
>> डॉ. सरिता विनय भावे
1962 सालच्या चीन युद्धात ‘अजोड’ शौर्य दाखवल्याबद्दल रायफलमॅन जसवंतसिंह रावत यांची स्मृती जागृत करणारे हे समाधी स्थळ. त्यांची शौर्यगाथा भारतीय सेनेच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवावी अशीच आहे.
अरुणाचल प्रदेशातील ‘तवांग’ला जाताना दिसणारी हिमाच्छादित शिखरे, गगनचुंबी देवदार, याक इतर राज्यांतही पाहिले असल्याने काwतुक करावे तरी कशाचे हा प्रश्न मला पडला होता! निसर्गसौंदर्य अवर्णनीय असले तरी ‘हे आधी अनुभवले असल्याची’ भावना प्रकर्षाने जाणवत होती. ‘जसवंतगढ’च्या युद्ध-स्मारकाला थांबून, चहाचा ‘ब्रेक’ घेऊन आम्हाला पुढे जायचे होते. थोडय़ाशा निरुत्साहानेच गाडीतून उतरून चोहोबाजूंच्या उंच डोंगरांची, जलप्रवाहांची, बोचऱया हवेची मी नोंद घेतली.
1962 सालच्या चीन युद्धात ‘अजोड’ शौर्य दाखवल्याबद्दल रायफलमॅन जसवंतसिंह रावत यांची स्मृती जागृत ठेवण्यासाठी हे समाधी स्थळ उभारण्यात आले आहे. त्यांची जतन केलेली शय्या आणि गणवेशाचे दर्शन घेतल्यावर जाट रेजिमेंटच्या सुबोध कुमार यांनी खूप अभिमानाने आम्हाला जी शौर्यगाथा सांगितली ती भारतीय सेनेच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवावी अशीच आहे. पण आपल्या दुर्दैवाने आपल्याला याची यत्किंचितही कल्पना नाही.
17 नोव्हेंबर 1962 च्या पहाटेपासूनच चिनी फौजांनी अरुणाचल प्रदेशच्या नुरानांग (जिल्हा तवांग) वर हल्ला चढवून भारतीय सेनेचे मनोबल पार ढासळून टाकले होते. आपल्या ‘मीडियम मशीन गन’ (एमएमजी) च्या वापराने नेफा बॉर्डरवर कब्जा करण्याचा त्यांचा मनसुबा होता. गढवाल रायफल्सच्या चौथ्या बटालियनला मागे फिरण्याचे आदेश दिलेले होते. पण लान्सनाईक त्रिलोकसिंह यांच्या स्टेनगनचे ‘कव्हरिंग फायर’ लाभलेले रायफलमॅन जसवंतसिंह आणि रायफलमॅन गोपालसिंह गुंसाई प्राणांची पर्वा न करता शत्रूच्या बंकर जवळ गेले. अक्षरशः 15 यार्डच्या अंतरावरून हातबॉम्ब फेकून त्यांनी चिन्यांच्या एमएमजीवर कब्जा केला. परत खंदकाकडे येताना एक गोळी जसवंतसिंहांच्या डोक्यात लागली. ती प्राणघातक ठरूनही त्यांनी एमएमजी सोडली नाही. दरम्यान, एका चिनी सैनिकाचे लक्ष्य ठरलेले त्रिलोकसिंह शहीद झाले. गोपालसिंह यांनी गंभीररीत्या जखमी असतानाही एमएमजीला भारतीय खंदकाकडे यशस्वीरीत्या पोहोचवले.
या साहसी कृत्याला फक्त 15 मिनिटे लागली, पण या जवानांच्या अभूतपूर्व शौर्यामुळे युद्धाला वेगळेच वळण लागले. चिन्यांची एमएमजी ताब्यात आल्याने आपल्या एलएमजी (लाईट मशीन गन) पुन्हा जोमाने धडधडू लागल्या. एका दिवसात त्यांचे 300 तर आपले फक्त 2 सैनिक मारले गेले. या उत्कृष्ट कामगिरीबद्दल गढवाल रायफल्सच्या चौथ्या बटालियनला ‘बॅटलऑनर नुरानांग’ने सम्मानित करण्यात आले. भारत सरकारतर्फे त्रिलोकसिंह यांना ‘मरणोपरांत वीरचक्र’ आणि गोपालसिंह यांना ‘वीरचक्र’ प्रदान करण्यात आले. जसवंतसिंह रावत यांना त्यांच्या अतुलनीय कामगिरीबद्दल ‘मरणोपरांत महावीरचक्र’ प्रदान करण्यात आले. मृत्यूनंतरही त्यांना वेळोवेळी बढतीचे पद, त्यानुसार वेतन देण्यात आले. आजही दिवसातून तीनदा त्यांच्यासाठी नैवेद्याचे ताट ठेवतात. त्यांचा ‘भोग’ झाल्याशिवाय कुणीही अन्नपाणी घेत नाही. ज्या झाडाखाली त्यांनी शेवटचे श्वास घेतले त्या झाडाभोवतीच हे स्मृतीस्थळ उभारण्यात आले आहे. वठल्यासारख्या वाटणाऱया त्या खोडाला आता धुमारे फुटलेले आहेत!
