सौंदर्य वठलेल्या झाडांचे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> डॉ. सरिता विनय भावे

गर्भश्रीमंत डेरेदार झाड कुणाचे मन मोहवीत नाही? पण जेव्हा ऋतूचा-नियतीचा फेरा बदलतो आणि ही गर्भश्रीमंती लयास जाते तेव्हा अशा निष्पर्ण झालेल्या किंवा कायमच्या वठलेल्या झाडांचे ‘रूप’ आपणास काय भासवून देते? सर्वप्रथम आपल्या मनात हळहळ, निराशा, भूतकाळात अडकून पडण्याचे दुःख अशा भावना प्रकर्षाने जागृत होतात. आपल्या हिंदुस्थानी सिनेमातही नायक-नायिकेच्या विरहाच्या दुःखाला अधोरेखित करण्यासाठीच जणू असे वठलेले, काटेरी वृक्ष साक्षीदार म्हणून नेहमी हजर असतात!

हिरवीकंच, लुसलुशीत पाने असलेले; सुगंधित फुलांचे-रसरशीत फळांचे अलंकार आपल्या अंगाखाद्यावर मिरवणारे; दमलेल्या पांथस्थाला शीतल छाया देणारे; रंगीबेरंगी फुलपाखरे, मधुर गायन करणारे पक्षी, गुंजारव करणाऱया मधुमक्षिका, चिरतरुण भ्रमर यासारख्या दिग्गज पाहुण्यांचे दिलदार सरबराई करणारे, त्यांचे यजमानपद भूषवणारे, गर्भश्रीमंत डेरेदार झाड कुणाचे मन मोहवीत नाही? पण जेव्हा ऋतूचा-नियतीचा फेरा बदलतो आणि ही गर्भश्रीमंती लयास जाते तेव्हा अशा निष्पर्ण झालेल्या किंवा कायमच्या वठलेल्या झाडांचे ‘रूप’ आपणास काय भासवून देते? सर्वप्रथम आपल्या मनात हळहळ, निराशा, भूतकाळात अडकून पडण्याचे दुःख अशा भावना प्रकर्षाने जागृत होतात.

पण मला मात्र ही निष्पर्ण झाडे खूपच आवडतात. देहावरची सर्व आवरणे गळून पडावीत, पापुद्रा न पापुद्रा अलगद निघून यावा आणि आतील हृदयस्थ आत्म्याचे ‘सत्य’ स्वरूप उघड व्हावे, तशी ही झाडे वाटतात. त्यांच्या नेहमीच्या रुपापेक्षा ही जास्तच ‘खरी’ भासतात. इतरवेळी आकर्षक पाना-फुलांच्या संभारामुळे फांद्यांची कमनीय वळणं अगदीच लपून गेलेली असतात. शिलाखंडातून अवांछित भाग काढून टाकल्यावर देखणी मूर्ती साकार होते, तसे या निष्पर्ण फांद्यांचे ‘लावण्य’ अवतरित होते, खुलून येते. खरंच किती देखणी वाटतात अशी झाडे!
अशी झाडे पाहिल्यावर नेहमीच्या ज्या भावना जागृत होतात त्या बाजूला ठेवून एकदा बघा तरी वठलेल्या झाडांच्या सौंदर्याकडे! केवळ आकारात एवढी विविधता, इतकी विस्तीर्णता असू शकते, हे वठलेल्या झाडाकडे मन लावून बघितल्यावरच कळते. एक हिरवा रंग पूर्ण निघून गेल्यावर खोडा-फांद्यांच्या पांढऱया, पिवळ्या, तपकिरी, काळसर या रंगांमध्येही किती छटा असू शकतात हे आकाशाच्या निळाईच्या पार्श्वभूमीवर प्रकर्षाने जाणवते. एखाद्या संसारी माणसाने गृहस्थाश्रम सोडून पूर्ण विचारांती संन्यासाश्रमाची निवड करावी तसा हा बदल केवळ रंगसंगतीमुळे घडून आलेला वाटतो.

कशाकशाचाच अडथळा नसल्यामुळे, वठलेले झाड आणि त्या संबंधित इतर गोष्टी जरा जास्तच ठाशीवपणे डोळ्यात भरायला लागतात. पक्षी आणि झाडे यांचे सौहार्द पूर्वापार प्रचलित आहे. वठलेल्या झाडावर जेव्हा एखादा आगंतुक पक्षी येऊन बसतो, तेव्हा त्या गोठलेल्या, चित्रस्वरूप दृश्याला ‘जिवंतपणा’ तर बहाल होतोच, पण भणंग अवस्थेतही झाडाने आपले ‘आसरा’ देण्याचे कार्य थांबवलेले नाही, हे ही ध्यानात येते. कधीकधी अशा झाडांवर एखाद्या ‘वेडय़ा’ पक्ष्याचे घरटे बघून तर मला भरूनच येते. असे वाटते, बघा, आपल्या जीवलगाचे सर्वस्व लुटले गेले तरी त्या पक्ष्याने त्या झाडाची साथ सोडलेली नाही.

वठलेले वृक्ष काळाचा अगाध महिमा सांगत असतीलही, पण त्यांच्या या ‘वर्तमानात’ मात्र मला ते अतिशय ‘फोटोजेनिक’ वाटतात! लुईस कॅरॉलच्या ‘वंडरलँड’मधल्या ‘ऍलिस’ला दूरची, हाती न गवसलेली पाणवनस्पतीची फुले जास्तच विलोभनीय होती असे वाटत राहते. तिच्यासारखेच, प्रवास करताना, रस्त्याच्या कडेला असणारे आणि दरवेळी थांबून कॅमेऱयात बद्ध न करता आलेले, फक्त नयनांतच ‘रुपडे’ साठवता आलेले, वठलेले वृक्ष सगळ्यात सुंदर असतात, असे मलाही वाटत आले आहे, यात काहीच नवल नाही!