परीक्षण : नैतिक मूल्याची रुजवात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>डॉ. रंजना वांबूरकर

कविता मेहेंदळे हे बालसाहित्यातील सुपरिचित नाव आहे. तुमची कविता मावशी म्हणून त्या बालांशी, किशोर कुमारांशी संवाद साधतात. ‘सोनचाफा’ या पहिल्या बालकथासंग्रहानंतर आजपर्यंत त्यांची 41 पुस्तके प्रकाशित झाली आहेत; त्यातील 22 बालवाङमयची आहेत. कथा, कविता, नाटय़छटा, नाटुकली आदी विविध प्रकारचे बालसाहित्य त्यांनी लिहिली आहेत.
‘तू मोठ्ठा कधी रे झालास ?’ या कुमारांसाठीच्या कथा संग्रहात एकूण 15 कथा आहेत. ‘छात्र प्रबोधन’ या कुमारांसाठी असलेल्या मासिकात वेळोवेळी प्रसिद्ध झालेल्या या कथा आहेत. मुलांवर हसत खेळत संस्कार करणाऱ्या या कथा उत्कंठा वर्धक आणि मनोरंजक आहेत. ‘छात्र प्रबोधन’ हे मासिक 1992 पासून सुरू झाले आहे. महेंद्र सेठीया हे प्रारंभापासून या मासिकाचे संपादक आहेत. आपली मुले हुशार व सद्गुणी असावीत असे सगळ्याच आईवडिलांना वाटते. त्यातूनच ते मुलांना दुसऱ्या, शेजारी-पाजारी, नातलग यांच्या मुलांची उदाहरणे देत असतात. दुसऱयाचा तो बाब्या मानण्याच्या साध्या घटनेतून ‘एकदातरी’ ही कथा फुलत जाते. बंटी या व्रात्य व धाडसी मुलाला सुखद आश्चर्याचा धक्का बसतो, जेव्हा तो, त्याची आई त्याचे उदाहरण त्याच्या मामेभावंडांना देत असल्याचे ऐकतो. कथांतर्गत निवेदनातून साकार झालेली ही कथा ‘खोडकर’ व ‘टारगट’ विशेषण मिळालेल्या मुलांना आपलीच वाटेल.

‘तू मोठ्ठा कधी रे झालास?’ ही यातील शीर्षक कथा हृदयस्पर्शी असून आजोबा व नातू यांच्यातील स्नेहमय नाते उलगडते. थोडासा बालिश असणारा, छोटय़ा-छोटय़ा गोष्टींवरून रागावणारा व चिडचिड करणारा अवधूत प्रत्यक्षात प्रेमळ व आजोबांची काळजी घेणारा आहे, हे एक छोटय़ाशा प्रसंगातून आई-वडिलांना उमगते. कथेचे शीर्षक आशयास अगदी समर्पक आहे. ‘गौरवचे भविष्य’ या कथेत वास्तव व कल्पकता, अद्भूतता यांची सरमिसळ आहे. बोलणारा व भविष्य सांगणारा बुलबुल पूर्वाश्रमीचा ‘यश’ असतो. उत्सुकता वाढवत नेणाऱया कथेतून नकळत हा संस्कार होतो की आपले भविष्य आपल्या कर्तुत्वावर अवलंबून असते.

क्षणीक प्रलोभनांना भुलून चुकीच्या मार्गाने जाणाऱया गरीब, कष्टकरी मुलांना उचित मार्गदर्शन केले तर ती बदलतात. त्यांची सदसद्विवेकबुद्धी जागृत होते असे आशयसूत्र ‘चप्पल चोर’, ‘शिक्षा नव्हे शिक्षण’ या कथांतून अधोरेखित होते. मुले वाईट नसतात, तर परिस्थिती वाईट असते. किशोर वयातच मुलांना चांगल्या वाईटची जाणीव करून देणे, त्यांच्याकडे लक्ष देणे, करुणा दृष्टीने त्यांच्याकडे पाहणे हे येथे सूचीत होऊन लेखिकेचा मूल्यभान जागृतीचा प्रयत्न जाणवतो.

‘फसवणूक’ हीसुद्धा संस्कार करणारी कथा आहे. सेलफोनच्या नादी लागलेली व मैदानावर खेळण्याचा वेळ मोबाईलवर गेम खेळण्यात घालवणारी ऋचा वेळीच सावरते. किंबहुना आजी तिला सावरते. थोडय़ाफार फरकाने सध्या घरोघरी हेच चित्र दिसते. सर्वांच्या डोळ्यात अंजन घालणारी ही कथा साध्या-साध्या प्रसंगातून आणि मोजक्या व्यक्तिरेखेतून साकार होते.

‘सर्प्राइज’, ‘शंभरावी’ आणि ‘झेंडूचं फूल’ या कथांमधून मुलांवर श्रमदानाचे पर्यावरण रक्षणाचे संस्कार होतात. गणेशोत्सव जवळ आलेला असतो आणि अनिरुद्ध सहनिवासाचे अध्यक्ष असलेले आबा गवत काढण्यासाठी मजूर मिळवण्याच्या विवंचनेत असतात. मग सोसायटीतील मुले आबांना व सगळ्यांनाच ‘सर्प्राइज’ देतात. तर कोकणात जाऊन समुद्रकिनारा स्वच्छ करणे आणि डोंगर उतारावर झाडे लावणे अशी श्रमदानाची कामे मुले उत्साहाने करतात. आपला देश, देशातील छोटे मोठे प्रदेश स्वच्छ ठेवणे ही कामे स्वतः करणे यासाठी मुलांची तळमळ दिसते. एकप्रकारे मूल्यशिक्षणच देतात या कथा!!