ही जगावेगळी भावपूर्ण कहाणी ऐकल्यावर थोडे मागे रेंगाळून सुबोध कुमार यांच्याशी बोलायला मी थांबले. मृत सैनिकासाठी ‘भोग’ ठेवणे मला इतके वेगळे वाटले की मी त्यांना विचारले, ‘त्या भोगाचे तुम्ही काय करतात’, त्यावर त्यांनी ‘आम्ही ते पक्षी, गाई यांना भरवतो’ असे अपेक्षित उत्तर दिले. मी त्यांना विचारले, सगळ्याच ‘शहीद’ झालेल्या सैनिकांना असे मानाने निवृत्त करतात का? त्यावर खूप अतुलनीय शौर्य दाखवलेल्या शहीद सैनिकांनाच त्यांच्या अखेरच्या निवृत्तीच्या पदापर्यंत गौरवतात असे ते उत्तरले.
मी त्यांना त्यांचे मूळ गाव, घरची मंडळी, घरी कधी जायला मिळते याबद्दल विचारले. तेव्हा ते म्हणाले, वर्षातून दोन वेळा सुट्टी मिळते, पण ती खरंच मिळेल याची शाश्वती नसते. बरेचदा सणांना/घरच्या समारंभांना मुकावे लागते. मी मुंबईहून आले आहे हे समजल्यावर ते म्हणाले, ‘मॅडमजी, घूमना चाहिये, अपनी नॉलेज बढती है, मुझे भी मेरी बच्चियोंको साऊथ साईड घुमाना है’. त्यांचं हे बोलणं ऐकताच, आम्ही फक्त मुलीच असणाऱया आणि आम्हाला शक्य तेवढे प्रवास घडवणाऱया माझ्या बाबांची मला प्रकर्षाने आठवण आली. माझे बाबा, आपल्या मुलींच्या प्रगतीसाठी जीवाचे रान करणारे. माझ्या ओळखीतले अनेक बाबा आणि दूर सीमेवर कष्टप्रद परिस्थितीत आपल्या मुलींच्या सर्वांगीण विकासाचा विचार करणारा सैनिकी वेषातला हा बाबा, या सगळ्यांची नाळ कुठेतरी जोडली गेली आणि माझ्या डोळ्यांतून अश्रूच वाहायला लागले. माझ्या आवाजातला पंप कसाबसा लपवण्याचा प्रयत्न करत मी त्यांना म्हटले, ‘प्रवास नक्कीच करायला पाहिजे, आपल्याला इतिहास आणि भूगोल ‘कळतो’ आणि लोपंही अनुभवायला मिळतात’. माझा अश्रू लपवण्याचा आटोकाट प्रयत्न त्यांना जाणवत होता. ‘मॅडमजी, आप तो इमोशनल हो गये’ असे ते म्हणत असतानाच हस्तांदोलन करून मी त्यांचा निरोप घेतला.
सुरुवातीला, ‘इथे येऊन नवीन काय पाहिले’ असे वाटणाऱया मला ‘अरुणाचल प्रदेश ही काय चीज आहे’ याचा आयुष्यभर लक्षात राहील असा अनुभव मिळाला होता. आंतरजालावर या युद्धाची माहिती वाचल्यावर माझ्या लक्षात आले की आपल्या भारतीय मनोभूमिकेनुसार याही गोष्टीला दंतकथेचे स्वरूप मिळाले आहे. पण सुबोध कुमार यांनी त्या घटनेचे पावित्र्य तसेच राखून योग्य तीच माहिती आम्हाला दिल्याने माझा त्यांच्याविषयीचा आदर दुणावला. त्यांना कधीच कळणार नाही महाराष्ट्रातील कुण्या एकीने त्यांच्याबद्दल भावनिक स्फूट लिहिले आहे. पण मला खात्री आहे माझ्या अश्रूंनी, मला त्यांच्या आणि जसवंतसिंह यांसारख्या अनेक भारतीय सैनिकांविषयी काय वाटते हे नक्कीच पोहोचवले असेल.
देशासाठी प्राणार्पण केलेल्या, देशाच्या सीमांचे रक्षण करणाऱया सर्व सैनिकांना प्रणाम!!


























































