पृथ्वी वाचली तरच मानवाचे अस्तित्व टिकेल!

>> प्रा. डॉ. प्रीतम भि. गेडाम

आज शहरातून पक्ष्यांची संख्या नाहीशी होत आहे. आपल्या आवारात आता ते सुंदर पक्षी आढळत नाहीत. पाण्याची पातळी तर एवढी खालावली आहे की कित्येक ठिकाणी हजार फूट बोअरवेल किंवा विहीर खोदली तरीही पाणी लागत नाही. कारण पावसाचे पाणी जमिनीमध्ये जिरतच नाही. नदी, तलाव, कालवे व पाण्याचे इतर स्रोत आटतात आणि पाणीटंचाईची समस्या उद्भवते. मोठमोठी वने उजाडत आहेत. शेतजमीनसुद्धा कमी होत आहे आणि त्या जमिनीवर काँक्रीटचे जंगल मोठय़ा प्रमाणावर वाढत आहे. अर्थात वाढत्या लोकसंख्येच्या गरजाही खूप वाढल्या आहेत. साहजिकच त्यांच्या पूर्ततेसाठी पण निसर्गसंपत्तीचा ऱहास अपरिहार्य झाला आहे.

मागील काही वर्षांमध्ये वातावरणात 100 अब्ज टनहून जास्त कार्बन वायू अवकाशात सोडण्यात आला आहे. त्यामुळे वातावरणातील प्राणवायू कमी झाला आहे. रासायनिक शेती खूपच घातक आहे. भाजीपाला-फळे ही स्वास्थ्यवर्धक राहिलेली नाही. ग्लोबल वॉर्मिंगमुळे मातीची सुपीकता कमी होत आहे. सोबतच शेतीच्या उत्पादकतेवर गंभीर परिणाम होत आहे. निसर्ग मानवाची तहानभूक भागवितो, मानवाचे लोभ नाही. निसर्ग सुरक्षित असेल तरच पृथ्वीवर मानवाचे अस्तित्व टिकून राहणार आहे.

आज आपण कुठेही खाद्यपदार्थ घेताना सांगू शकत नाही की ते शुद्ध व भेसळमुक्त असेलच. कारण आजकाल प्रत्येक ठिकाणी भ्रष्टाचार आणि भेसळच आढळून येते. आज आपल्याला जो प्राणवायू मिळत आहे तोही विषारी स्वरूपात मिळत आहे. अन्नधान्यात रासायनिक भेसळ, कोळसा, तेलासारख्या खनिजांचे मोठय़ा प्रमाणावर उत्खनन, वृक्षतोड, वन्यजीवांची कमी होत चाललेली संख्या, वाढती लोकसंख्या व त्या लोकसंख्येची वाढती गरज, विषारी ई-कचरा, इंधनांचा अतिवापर, काँक्रीटचे जंगल, वितळत चाललेले हिमखंड अशा समस्या पृथ्वीवर मोठय़ा प्रमाणात धोका निर्माण करीत आहेत.

जागतिक आरोग्य संघटनेने जगातली सर्वात प्रदूषित 20 शहरांची क्रमवारी दर्शवली आहे, ज्यात हिंदुस्थानमधील 14 शहरांचा समावेश आहे. दरवर्षी आपल्या देशात सुमारे 24 लाख लोक प्रदूषणामुळे मृत्युमुखी पडतात. प्रदूषणामुळे मानवाचे सरासरी वय खूप कमी होते आहे. जगात कित्येक देशात थंडीत उणे 70 डिग्री सेल्सियसपेक्षा जास्त तर उन्हाळय़ात 50 डिग्रीपेक्षा जास्त तापमान असते. हे सर्व बदल ग्लोबल वॉर्मिंगमुळे घडत आहेत. आजकाल सगळीकडे विकास, जातीधर्म व इतर गोष्टीसंबंधी नेते बोलतात, पण प्रदूषण, जंगलनाश, पर्यावरण संरक्षण याबद्दल कोणी बोलताना दिसत नाही. फक्त एक विशेष दिवस साजरा करून नंतर विसरून जातात.

‘सायन्स मॅगेझीन’च्या म्हणण्याप्रमाणे मागच्या वर्षीपर्यंत पृथ्वीवर 6.3 अब्ज टन प्लॅस्टिक कचरा होता. आता समुद्रामधे 150 दशलक्ष टनपेक्षा जास्त प्लॅस्टिक कचरा आहे. ज्यात प्लॅस्टिकच्या बाटल्या जास्त आहेत. एका प्लॅस्टिक बाटलीला बायोडिग्रेड व्हायला चक्क 450 वर्षांचा कालावधी लागतो. जगात दर सेकंदाला 20 हजारांपेक्षा जास्त प्लॅस्टिकच्या बाटल्या विकल्या जातात. दरवर्षी 60 लाख हेक्टरपेक्षा जास्त वने नष्ट होत आहेत. ज्यामुळे दरवर्षी 10-12 अब्ज टन प्राणवायूची कमतरता होत आहे आणि वन्य प्राणीसुद्धा धोक्यात येत आहेत. ‘रेड डाटा’ बुकप्रमाणे 400 पक्षी, 138 उभयचर, 305 सस्तनधारी जंतू, 193 प्रकारच्या माशांचे अस्तित्व संपण्याचा मार्गावर आहे. पर्यावरणाचा सांभाळ सर्व नागरिकांचे कर्तव्य आहे. परिवाराप्रमाणे पर्यावरणसुद्धा आपलेच आहे ही भावना प्रत्येकाने जोपासली पाहिजे आणि त्यानुसार आपले वर्तन ठेवले पाहिजे. तरच वसुंधरा दिन खऱया अर्थाने साजरा होऊ शकेल.

ग्लोबल वॉर्मिंग यावर एकमात्र उपाय म्हणजे समृद्ध वनीकरण. सर्वप्रथम वने समुद्ध व्हायला हवीत. म्हणजे वृक्षतोडीवर पूर्णपणे नियंत्रण करून वनीकरणावरच लक्ष केंद्रित करायला हवे. वनीकरण जेवढे जास्त तेवढे पाण्याचे स्रोत समृद्ध, तेवढा प्राणवायू शुद्ध, उत्तम आरोग्य, पशुपक्ष्यांचे व जनावरांचे जीवन समृद्ध, ग्रामीण क्षेत्र समृद्ध, वातावरण शुद्ध, लोकांचे जीवनमान समृद्ध आणि तोच मानवाचा खरा विकास ठरेल.

prit00786@gmail.com