‘कृतज्ञता’ या नैतिक मूल्याची रुजवात करणारी एक वेगळी कथा म्हणून ‘प्रतिसाद’ या कथेची नोंद घ्यावी लागेल. फक्त मध्यमवर्गीय व पांढरपेशे लोकच नाहीत तर तळागाळातील विपन्नावस्थेत जगणारे लोकही कृतज्ञतेने वागतात; हे डोंबऱयाच्या मुलीच्या उदाहरणावरून प्रत्ययाला येते. मदतीची जाणीव ठेवून कृतज्ञतेने वागणारी जयाची व्यक्तिरेखा मनात रेंगाळत राहते. ‘यतीला शोधताना’ ही कथा म्हणजे प्रवासवर्णन आहे. याचे निवेदन कथांतर्गत निवेदकाने केल्याने कथेला विश्वासार्हता लाभली आहे. सुदूर आसाम–मेघालय–अरुणाचल प्रदेश या ईशान्येकडील राज्यांच्या चित्रदर्शी वर्णनाने तो प्रदेश हुबेहूब डोळ्यांसमोर उभा राहतो. ‘निळं पाणी’, निळे डोंगर, निळशार धुपं हे निळाईचं आहे. शिलाँगची हे वर्णन वाचून मुलांना शिलाँगची सफर करावीशी वाटेल. या कथेच्या नायकाने ‘यती’ या हिम-मानवाविषयी खूप ऐकले आहे. तो प्रत्येक ठिकाणी, जळी, स्थळी, काष्टी, पाषाणी त्यालाच शोधत असतो. त्याच्याबद्दल विचार करत असतो, पण ते मिथक आहे; हे तेथील शेर्पा लोकांकडून कळते. साहस, काहीतरी वेगळे शोधण्याची इच्छा असलेल्या मुलांना या कथेत एक थरारक प्रसंगही वाचायला मिळेल. अनोळखी प्रदेशात, अंधाऱया रात्री गाडी बंद पडण्याचा प्रसंग लेखिकेने उत्सुकता व थरार, भीती वाटेल असा रंगवला आहे. ‘यती’ ही फक्त कल्पना आहे, हे कळल्यावरही कदाचित एखादा यती तपस्वी असेलही, असे या कथेच्या नायकाला – विकासला वाटत राहते.

‘बंदपाकीट’ ही मुलांच्या मानसिकतेवर नेमके बोट ठेवते. मुलांचे वाढदिवस, मुंज थाटामाटात साजरे करण्याचे प्रमाण सध्या वाढले आहे. मुंजीत, वाढदिवसाला मिळालेल्या भेटवस्तू फक्त आपल्याच असे समजणाऱया मुलांना; स्वकर्तुत्वाने हुषारीने मिळालेल्या वस्तूंचे, पैशांचे महत्त्व ही कथा पटवून देते. ‘जय हिंद’ ही या संग्रहातील आगळीवेगळी कथा. एका हिंदुस्थानी सैनिकाची व त्याच्या हिंमतवान व धैर्यशील मुलीची ही कथा वाचताना मनात अभिमान, काwतुक, दुःख अशा भावना उचंबळून येतात.

यातील बहुतांशी कथा कुटुंब कथा आहेत. कुमार वयीन मुलं-मुली, आई-वडील, मित्र-मैत्रिणी, आजी-आजोबा अशा व्यक्तिरेखांच्या खांबांवर हे कथाशिल्प उभे आहे. यातला खोडकर बंटी, यतीला शोधणारा विकास, चिडका अवधूत, ऋचा ही पात्रे मुलांना आवडतील तर प्रांजल, स्वरूपा, जया, समीर, शितू ही पात्रे मुलांना विचारात टाकतील. कथांना पूरक अशी वातावरण निर्मिती लेखिकेने कुशलतेने चित्रित केली आहेत. घटना प्रसंगांचे निवेदन, कथाशयास समर्पक संवाद यामुळे कथांची रंगत वाढली आहे.

घनश्याम देशमुख यांनी रेखाटलेले मुखपृष्ठ आकर्षक आहे. आतील सर्व चित्रे आशयास फक्त पूरकच नाहीत तर कथेचं मर्म ध्यानात आणून देणारी आहेत. ओघवती व प्रभावी सुबोध भाषाशैली कथांच्या वाचनीयतेत भर घालते. एपंदरीत या कथा हसत-खेळत, कळत-नकळत मुलांना मूल्य शिक्षण देणाऱया संस्कारशील कथा आहेत. आपल्यासारख्याच मुलांच्या या कथा मुले आवडीने वाचतील असा विश्वास वाटतो.

‘तू मोठ्ठा कधी रे झालास?’
लेखिका: कविता मेहेंदळे
प्रकाशक: छात्र प्रबोधन, पुणे
पृष्ठ : 96, मूल्य : रुपये 110/-