांडुरंगावर, त्याला मात्र तिचं काहीच नाही. मग एखाद्या व्यक्तीचा सात्त्विक संताप होणार नाही तर काय, मग रुक्मिणीही संतापतेच आणि विठोबाला निर्वाणीचं सुनावते-
‘रुक्मिणी म्हणे देवा, तुमा जनीची लई गोडी
एवढी हौस असेल तर बांदून द्या जा माडी’
रुक्मिणी, विठोबा आणि जनाईच्या प्रेमत्रिकोणाचे असे अनेक दाखले लोकवाङ्मयातील ओव्यांमध्ये जागोजागी सापडतात. जिथे प्रेम आहे तिथे कळतनकळत अधिकार वृत्तीही येते. खरंतर प्रेमाचा तिसरा कोन नेहमीच खरा असतो असं नाही. तो अनेकदा आपल्याच मनाचा संशयी भुंगा असतो. पण प्रेम ही गोष्टच अशी नाजूक-साजूक आहे, की आपल्या प्रिय व्यक्तीने जरा दुर्लक्ष केलं तरी रागाचा पारा चढतो.
मात्र दरवेळीच प्रेमाचा तिसरा कोन म्हणजे आपला संशयी आत्मा असतोच असं नाही. कधी कधी तो प्रत्यक्षातही असतो आणि केवळ असत नाही, तर तो सुखी संसाराला चूड लावण्याचंही काम करतो. खंडोबा-म्हाळसेच्या बाबतीत यापेक्षा वेगळं काय घडलं होतं? एवढी वर्षं दोघांनी सुखाचा संसार केला. अगदी एकमेकांवर जीव ओवाळून टाकला. अन् एकदा खंडेराया शिकारीला गेले, तर कधी नव्हे ती बाणाई त्यांच्या वाटेत आली. मेंढरांचा कळप हाकत, मोठय़ा तोऱयात ही नवयौवना-सौंदर्यखणी बाणाई चालली होती. मग काय, खंडेराय भाळलेच तिच्यावर. घरी आले तरी ती काही त्यांच्या नजरेसमोरून हटेना. नवऱयाचं असं चळलेलं चित्त जाणवतंच बाईमाणसाला… म्हाळसाने थेटच सवाल केला- खंडेराया तुमचं चित्त कुठे गेलंय? यावर तो खंडोबासुद्धा मोठा खटच म्हणायला हवा. दुसऱया एखाद्याने उत्तर द्यायचं टाळलं असतं, पण खंडेराया सांगून मोकळा झाला- बाणाईवर चित्त गेलंय म्हणून…! म्हाळसेने काही कमी प्रयत्न केले नाहीत, खंडेरायाला समजवण्याचे. या संसारी दोन बायका नकोत, असंही सांगून पाहिलं, पण खंडोबा गेलाच चंदनपुराला बाणाईला आणायला… आणि मग म्हाळसा स्त्र्ााrजन्माचं आपलं सनातन दुःख आळवत बसली-
‘देव मल्हारी रुसून, आला घोडय़ावर बसून
गेला बानूला आनाया मी ग लग्नाची असून…’
शेवटी प्रेमात फसवणूक झाल्याचं दुःख जीवघेणंच असतं. मग ते देवपत्नींचं असलं तरी! लोकवाङ्मयात अशा अनेक गाण्यांतून देव आणि देवपत्नींचे प्रेमातले रुसवे-फुगवे पाहायला मिळतात; पण ते नेहमीच किंबहुना कधीच त्यांचे नसतात. ते असतात सामान्य स्त्र्ााrच्या आयुष्यातले. पण आपलं हे दुःख घरोघरच्या पार्वती, रुक्मिणी किंवा म्हाळसेला थेट मांडता येत नाही. मग ती देवपत्नींचा आधार घेते आणि नवऱयाकडून आपल्या वाटय़ाला आलेली उपेक्षा-अपमान अभिव्यक्त करते. लोकगीतांतून स्त्र्ाया अशा थेटपणे व्यक्त होतात. ऐकणाऱयाला वाटतं, बाई देवाचं गाणं गातेय; पण ते गाणं देवाचं नसतं, त्या गाण्यात एका परीने तिच्याच दुःखाच्या विणा असतात. म्हणूनच लोकगीतांत देवपत्नींचं होणारं सामान्यीकरण केवळ भावनिक पातळीवरचं नाही, तर ते सामाजिकही आहे. एकप्रकारे महिलांच्या भावनांचा तो निचरा आहे. आज भावभावनांचा निचरा (कॅथार्सिस) होण्यासाठी समाजात वेगवेगळ्या स्तरांवर अनेक जागा आहेत. पूर्वी ही सोय नव्हती, त्यामुळे तत्कालीन महिला गाण्यांतून सांगत-बोलत राहिल्या… अगदी सफल-विफल प्रेमाची गाणीही त्यांनी स्त्र्ााrदेवतांच्या माध्यमातून गायली. मात्र आजही ती वाचताना वा ऐकताना ती गाणी आपल्याला केवळ सामान्य महिलांची किंवा केवळ देवतांची वाटत नाहीत; ती सामान्य महिला आणि स्त्र्ााrदेवता दोघांचीही सारखीच वाटतात. हीच ताकद आहे सामान्य माणूस आणि त्यांच्या लोकदेवतांतल्या नात्यांची. इथून-तिथून दोघेही सारखेच!
[email protected]